computer

रशियातल्या या विचित्र बसथांब्यांमागचं रहस्य काय आहे?

प्रवासात माणसाला कशाचा शोध लागेल काही सांगता येत नाही! आता हेच बघा ना. पत्रकार ख्रिस हरविगला रशियात जे सापडलं ते पाहून तो अक्षरशः चक्रावून गेला! आपल्या लंडन ते सेंट पिट्सबर्ग या भल्यामोठ्या सफरीत ख्रिसला रशियातल्या बसथांब्यांचं जे काही दर्शन झालं ते अतिशय कलात्मक, अनपेक्षित आणि विलोभनीय होत असंच म्हणावं लागेल..!! तो जसजसा या सफरीत पुढे जात राहिला, तसतसं त्याला एकमेवाद्वितीय अशा रचनांचं दर्शन होत गेलं!

ख्रिसच बालपण कॅनडात गेलं. त्याला रशियाबद्दल एक गूढ असं आकर्षण होतं. रशिया म्हणजे कडक निर्बंध असलेला साम्यवादी देश. परंतु या आकर्षणातूनच त्याने राशियातल्या या विलोभनीय रचना शोधून काढल्या.

"हे असे बसथांबे रशियात का निर्माण झाले याचा शोध घेण्यासाठीच मी त्यांच्या मागे फिरत राहिलो. इथला प्रत्येक थांबा एवढा अनपेक्षितरित्या तयार केला आहे की तुम्ही प्रत्येकवेळी आश्चर्यचकित होता! हे असे बसथांबे बनाविण्यामागचा उद्देश काय? असा प्रश्नच तुम्हाला पडतो! रशियामध्ये सगळं काही प्लॅनिंग करून बनवलं गेलं आहे अपवाद फक्त या बसथांब्यांचा!" ख्रिस सांगत होता.

इथलं प्रत्येक डिझाईन हे वेगळं आहे आणि भोवताली राहणाऱ्या लोकांनी त्याची रचना केली आहे. काही बसथांबे रशियातल्या कम्युनिझमचं प्रतिबिंब आहेत. तसेच अजूनही लोक इथले बसथांबे आपल्या हातांनी रंगवतात.

ख्रिसने या बसथांब्यांवर भरपूर संशोधन केलं. त्याने याकामी नियुक्त केलेल्या कलाकारांचीसुद्धा भेट घेतली. परंतु त्याला हे बसथांबे इथल्या स्थानिक लोकांकडून का बनवून घेण्यात आले याचा मात्र अजून शोध लागला नाही. हां, त्याला एवढं कळलं की इथल्या स्थानिक लोकांनी, कलाकारांनी, रस्ते बनविणाऱ्या मजुरांनीच या बसथांब्यांची रचना केली आहे.

या प्रोजेक्टवर तू चौदा वर्षे का घालवलीस असं ख्रिसला विचारल्यावर तो म्हणतो,"एक फोटोग्राफर म्हणून तुम्हाला असं काही हवं असतं ज्यात तुम्ही पूर्णपणे हरवून जाता. आणि ते हरवण तुम्ही एन्जॉय करता! ही बसस्थानके पाहून मला असंच काहीतरी वाटत होतं! मला वाटत होत मी काहीतरी नवीन शोध लावतोय!"

अर्मेनियातल्या एका ओसाड जमिनीवर ड्रायव्हिंग करत असताना त्याने एक बसस्थानक पाहिलं आणि तो अचानक थांबला. तो बसथांबा एकाचवेळी अतिशय जड सिमेंटने भरलेला आणि अतिशय हलका तसेच मजेशीर वाटत होता! तो म्हणतो,"एखादं अंतराळयानच तिथं उतरलं आहे की काय असं वाटत होतं! तो बसथांबा शोधणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. त्यात कला आणि संस्कृतीचा मिलाफ झाला होता!"

ख्रिसला त्याच्या भविष्यातल्या योजनांबद्दल विचारलं असता तो म्हणतो,"हे सगळे थांबे नष्ट व्हायच्या आत मला यांची एकदा शेवटची ट्रीप करण्याची खूप इच्छा आहे!" ही ट्रिप त्याला काळया समुद्रापासून पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरापर्यंतचा प्रवास घडवेल! तो लोकांना अधिक चांगल्या जगाचं दर्शन घडवू शकेल अशी त्याला आशा आहे.

(ख्रिस हरविग)

तो म्हणतो,"जगाच्या राजकारणात काहीही चाललेलं असू दे, एक देश काय करतो आणि त्या देशातले नागरिक काय करतात यात खूप फरक असतो! प्रवास करताना लोकांनी फक्त नेहमीच्या गोष्टी पाहण्याऐवजी अशा गोष्टींचा शोध घ्यावा ज्यांचा अजून जगाला शोध लागला नाही!"

हे आगळीवेगले बसथांबे पाहून आपल्यालाही ख्रिसला वाटलेलं कुतूहल वाटत राहातं खरं...

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required