BH Series म्हणजे काय? त्याचे नियम काय आहेत हे समजून घ्या.

भारतात वाहनधारकांसाठी एक नवा बदल होणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) वाहनाच्या क्रमांकाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. वाहनांसाठी नवीन रजिस्ट्रेशन चिन्ह एका नव्या सिरीजने सुरु केले जाणार आहेत. वाहनांचे क्रमांक आता BH Series ने सुरू होणार आहेत. त्यामुळे विविध कारणांनी कामास्तव अथवा इतर कारणांसाठी राज्य बदलावे लागत असणाऱ्या नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. राज्य बदलल्यानंतर वाहन नोंदणीचा त्रास आता होणार नाही. BH Series म्हणजे काय? त्याचे नियम काय आहेत हे समजून घ्या.

अनेक जणांना कामानिमित्त बऱ्याचदा वेगवेगळ्या राज्यात जावे लागते. बदल्यांची नोकरी किंवा फिरता व्यवसाय असेल तर दुसऱ्या राज्यात अधिक काळ राहावे लागते. त्यामुळे आपले वाहनही घेऊन जावे लागते. सध्या भारतात प्रत्येक राज्या आणि त्यातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विशिष्ट कोड आहे. या पद्धतीमुळे नंबर प्लेट वाचताच ते वाहन कोणत्या राज्यातले आहे, तिथल्या कोणत्या जिल्ह्यातले आहे हे सहज कळू शकते. म्हणजे समजा वाहन महाराष्ट्रात रजिस्टर असेल तर नंबर MH सिरीज ने सुरू होतो. हा नंबर दुसऱ्या राज्यात एक वर्षापर्यंत रजिस्टर न करता वापरता येतो. परंतु एक वर्षापेक्षा अधिक काळ राहायचे असल्यास त्या राज्यातील राज्य प्राधिकरणाकडे आपल्या वाहनाची पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागते. नव्याने नोंद केल्यास ज्या राज्यात मुक्काम असेल तेथील नंबर सिरीज मिळतो. म्हणजे गोवा असेल तर GA आणि पुढे नंबर दिला जाईल. अर्थातच यासाठी खर्च ही येतो आणि वेळही जातो. म्हणूनच अश्या वाहनधारकांना BH सिरीज सुरू झाली आहे. याअंतर्गत नवीन BH सीरीज वाहनांना नोंदणीच्या कोणत्याही हस्तांतरणाची आवश्यकता लागणार नाही आणि ही वाहने देशभरात कुठेही प्रवास करू शकतील. सोप्या भाषेत सांगायचे तर जर BH नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली तर दुसऱ्या राज्यात जाताना वाहन मालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही.

डिफेन्स, केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी कार्यालये ४ किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहेत अशा खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना ही सुविधा ऐच्छिक आहे. BH रजिस्ट्रेशनचा फॉर्मॅट YY BH 5529 XX YY असा ठेवण्यात आला आहे. यामध्ये पहिले दोन अंक रजिस्ट्रेशनचे वर्ष BH - भारत सीरीज कोड 4 - 0000 ते 9999 XX अल्फाबेट्स (AA ते ZZ) असा असणार आहे. म्हणजे यावर्षी या योजनेअंतर्गत गाडी रजिस्टर केली तर 21BH1234MH असा गाडी नंबर असू शकतो.

जुन्या वाहनांना याचा फायदा होणार नसला तरी नवीन वाहने घेणाऱ्या नागरिकांना नक्की फायदा होणार आहे. तसेच BH सीरीज अंतर्गत मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा ४,६,८ वर्षांसाठी आकारला जाईल. खाजगी वाहनांना नवीन राज्यात स्थलांतरित केल्यावर या योजनेमुळे मोफत प्रवास करता येईल. लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required