computer

क्रेंद्र सरकारची अग्नीपथ योजना आणि त्यातल्या तरतूदी नेमक्या काय आहेत?

केंद्र सरकारकडून सैन्यात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक नवी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचे नाव आहे अग्निपथ!! नावाप्रमाणेच अतिशय महत्वाकांक्षी अशी ही योजना आहे. आजवर सैन्य भरतीसाठी राबवल्या गेलेल्या सर्वाधिक मोठया स्तरावरील योजनेत हिचा समावेश होऊ शकतो. अग्निपथबद्दल सोप्या भाषेत सांगायचे तर एका विशिष्ट कालावधीसाठी देशसेवेची संधी आणि या काळात सैन्यातील पगार आणि इतर सर्व सुविधा मिळू शकतील अशा पद्धतीने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या युवकांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. अग्निपथचा कालावधी हा ४ वर्षांचा आहे. या ४ वर्षांसाठी यात सहभागी असलेला तरुणांना प्रत्यक्ष सैन्यातील जवानांसारखेच सर्व प्रशिक्षण आणि इतर सोयी मिळतील. या काळात पगार आणि ४ वर्ष संपल्यावर काय? यासाठी देखील भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.

या योजनेनुसार सैन्यात जे तरुण सहभागी होतील, त्यांतील २५% तरुण सैन्यात पुढील काळात सहभागी होऊ शकतील. याचा अर्थ ते निवृत्तीपर्यंतचा म्हणजे पुढील १५ वर्षांचा कार्यकाळ सैन्यात पूर्ण करतील. यासाठी १७.५ ते २१ असा वयोगट निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या वयोगटात असणारा कुणीही या योजनेनुसार सैन्यात जाण्यासाठी अर्ज करू शकतो.

१० वी आणि १२ वी पास तरुणांना अग्निपथमध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्ज करता येईल. विशेष म्हणजे ज्यांची १२ वी बाकी आहे, त्यांना सैन्यातच १२ वी करता येईल. सुरुवातीचे ६ महिने हे ट्रेनिंगचे असतील. या काळात अग्नीवीरांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येईल.

यांचा पगाराचा पॅटर्न हा दरवर्षी बदलत जाईल. पहिल्या वर्षी ३०,०००, दुसऱ्या वर्षी ३३,००० तिसऱ्या वर्षी ३६,५००, तर चौथ्या आणि शेवटच्या वर्षी ४०,००० मोबदला मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर सेवाकाळ संपल्यावर ११.७ लाख रुपये सेवानिधी म्हणून मिळणार आहेत. हा पैसा टॅक्सफ्री असेल म्हणजे ही संपूर्ण रकम या तरुणांना मिळेल.

या ४ वर्षांच्या काळात जर दुर्दैवाने एखादा तरुण शहीद झाला तर त्याला उरलेल्या कालावधीचा संपूर्ण पगार दिला जाईल. त्याचप्रमाणे त्याला सुरुवातीपासूनच ४८ लाखांचे विमा कव्हर दिलेले असेल. त्याचप्रमाणे जर एखादा दिव्यांग होत असेल तर त्यालाही सेवनिधी व्यतिरिक्त संपूर्ण पगार दिला जाईल. सोबत दिव्यांग सरासरीनुसार ४४ लाख रुपये दिले जातील.

यात भरती होणाऱ्या तरुणांना सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये प्राध्यान्य दिले जाईल. पुढील ३ महिन्यांत या योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरू होईल आणि २०२३ सालापासून पहिली बॅच सुरू होणार आहे.

अग्निपथ योजनेत सहभागी होऊन अग्निवीर होणारे तरुण जेव्हा सैन्यातून ४ वर्ष पूर्ण करून बाहेर येतील तेव्हा त्यांना सैन्यातील अनुभवाचा प्रचंड फायदा होऊ शकतो. त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कणखर असेल. निर्णयक्षमता, काम संपवण्याची हातोटी अशा त्यांच्या उजव्या बाजू त्यावेळी असतील ज्याचा थेट फायदा त्यांना पुढील आयुष्यात होईल.

 

सबस्क्राईब करा

* indicates required