बॅटलग्राऊंड इंडियाचा नवा घोळ... भारतीय यूजर्सचा डेटा पुन्हा चिनी सर्व्हर्सवर पाठवला जातोय?
भारत सरकारनं गेल्या वर्षी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणात्सव अनेक चायनिज ॲप्सवर बंदी आणली. यात देशात प्रचंड लोकप्रिय बनलेला मोबाईल गेम PUBG चाही समावेश होता. भारतात तब्बल १७ कोटींहून अधिकवेळा डाउनलोड केल्या गेलेल्या PUBG वर बंदी येण्याचं कारण होतं ते या गेमिंग ॲपच्या माध्यमातून होणारा यूजर्सच्या माहितीचा गैरवापर. भारतीय यूजर्सचा डेटा चिनी सर्व्हर्समध्ये साठवला जात असल्यामुळे देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण होत असल्याचं भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं.
PUBG या गेमचे मालकी हक्क 'Krafton Inc' या दक्षिण कोरियाई कंपनीकडे असले तरी, 'PUBG मोबाइल' हा स्मार्टफोन गेम Tensent या Krafton च्या चायनीज भागीदार कंपनीनं बनवला होता. त्यामुळे जगभरातल्या PUBG वापरकर्त्यांच्या डेटा हा Tensent च्या चिनी सर्व्हर्समध्ये साठवला जायचा. पण सुरक्षेच्या कारणामुळं भारतासोबत अन्य काही देशांनी गेमवर बंदी घातल्यानंतर क्राफ्टननं भारतात नव्या रूपात PUBG आणण्याची तयारी सुरु केली. गेम आणताना असा दावा करण्यात आला की, भारतीय यूजर्सचा डेटा भारतातच साठवला जाईल. आणि नुकतीच भारतात बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया (BGMI) या नावाने या गेमची बिटा आवृत्तीही रिलीज झाली आहे.
अद्याप BGMI नेमकं कधी लाँच होणार याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, चाहत्यांना तूर्तास BGMI च्या बिटा व्हर्जनमुळे गेमची झलक बघायला मिळाली आहे. आतापर्यंत या Early Acess व्हर्जनने ५० लाखाहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा पार केलाय. पण नुकतीच एक अशी बातमी बाहेर आलीय ज्यामुळं PUBG ला भारतात पुन्हा एकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 'IGN इंडिया' या गेमिंगसंबंधित संकेतस्थळानं खुलासा केलाय की नव्याने लाँच झालेल्या BGMI मधूनही प्लेयर्सचा डेटा चायनीज सर्व्हरवर पाठवला जातोय!
IGN ने या गेमच्या परीक्षणासाठी पॅकेट स्निफर ॲपचा वापर केला. पॅकेट स्निफर अँपच्या मदतीने आपण पाहू शकतो की एखादं ॲप वापरताना ते ॲप कोणत्या IP अड्रेसवर डेटा पॅकेट्स पाठवत आहे. आणि या परीक्षणात गेम खेळल्यानंतर असं दिसून आलं की यापैकी काही सर्व्हर मुंबई, मॉस्को आणि हॉंगकॉंगमधील आहेत. पण यातला एक सर्व्हर बीजिंग मधल्या 'चायना मोबाईल कम्युनिकेशन कार्पोरेशन' द्वारे चालवला जातो. त्याचबरोबर QCloude आणि AntiCheat Expert हे दोन सर्व्हरही Tensent च्या मालकीचे आहेत. त्याचबरोबर अशी माहिती सुद्धा समोर आलीय की चीनला जो डेटा पाठवला जातोय त्यात यूजर्सच्या डिव्हाईसचा डेटाही समाविष्ठ आहे.
क्राफ्टनने सांगितलं होतं की स्थानिक कायद्याचं पालन करत ते भारत सरकारसोबत काम करत आहेत. त्यांनी भारतात Tensent सोबत भागीदारी मोडली असून नव्या गेमचे सर्व्हर हे भारत आणि सिंगापुर मध्येच असतील. पण यासोबत अटींमध्ये हेही सांगितलं होतं की कायदेशीर गरजांसाठी यूजर्सचा डेटा परदेशात पाठवला जाऊ शकतो. अद्याप IGN च्या या दाव्यावर Krafton कडून कोणताही अधिकृत खुलासा झालेला नसला तरी, या खळबळजनक बातमीमुळं देशात परत एकदा या गेमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' या व्यापारी संघटनेनं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला या गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारं पत्रंही लिहलंय.
जर खरंच परत एकदा या गेमच्या माध्यमातून भारतीय यूजर्सचा डेटा विदेशात साठवला जात असेल, तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. बाकी याबतीत तुमचं मत कमेंट करून नक्की मांडा!




