थेट फोर्ब्जच्या पॉवरफुल महिलांच्या यादीत स्थान मिळवणारी ओदिशातील आशा सेविका!! काय केलं आहे यांनी?

फोर्ब्सकडून दरवर्षी विविध क्षेत्रातील लोकांची माहिती दिली जाते. यात श्रीमंत लोक, पॉवरफुल लोक यांची यादी दिलेली असते. भारतात पॉवरफुल महिलांच्या यादीत अनेक कर्तृत्ववान महिलांचा समावेश होत असतो. भारतातील महिलांना मोठ्या प्रमाणावर या पॉवरफुल महिलांकडून प्रेरणा मिळत असते. यावेळची फोर्ब्सची यादी मात्र एका कारणाने विशेष आहे. या यादीत पॉवरफुल महिला म्हणून थेट एका आशा सेविकेला स्थान मिळाले आहे.

मातीलदा कुल्लू असे या आशा सेविकेचे नाव आहे. मातीलदा अशा गावात काम करतात जिथे लोक दवाखाण्यात जाण्याऐवजी जादुटोणा आणि अशाच गोष्टींवर विश्वास ठेवून उपचारासाठी घेतात. ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील गरगडबहल या गावात ४५ वर्षीय मातीलदा काम करतात. आता मातीलदा यांनी देशभरातील करोडोंची श्रींमती असलेल्या आणि महत्वाच्या पदांवर असलेल्या महिलांच्या यादीत नाव येण्यासारखे कुठले कार्य केले हे आता जाणून घ्या.

मातीलदा यांनी १५ वर्षापूर्वी जेव्हा काम सुरू केले तेव्हा तेथील परिस्थिती अतिशय कठीण होती. लोकांना तेव्हा उपचारासाठी दवाखाण्यात जा असे सांगितले तरी लोक ते हसून दुर्लक्ष करत होते. दवाखान्यात जाण्याऐवजी ते गावातील जादूटोणा करणाऱ्यांकडे जात असत. पण मातीलदा यांनी या लोकांचे समुपदेशन करण्यास सुरूवात केली.

सकाळी ५ वाजेला उठून आपले घरकाम करून, गुरांना चारा देऊन, कुटूंबाचा स्वयंपाक करून त्या दररोजच्या कामाला निघत असत. सायकलवर रोज लोकांच्या घरोघर जाऊन त्या नवजात बालकांचे चेकअप, गर्भवती महिलांना आरोग्याच्या गोष्टी सांगणे, लोकांना उपचाराचे महत्व पटवून देणे. यासारख्या गोष्टी हताश न होता करत होत्या.

जेव्हा कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला, तेव्हा त्यांनी जीवाची जोखीम घेऊन रोजच्या रोज ५०-६० लोकांची चाचणी घेण्यास सुरुवात केली. यातही लोक टेस्ट करायला तयार होत नसत, मोठ्या प्रयासाने त्यांना तयार करावे लागायचे. यावेळी त्यांना बेसिक गोष्टी सुद्धा उपलब्ध नव्हत्या. तरीही त्यांनी आपले काम सुरू ठेवले.

लसीकरणावेळीही हीच समस्या होती. तरीही त्यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. एका पूर्णपणे अंधश्रद्धा मानणाऱ्या गावात आधुनिक वैद्यकीय उपचार घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करून त्यांनी. चुकीच्या उपचारामुळे होणारी हानी थांबवली आहे. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर अनेक माता आणि बालकांना या चुकीच्या उपचारामुळे मोठी किंमत चुकवावी लागत होती. पण मातीलदा यांच्या प्रयत्नांमुळे या गोष्टींना आळा बसला आहे.

आशा वर्कर्सना अतिशय कमी वेतनात काम करावे लागते. मातीलदा यांनी मात्र लोकांच्या समस्या कमी व्हाव्यात या प्रमाणिक हेतूने काम सुरू ठेवले. याचाच सन्मान म्हणून आज त्या भारतातील पॉवरफुल महिलांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत.

लहान स्तरावर का होईना पण प्रामाणिकपणे काम केले तर त्याची दखल घेतली जाते हे अनेक उदाहरणांनी समोर आले आहे. म्हणून मातीलदा यांच्या सारख्या महिला इतरांना पण प्रेरणादायी आहेत.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required