ट्रम्प तात्यांचा गेम ते अॅपल न्यूटन....जाणून घ्या आपटलेल्या उत्पादनांच्या म्युझियमबद्दल !!

मोठमोठ्या कंपन्या बाजारात नवनवीन उत्पादन आणून जास्तीतजास्त ग्राहक ओढण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी प्रतिस्पर्ध्याकडे नसलेलं आणि आजवर कोणीही पाहिलं नसेल असं उत्पादन बाजारात आणण्याचा प्रयोग केला जातो. असे प्रयोग यशस्वी देखील होतात, पण काही जबरदस्त आपटतात.
आज आम्ही अशाच ‘आपटलेल्या’ उत्पादनाची यादी देणार आहोत. यासाठी निमित्त ठरलंय ‘म्युझियम ऑफ फेल्यूअर’. कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेल्स शहरात जून २०१७ रोजी हे संग्रहालय सुरु झालं. हे संग्रहालय १०० अपयशी ठरलेल्या उत्पादनांना वाहिलेलं आहे. यामध्ये लहानसहान कंपन्यांपासून ते मोठमोठ्या कंपन्यांची उत्पादनं आहेत. उदाहरणार्थ, कोकाकोला, हेंज, नोकिया आणि अॅपल. एक उत्पादन तर ट्रम्प यांच्या कंपनीने तयार केलेलं आहे.
आज आपण या संग्रहालयातील ५ महत्त्वाची उत्पादनं पाहणार आहोत.
१. नोकिया एन-गेज

२००० सालची गोष्ट आहे. लोकांना गेमसाठी वेगळं उपकरण घ्यावं लागायचं. आजच्यासारखं सगळं काही मोबाईलमध्ये सामावलेलं नव्हतं. नोकियाने मोबाईल फोन आणि गेम एकत्र करून नवीन मोबाईल फोन तयार केला. त्याचं नाव होतं “नोकिया एन-गेज”.
एन-गेज मोबाईल अपयशी ठरण्याची बरीच करणे होती. महत्त्वाचं कारण म्हणजे या कल्पनेची व्यवस्थित अंमलबजावणी झाली नाही. शिवाय हा फोन वापरण्यासाठी अवघड होता. गेम्स बदलण्यासाठी फोन नेहमी उघडावा लागायचा. फोनवर बोलण्यासाठी फोन वाकडा धरून बोलावं लागायचं.
महत्त्वाची गोष्ट अशी की फोन जरी अपयशी ठरला तरी त्यामुळे फिनलंडच्या मोबाईल गेमिंग व्यवसायाला सोन्याचे दिवस आले. तिथूनच आजच्या प्रसिद्ध ‘अॅग्री बर्ड्स’चा जन्म झाला.
२. रीजुवेनिटिंग फेशियल टोनिंग मास्क
हा मास्क एखाद्या हॉरर सिनेमाला शोभेल असा आहे. या मास्कच्या आत विजेच्या तारा जोडण्यात आल्या होत्या. या विजेच्या मार्फत फेशियल टोनिंग करण्याची ही कल्पना होती. थोडक्यात चेहऱ्याला विजेचे झटके द्यायचे. हे १५ मिनिटं केलं की फेशियल टोनिंग पूर्ण.
हे उत्पादन बाजारात केवळ १ वर्ष टिकलं. चेहऱ्याला विजेचा झटका देण्याची आयडिया कोणालाच आवडली नाही. ज्यांनी हे वापरलं त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘हा मास्क लावल्यानंतर चेहऱ्याला असंख्य मुंग्या चावत असल्याचा भास व्हायचा.’
३. अॅपल न्यूटन
१९८७ साली अॅपलने ‘अॅपल न्यूटन’ नावाचा PDA म्हणजे पर्सनल डिव्हाईस असिस्टंट बाजारात आणला होता. PDA हा आजच्या मोबाईल सारखाच प्रकार होता. PDA शी इंटरनेट जोडता यायचं, मेमरी कार्ड जोडता यायचं, तसेच ऑडीओ सुविधा होती, टेलिफोनसारखा वापर करता यायचा. महत्त्वाचं म्हणजे PDA टच स्क्रीन असायचा.
handwriting recognition प्रणाली असलेलं अॅपल न्यूटन हे मोजक्या PDA पैकी एक होतं. याच वेगळेपणामुळे अॅपल न्यूटन बाजारातून बाहेर पडलं. अॅपल न्यूटन हे न्यूटन OS वर चालायचं. त्यासाठी अॅपल कंपनीला मोठी रक्कम मोजावी लागळी होती. दुसरं कारण म्हणजे handwriting recognition प्रणालीत वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागल्या होत्या. हे सर्व लक्षात घेऊन स्टीव्ह जॉब्स यांनी अॅपल न्यूटनचं उत्पादन बंद केलं.
४. ट्रम्प : दि गेम
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नावावर एक बोर्ड गेम तयार केला होता. १९८९ साली हा गेम बाजारात आला. गेम बनवणाऱ्या मिल्टन ब्रॅडली कंपनीने लावलेल्या अंदाजाप्रमाणे २० लाख बोर्ड गेम विकले जाण्याची शक्यता होती, पण केवळ ८ लाख बोर्ड गेम विकले गेले.
‘ट्रम्प : दि गेम’च्या जाहिरातीत डोनाल्ड ट्रम्प स्वतः दिसले होते. पण लोकांनी अपेक्षेपेक्षा फारच वाईट प्रतिसाद दिला. यावर ट्रम्प म्हणाले की लोकांना हा गेम कठीण वाटला असावा. त्याचं एक कारण असं होतं की या बोर्ड गेमची नियमपुस्तिका तब्बल १२ पानांची होती. एका जाणकाराने दिलेलं कारण असं की लोकांना वाटलं ट्रम्पसारख्या श्रीमंत व्यक्तीने हा गेम आपला खिसा भरण्यासाठी केला आहे, पण खरं तर मिळकतीतला अर्धा पैसा दान करण्यात येणार होता.
५. हाईन्झ कंपनीचा ‘हिरवा केचअप’
२००० च्या सुमारास हाईन्झने केचअपच्या उत्पादनात नवीन प्रयोग म्हणून “Heinz EZ Squirt” नावाची नवीन रेंज बाजारात आणली होती. या खास लहान मुलांसाठीच्या केचअपच्या बाटल्या होत्या. याची खासियत म्हणजे नेहमीच्या लाल केचअपच्या सोबत हिरव्या रंगातील केचअप तयार करण्यात आला होता. हा नवीन प्रकार मुलांमध्ये लगेचच हिट ठरला.
यानंतर हाईन्झने केशरी, जांभळा, निळा, गुलाबी असे आणखी रंग बाजारात आणले. हे रंगसुद्धा प्रसिद्ध झाले. मग हे उत्पादन अपयशी उत्पादनांच्या यादीत कसं ?
तर, मुलांना काही काळाने अशा रंगीबेरंगी केचअप्सचा कंटाळा आला. मुलं एखाद्याच रंगातला केचअप खायचे. घरात केचअपच्या सतरंगी बाटल्या अर्धवट पडलेल्या असायच्या. त्यामुळे मुलांच्या आया पण कंटाळल्या. परिणामी हाईन्झने पुन्हा लाल रंगच्या केचअप पुरतं मर्यादित झालं.
तर मंडळी, ग्राहक राजा असतो हेच यातून सिद्ध होतं.