computer

मध्यप्रदेशात तब्बल २.१५ लाख झाडांची कत्तल होऊ घातली आहे...काय आहे संपूर्ण प्रकरण?

नुकताच पर्यावरण दिन होऊन गेला. या दिवशी अनेकांनी झाडे लावली असतील. झाडे लावणे आणि झाडे जगवणे या दोन्ही मात्र पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असतात. झाड लावल्यावर त्याला वेळच्या वेळी पाणी देणे, त्यांची निगराणी करणे अशा अनेक गोष्टी असतात. या काळात प्रत्येक दिवशी या झाडांची काळजी घ्यावी लागते. पण मात्र हीच झाडे कापताना किती विचार केला जातो? अनेक ठिकाणी तर हजारांच्या संख्येने झाडे कापली जातात. झाडे वाचविण्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली, मात्र जे व्हायचे तेच होते. मध्यप्रदेशातून येत असलेली बातमी मात्र कुठल्याही पर्यावरण प्रेमीला अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही.

मध्य प्रदेशातील बुंदेलखंड हा परिसर पाण्याच्या कमतरतेने त्रस्त आहे. इथे पाण्याचा स्तर खूपच कमी आहे. याच परीसरातील छतरपूर येथील बक्सवाह हे संरक्षित जंगल आहे. या जंगलातील तब्बल अडीच लाख झाडे हिऱ्यांच्या खाणीसाठी तोडण्याचा घाट घातला जात आहे. या निर्णयाने या परिसरातील पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. आधीच पाणी नाही, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातील, याखेरीज आधीच पाण्याचं दुर्भिक्ष असताना या खाणीसाठी रोज ५.९ मिलियन क्यूबिक मीटर पाणी लागणार आहे. आता लोकांना पाणी पुरवणार की या खाणीला हा गंभीर पण प्रश्न निर्माण झाला आहे.

तसे पाहायला गेले तर मध्यप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहेत. इतर राज्याच्या मानाने इथे वनक्षेत्र जास्त आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत २५% जमिनीवर वनक्षेत्र आहे. आता प्रश्न हा उपस्थित होतो की जसे इतर राज्यांत हळूहळू जंगल कमी झाले तीच गत या राज्याची तर होणार नाही ना?

काही अहवालानुसार राज्य सरकारने हिरा खाणीसाठी ६२.६४ हेक्टर जमीन निश्चित केली होती. पण या जमिनीसाठीचा लिलाव जिंकणारी कंपनी आदित्य बिर्ला ग्रुप मात्र ३६३ हेक्टर जमिनीची मागणी करत आहे. कंपनी या खाणीत तब्बल २५०० कोटी रुपये गुंतवणार आहे. असं म्हणतात की या क्षेत्रात ३४ मिलियन कॅरेट रफ डायमंड आहेत. या खाणीला आशियातील सर्वात मोठी हिरा खाण बनवण्याची इच्छा कंपनीला आहे. पण यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करावी लागणार. झाडे तोडल्याच्या बदल्यात दुसऱ्या ठिकाणी झाडे लावू असे म्हटले जात असले तरी दुसऱ्या ठिकाणी लावलेली झाडे किती टिकतात हे सर्वश्रुत आहे.

या निर्णयाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या जंगलतोडीमुळे बुंदेलखंडच्या जैवविविधतेला मोठा धक्का बसू शकतो असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. हे जंगल वाचविण्यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत. चिपको आंदोलनाचे सुंदरलाल बहुगुणा यांचे काहीच दिवसांपूर्वी निधन झाले असले तरी त्यांच्या चिपको आंदोलनापासून प्रेरणा घेत या ठिकाणी देखील चिपको आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन सर्वच बाजूने वाढत असून काही लोकांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून निषेध नोंदवला आहे, तर सोशल मिडियावर देखील या गोष्टीवर मोठ्या प्रमाणावर बोलले जात आहे.

पर्यावरण की विकास हा तसा नेहमीचा चर्चेतील विषय असतो. पण पर्यावरणाशी समतोल राखत विकास केला तरच त्या विकासाचे फळे भावी पिढीला चाखता येतील हा पण विचार व्हायला हवा.

तुम्हाला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required