वॉरन बफेंचा टू लिस्ट फंडा काय आहे? तो तुमचं ध्येय गाठायला कसा मदत करेल?

कोणत्याही बाबतीत सल्ला घ्यायचाच झाला तर ‘वॉरन बफे’ सारखा दुसरा सल्लागार मिळणार नाही. का म्हणून काय विचारता? वॉरन बफे जगातल्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांचं चरित्र आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या आयडीयाज असलेली पुस्तकं जगात ‘बेस्टसेलर’च्या यादीत आहेत. मुंबईत रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या पुस्तकांमध्ये वॉरन बफे यांचं पुस्तक हमखास असतं.
तर, आपल्याला पुस्तकं वाचायला तेवढा वेळ नाही, म्हणून आज आम्ही तुम्हाला वॉरन बफे यांचा एक सल्ला थोडक्यात सांगणार आहोत. हा सल्ला तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यास नक्कीच मदत करेल. वॉरन बफे यांनी सल्ला दिला आहे ‘2-List Strategy’ चा!! याचा अर्थ जाणून घेण्यापूर्वी यामागचा किस्सा वाचूया.
(माईक फ्लिंट)
माईक फ्लिंट नावाचा बफे यांचा खाजगी पायलट होता. त्याने बफे यांच्यासाठी १० वर्षं काम केलं. एके दिवशी तो बफे यांच्या सोबत आपल्या करियरबद्दल बोलत होता. बफेंनी त्याला मध्येच थांबवून त्याने काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन म्हणजेच ‘2-List Strategy’.
काय करायचं आहे या ‘2-List Strategy’ मध्ये?
१. तुमच्या करियरमध्ये तुम्हाला गाठायचे असलेले २५ लक्ष्य लिहून काढा. हे लक्ष्य एका आठवड्यासाठी किंवा वर्षभरासाठी असले तरी हरकत नाही.
२. या २५ पैकी ५ अत्यंत महत्वाचे लक्ष्य निवडा.
३. ज्या ५ महत्त्वाच्या लक्ष्यांना तुम्ही निवडलं ते A यादीत जातील आणि उरलेले B यादीत जातील. अशाप्रकारे तुमच्याकडे २ याद्या तयार होतील.
पुढे काय ?
वॉरन बफे यांच्या मते तुमच्याकडे असलेल्या B यादीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. B यादी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, पण जोपर्यंत A यादीचं लक्ष्य पूर्ण होत नाही तोवर B कडे ढुंकूनही पाहू नका.
आपल्या यादीतून अशा २० गोष्टी बाजूला काढायचं काम कठीण आहे, पण याच २० गोष्टी त्या महत्त्वाच्या ५ गोष्टी पूर्ण करण्यात अडथळा निर्माण करू शकतात. तुमच्या यादीतल्या २५ च्या २५ गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात. पण A यादीतल्या ५ गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. लेखक जेम्स क्लियर म्हणतात त्याप्रमाणे ‘दुय्यम दर्जाच्या कामावर जास्त लक्ष दिल्याने न केलेल्या कामांची यादी वाढत जाते.’
तर मंडळी, हे फारच सोप्पं काम आहे. खरी परीक्षा आहे या यादीनुसार काम करण्याची, आपल्या ध्येयावर टिकून राहण्याची आणि आळस झटकण्याची. चला तर मग लागा कामाला. या यादीत तुम्हांला कदाचित नवीन वर्षाचा संकल्पही सापडेल.