computer

जयपूरमध्ये पाहायलाच हवीत अशी ५ महत्त्वाची ठिकाणं !!

जयपूर, भारतातलं गुलाबी शहर! तसं राजस्थानातलं प्रत्येक शहर देखणं आहे, पण या शहराचा रुबाबच न्यारा. कोरीवकामानं नटलेले राजवाडे तर राजस्थानात सगळीकडे असले तरी जयपूरमधली काही ठिकाणं त्याचं वेगळेपण ठळकपणे दाखवून देतात.

चला तर मग, आज पाहूयात तुम्ही जयपूरला गेलात तर बिलकुल चुकवू नयेत अशी ही काही ठिकाणं..

१. आमेर किल्ला

आमेर किल्ला हा जयपूरच्या मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. तिथे जाण्यासाठी तुम्हाला जयपूर येथून रिक्षा किंवा टॅक्सी सहज मिळू शकते. बजेट कमी असेल तर रिक्षा चांगला पर्याय ठरू शकतो. जयपूर मधली प्रमुख स्थळं दाखवण्याचं एका दिवसाचं भाडं जवळजवळ कमीतकमी १५०० पर्यंत आहे. सुरुवात अर्थातच आमेर किल्ल्यापासून होते.

हा किल्ला जयपूरपासून ११ किलोमीटरवर एका उंच टेकडीवर बांधलेला आहे. या किल्ल्याचा इतिहास अगदी ९६७ सालापर्यंत मागे जातो. पुढे या किल्ल्यावर राजा मान सिंग यांनी राज्य केलं. आज जो किल्ला पाहायला मिळतो तो १६ व्या शतकातील आहे. एवढ्या वर्षांनीही किल्ला चांगल्या पद्धतीने राखण्यात आला आहे. आतील मुख्य आकर्षण असलेल्या शीश महालचं जतन करण्यात आलं आहे. या शीश महालची निर्मिती राजा मान सिंग यांनी केली होती. मान सिंग हे महत्त्वाच्या व्यक्तींना शीश महालात भेटायचे. आमेर किल्ल्यात दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास या इमारती पाहण्यासारख्या आहेत. मागच्या बाजूस पाहिल्यास अवाढव्य असा जयगड आणि टोकावर असलेला तिरंगा दिसतो.

आमेर किल्ला हा अवाढव्य आहे. प्रत्येक कानाकोपरा पाहण्यासाठी कमीतकमी २ तासांचा वेळ लागतो. या किल्ल्यापासूनच एक वाट जयगड किल्ल्याला गेली आहे. या वाटेने ४० मिनिट चालल्यास जयगड किल्ल्यापर्यंत पोहोचता येतं, पण दोन्ही किल्ल्यांच्या मधे ये जा करणे प्रत्येकासाठीच शक्य नसल्याने जयगडसाठी आमेरला वळसा घालून गेलेली वाट निवडली जाते.

(स्रोत)

२. जयगड किल्ला

आमेर किल्ल्याच्या वरच्या भागात अवाढव्य असा जयगड किल्ला आहे. असं म्हणतात की अनेक वर्ष जयगड किल्ला आमेर किल्ल्याचं रक्षण करत आला आहे. जयगड किल्ल्यावर एक ५० टन वजनाची जयवान तोफ आहे. या तोफेबद्द्ल एक दंतकथा सांगितली जाते. असं म्हणतात की या तोफेने चाचणीच्या वेळी जवळजवळ ३५ किलोमीटर लांब पर्यंत मारा केला. हा मारा एवढा जबरदस्त होता की तिथे पाणी साचून खड्ड्याचं रुपांतर तलावात झालं. अर्थात ही दंतकथा पूर्णपणे बरोबर असेल असं नाही. तोफेजवळ दिलेल्या माहितीनुसार जयगड किल्ल्यापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण असल्याने ही तोफ कधीही युद्धासाठी वापरण्यात आली नाही.

आमेर किल्ल्यासारखी वास्तुकला जयगड किल्ल्यावर आढळत नाही. किल्ल्याच्या मुख्य भागात मोठा तलाव आहे. हा तलाव आणि जयगड किल्ला या दोन गोष्टी इंदिरा गांधी यांनी चालवलेल्या शोधमोहिमेमुळे प्रसिद्ध झाल्या. जयगड किल्ल्यावर आणि आमेर किल्ल्यावर खजिना आहे अशी माहिती मिळाल्यानंतर या किल्ल्यांची एक शोध मोहीम राबवण्यात आली होती. विशेषतः जयगड किल्ल्याच्या तलावाची कसून तपासणी करण्यात आली, पण शेवटी काहीच हाती लागलं नाही. यावेळी जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांना अटक करण्यात आली होती. या घटनेचा उल्लेख त्यांच्या आत्मवृत्तात वाचायला मिळतो.

३. नाहरगड दुर्ग

नाहरगड किल्ला जयगड किल्ल्याच्या विरुद्ध बाजूस आहे. जयगड आणि नाहरगड एकत्र पाहता येऊ शकतात. आधी जयगड पाहून मग नाहरगड पाहिल्यास उत्तम. कारण नाहरगड पाहण्यास जवळजवळ २ तासांचा अवधी लागतो.

नाहारगड किल्ल्याची निर्मिती १७३४ साली महाराजा सवाई जयसिंग यांनी केली. असं म्हणतात की कोण्या नाहर सिंग नावाच्या राजपुताचं भूत या किल्ल्याच्या जवळपास भटकायचं. या भूतापासून सुटका मिळवण्यासाठी किल्ल्याला या भूताचंच नाव देण्यात आलं. आज जो नाहारगड पाहण्यास मिळतो तो १९ व्या शतकात बांधलेला आहे. आतील नव्या इमारतींची निर्मिती सवाई राम सिंग आणि सवाई माधो सिंग यांनी केली.

नाहरगडावरून संपूर्ण जयपूरचं दर्शन घडतं. किल्ल्याचं मुख्य आकर्षण हा तिथला शीश महाल आहे. हा शीश महाल आमेर किल्ल्याच्या शीश महाल पेक्षा दुप्पट कलात्मकतेने तयार केला आहे. याखेरीज किल्ल्यातील महाल आणि एकमेकांना जोडलेल्या वेगवेगळ्या खोल्या बघता बघता माणूस सहज हरवू शकतो.

४. हवामहल

जयपूरपासून सर्वात जवळ काही असेल तर ते म्हणजे हवामहाल. लाल आणि गुलाबी दगडांनी तयार केलेली ही इमारत आजही सुस्थितीत आहे. या इमारतीची बांधणी १७९९ साली महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी केली.

हवामहलच्या नावातच या इमारतीच्या निर्मिती मागचं कारण दडलं आहे. महालाच्या आतील स्त्रियांना त्याकाळी लोकांसमोर येण्याची परवानगी नव्हती. त्यांना बाहेरचं जग पाहता यावं आणि खास करून सणांच्यावेळी बाहेरील उत्सव पाहता यावा यासाठी इमारतीला विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलं. या इमारतीला तब्बल ९५३ लहान लहान खिडक्या आहेत. या खिडक्यांमधून बाहेरील जग तर दिसतं पण बाहेरच्या माणसाला आतील व्यक्ती दिसत नाही. या खिडक्यांचा वापर महालात हवा खेळती राहण्यासाठीही व्हायचा. म्हणूनच महालाला हवामहल नाव देण्यात आलं.

५. जंतरमंतर आणि सिटी पॅलेस

या दोन्ही वास्तू तशा वेगवेगळ्या आहेत पण ही दोन्ही ठिकाणं अगदी शेजारी शेजारी असल्याने आपण त्यांच्याबद्दल एकत्र जाणून घेणार आहोत. दोन्हींपैकी सिटी पॅलेस पाहण्यात जास्त वेळ जातो.

आधी सिटी पॅलेसबद्दल जाणून घेऊया.

महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी सिटी पॅलेसची निर्मिती केली. सिटी पॅलेस बांधण्याचं काम विद्याधर भट्टाचार्य यांनी केलं. या महालाचा इतिहास हा जयपूर शहराच्या इतिहासाइतकाच जुना आहे. सिटी पॅलेस हे १७२७ साली बांधण्यात आलं. त्याकाळी आमेर किल्ल्यावर राजधानी होती. वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या कमतरतेमुळे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी आपली राजधानी आमेर वरून जयपूरच्या मुख्य भागात हलवण्याचं निश्चित केलं. यासाठी नव्या राजधानीची जागा म्हणून जो महाल बांधण्यात आला तो महाल म्हणजे सिटी पॅलेस.

१९४९ पर्यंत याच सिटी पॅलेसमधून राजकारभार चालत असे. आजही सिटी पॅलेसमध्ये त्यावेळचा दरबाराचा भाग पाहायला मिळतो. याखेरीज राजपूत राजांची अस्सल चित्रे, बंदुका, पिस्तुले, रायफल, तलवारी, वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली, कट्यारी, खुकरी, गुप्ती, चिलखत, जिरेटोप ते अगदी राजांचे विलासी आयुष्य दाखवणारा खास पाठ खाजवण्यासाठी तयार केलेला धातूचा दांडाही सिटी पॅलेसमध्ये आहे.

याखेरीज जयपूर आणि तिथल्या माणसांचा पेहरावाची ओळख पटावी म्हणून जयपुरी वेशभूषेचे नमुने ठेवण्यात आले आहेत. यात एक साडी तर महाराणी गायत्री देवी यांची आहे. गायत्री देवी यांनी त्याकाळी ज्या प्रकारच्या साड्या नेसल्या त्या आता ‘महाराणी साडी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. गायत्री देवी यांच्या साडीची डिट्टो कॉपी आम्हीच विकतो असं ठासून सांगणारी अनेक दुकानं तुम्हाला जयपूरमध्ये पाहायला मिळतील.

संपूर्ण महाल पाहण्यासाठी १ ते दीड तासांचा अवधी पुरतो. महालापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंतरमंतर आहे. जंतरमंतर ही एक वेधशाळा आहे. जयपूरचे महाराजा जयसिंग यांनी अशा प्रकारच्या प्रचंड वेधशाळा दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा या ५ जागी बांधल्या. जयपूरची वेधशाळा अन्य ४ पेक्षा सर्वात मोठी आहे. येथे सूर्याच्या स्थितीवरून वेळ सांगणारा जगातील सर्वात मोठा खडक आहे.

ग्रहणाचं भाकीत, अचूक वेळ सांगणं, पंचांग आणि प्रत्येक राशी आणि तिच्या ग्रहांची स्थिती माहित व्हावी यासाठी या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारती आकाराने वेगवेगळ्या पण समान बनावटीच्या वाटू शकतात पण जवळून पाहिल्यास सर्वांमध्ये मोठा फरक आढळतो. १२ राशींच्या बारा इमारती तर त्या त्या राशींच्या ग्रहांच्या स्थितींसाठी खास तयार करण्यात आल्या आहेत. जंतरमंतरवरील सर्वात मोठं ‘विराट सम्राट यंत्र’ तर अचूक वेळ सांगतं. टोकावर असलेली छत्री ही ग्रहणांच भाकीत करते. खरं तर याला यंत्र म्हणण्यापेक्षा इमारत म्हणणं जास्त योग्य ठरेल.

(विराट सम्राट यंत्र’)

या सर्व इमारती आजही सुस्थितीत आहेत. म्हणूनच युनिस्कोने जयपूरच्या जंतरमंतरला जागतिक वारसा यादीत सामील केलं आहे. आजही जयपूरमध्ये जंतरमंतरच्या आधारे दरवर्षी पंचांग तयार केलं जातं.

 

या यादीत आणखी एक नाव जोडता आलं असतं पण ते जोडलेलं नाही. हे ठिकाण म्हणजे जयपूर शहरापासून अगदी जवळ असलेला जलमहाल. एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे जलमहाल बघण्यास बंदी घालण्यात आली आहे. जयगडावरून या महालाचं आणि तलावाचं मनोहारी दृश्य दिसतं.

(जलमहाल)

तर मंडळी, ही आहेत जयपूर मधली ती ५ ठिकाणं जी पाहायलाच हवीत.

 

(फोटो सौजन्य: रामचंद्र रणशूर)

सबस्क्राईब करा

* indicates required