computer

हवेलीसारखे रूप, खेळती हवा, सब्यासाची डिझाइन आणि काय काय आहे या राजस्थानातल्या नव्या शाळेत?

तुम्हाला शाळा म्हणलं की काय आठवते? शाळेची जुनी इमारत त्यामध्ये असलेले वर्ग, खेळण्याचे मैदान, शिक्षक, मित्र. अगदी कितीही मोठे झालो तरी शाळेची इमारत आणि वर्ग तर आपण कधीच विसरू शकत नाही.

आता काळ बराच पुढे आला आहे. शिक्षणासोबतच शाळेच्या इमारतीच्या बाबतीतही प्रयोग होताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये अशीच एक शाळा आहे. ही शाळा बाहेरून एखाद्या किल्ला, हवेली सारखी घडवलेली दिसते. या शाळेचे फोटो सध्या त्याचे सोशल मिडीयावर फिरत आहेत आणि शाळेचं जोरदार कौतुक होत आहे.

राजस्थानच्या जैसलमेर येथे कनोई नावाच्या गावात राजकुमारी रत्नावती भाटी नावाची मुलींची शाळा आहे. या शाळेची इमारत स्थापत्यशास्त्राचा वापर करून तयार केलेली उत्तम वास्तू म्हणता येईल. इमारतीची निर्मिती पिवळ्या वाळूच्या खडकापासून बनवली आहे. शाळेच्या भिंती तयार करताना त्यांना जाळीदार आकार देण्यात आला आहे, त्यामुळे आत हवा खेळती राहते. छतही पूर्णपणे बंद नसल्याने प्रकाश आणि हवा आत येत राहते. या वेगळ्या रचनेमुळे बाहेरचं तापमान ५० डिग्रीच्या वर गेले तरी शाळेच्या आत उष्णता जाणवत नाही.

इथे ४०० मुली शिक्षण घेतात. बालवाडी ते १०वी पर्यंतचे शिक्षण इथे होते. या भागात गरीब मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीत ३ विभाग आहेत. पहिल्या ज्ञान विभागात शाळा आहे. मेधा विभागात लायब्ररी आणि संग्रहालय आहे आणि तिसरा विभाग खास स्त्रियांसाठी बनवला गेला आहे. या विभागात मुलींच्या आई किंवा इतर स्त्रिया विणकाम, एम्ब्रॉयडरी अश्या कला मोफत शिकू शकतात. तिथे प्रदर्शन भरवून विक्रीही करू शकतात.

शाळेची वास्तुरचना आर्किटेक्ट डायना केलॉग यांनी केली आहे. याखेरीज दुसरी खास गोष्ट म्हणजे मुलींच्या गणवेशाचे डिझाईन प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी केले आहे.

शाळेच्या इमारतीपासून ते गणवेशापर्यंत सगळ्याच गोष्टी खास म्हणता येतील. सध्या सगळ्याच शाळा बंद असल्याने ही शाळा देखील बंद आहे. पुढे जाऊन जेव्हा सगळं सुरळीत होईल तेव्हा या शाळेला भेट देणार का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!

 

लेखिका : शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required