रोज एक आवळा खा आणि नेहमीच तरूण दिसा.. आवळा खाण्याचे फायदे घ्या जाणून..

राजा ययातीला राजाला चिरतारुण्य हवे होते,  म्हणून त्याने मुलाचेही आयुष्य मागून घेतले अशी कथा आहे. या युगात अगदी सख्खा मित्र गायछापची पुडी पण देत नाही.  मग आयुष्य देणे-घेणे तर दूरच,  नाही का ?
पण सदासर्वदा तरुण राहण्याचे उपाय जो तो शोधत असतो. खरे म्हणजे अशा एव्हरग्रीन आयुष्याचे औषध बाजारात अगदी सहज मिळते. होय, आम्ही आज तुम्हाला आवळ्याच्या गुणधर्मांविषयी सांगणार आहोत .


सतत सर्दी असलेला, कायम नाकाशी रुमाल धरलेला, दर मिनिटाला शिंकणारा माणूस प्रेमात पडणार कसा??   
सर्व सामान्य सर्दीपडशावर तर आवळा म्हणजे एक नंबरचे औषध! दोन चमचे आवळ्याचा रस आणि दोन चमचे मध रोज सकाळी नियमित एकत्र करून घ्या आणि बघा सर्दीपडसे कसे लवकर पळते ते! 
आवळा म्हणजे अखंड तारुण्याचा स्त्रोत आहे. आवळ्यात अँटीऑक्सीडंटसचा  भरपूर साठा असतो. शरीराच्या पेशींचे आयुष्य वाढवण्याचे कार्य आणि फ्री रेडिकल कमी करणे ही दोन्ही कामे आवळा  उत्तमरीतीने करतो. जर चेहरा प्रौढत्वाच्या अकाली खुणा दाखवत असेल तर आजच आवळा किंवा  आवळ्याचा लेह खायला सुरुवात करा!

स्रोत
हृदयासाठी एक नंबर औषध म्हणजे प्रेम.  तर हृदयाला कॉलेस्टॉरॉल पासून वाचवणारे औषध म्हणजे आवळा! कॉलेस्टॉरॉल दोन प्रकारची असतात,  एलडीएल आणि एचडीएल.  या पैकी एलडीएल कोरोनरी आर्टरी म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये साचते आणि रक्ताचा पुरवठा कमी होतो. असे झाले की हार्टअटॅक येतो. आवळ्याच्या प्राशनाने हे वाईट कॉलेस्टॉरॉल कमी तयार होते. हृदय मजबूत असेल तर आपण हवे तेव्हढे प्रेम करायला मोकळे! काय म्हणता??

प्रेमाच्या आड येणारा एक मोठा आजार म्हणजे मधुमेह!  मधुमेह झाला की मधुचंद्र मावळतो.  आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्तातली साखरेची पातळी मर्यादेत राहते. आवळ्यातील पॉलीफ़ेनॉल हे नियंत्रण ठेवण्याचे काम करते. मधुमेहाचे दुष्परिणाम कमी होतात. 

स्रोत

प्रेमळ माणसाला त्याची बायको त्याला भरपूर चवीढवीचं आणि मसालेदार अन्न खायला घालते. असे अन्न पोटात गेल्यावर  जठरातल्या आम्लाची मात्रा वाढते. अपचन होते. आम्ल अतिप्रमाणात स्त्रवण्याची सवय जठराला लागली की मग ते आम्ल जठराच्या आतल्या भिंतीला कुरतडते आणि अल्सर तयार होतात. आवळ्याचा आहारात समावेश केला तर ॲसिडिटी कमी होते. सहज अन्नपचन होते. पोटात वात धरत नाही.

 फायदे सांगावे तितके कमीच आहेत . 

स्रोत


आवळा खा. चेहरा सतेज राहतो,  म्हणजे चेहरा तरुण दिसतो.
आवळा खा. केस वाढीला लागतात, मग टक्कल पडणार नाही . 
आवळा खा.  नजर साफ़ राहील,  चश्मा लागणार नाही.
असा एव्हरग्रीन चेहेरा असला की प्रेमाची कमी नाही! 
मग विचार काय करताय ?

सबस्क्राईब करा

* indicates required