शनिवार स्पेशल : चला मराठी तरुणांनो शेअर मार्केट काबीज करूया !!

शेअर बाजार -सट्टा-असं काही म्हटलं की नुकसान -कर्ज -दिवाळखोरी-असंच चित्र डोळ्यासमोर उभे राहण्याचे दिवस आता राहीले नाहीत पण अजूनही मराठी माणसाला शेअरबाजाराची आणि त्यातल्या गुंतवणूकीबद्दल जी अढी आहे ती  नाहीशी झालेली नाही. योग्य वेळी कमीत कमी गुंतवणूक करणारा भवसागर तरून जातो आणि न करणारा नवसागरात बुडून जातो. हे समजूनही अंगवळणी न पडणे ही आपली  शोकांतीका आहे. मुळात मनात पैशाची सांगड पाप पुण्याची घातलेली आहे ती वर्षानुवर्षाच्या गरीबीने. त्यामुळे गुंतवणूकीला सट्टा समजणारी आपण माणसे. जास्त पैसे कमावणे -गरजेपेक्षा चार पैसे जास्त खिशात असणे -याची पण आपल्याला भिती वाटते.

नोकरी करणाऱ्या मराठी माणसाची मानसिकता !!

स्रोत

मराठी माणसाची (शेअर बाजारातील ) प्रतिमा उत्तम नोकरी करणारा माणूस अशी आहे. सचोटीने काम करणे हे त्याचे भांडवल आहे .त्यामुळे कर्ज देणार्‍याला हवी तशी प्रतिमा (प्रोफाईल) मराठी माणसाची आहे .त्यामुळे गरजेला कर्ज घेणारा मराठी माणूस गूंतवणूक करून पैसे कमावण्याचया मार्गाला न जाता कर्ज काढून गरज भागवण्याच्या मागे असतो. साहजीकच आहे की मराठी माणसाच्या हातात शेअरबाजारातला एकही शेअर नसेल पण को ऑपरेटीवह क्रेडीट सोसायटीचे शेअर पहील्या पगाराच्या दिवशी असतील.

कदाचीत ही विधाने अतीरंजीत वाटत असतील तर फोर्टमधल्या एखादया पेपर स्टॉलवर नजर ठेवा .बर्‍याच वेळा नव्या नोकरीचे फॉर्म आणि शेअर्सच्या नव्या इश्युचे फॉर्म  एकाच पेपरवाल्याकडे असतात. तासाभरात पन्नास नोकरीचे फॉर्म विकले जातात पण आमचा मराठी माणूस फुकट मिळणारा गुंतवणूकीचा फॉर्म उचलताना दिसणार नाही. पण नोकरीतला माणूस दरवर्षी गरीब होत जातो हे सत्य आपल्या लक्षात येत नाही.

मराठी माणूस पैसे कसे खर्च करतो ?

स्रोत

आपल्याला पगार मिळतात एकूण वर्षभरात फक्त बारा. 
त्यापैकी एक फंडात जमा होतो. 
एक आयकरात जातो. 
एक वैयक्तीक कर्ज फेडण्यात जातो.
एक पगार लग्न -बारशी किंवा इतर सामाजीक जबाबदार्‍यांसाठी.
अचानक उदभवणार्‍या समस्यांसाठी एक पगार जातो. 
एक पगार विम्याचे हप्ते भरण्यात .
हातात उरले पगार सहा . त्यात खर्च चालवायचा बारा महीन्याचा. 
पुढच्या दोन वर्षात महागाई वाढली की हे प्रमाण पाच पगार आणि बारा महीने असे होईल .
म्हणजे एकूण अंदाजपत्रक असलंच तर ते तूटीचे आहे.

मग आपला संसार चालतो कसा ? 

तो चालतो कर्ज काढून किंवा हातात अचानक लाभानी येणारे पैसे वापरून किंवा दरवर्षी नवीन कर्ज काढून किंवा असलेल्या कर्जाची मुदत वाढवून. थोडक्यात काय तर आगामी भविष्यकाळातील मिळणारा वाढीव पगार  वर्तमान काळातच संपून जातो.

मग या दुष्टचक्रातून सुटका होणार कशी ?

स्रोत

दरवर्षी पैसे कमी पडत असल्याची भावना वारंवार जागृत झाल्यावर खटपट सुरु होते जास्त पैसे मिळवण्याच्या सोप्या तोडग्याची आणि मग आपली गाठ पडते पैसे खाणार्‍या लांडंग्यांशी. हे लांडगे वेगवेगळ्या नावानी आपल्या समाजात फिरत असतात. कधी त्यांचे नाव कल्पवृक्ष असते तर कधी शेरेकर तर कधी उदय आचार्य तर कधी लिमोझीन!!

गेल्या पंधरा वर्षात अशा लांड्ग्यांनी आपल्याला जवळ जवळ दहा हजार कोटींना नागवले आहे. कल्पवृक्ष मार्केटींग, सीयु मार्केटींग, शेरेकर वगैरे वगैरे. या उल्लेख केलेल्या कंपन्यांनी प्रत्येकी जवळ जवळ पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा अपहार केला आहे. 

गरीब गुंतवणूकदारांचे प्रॉव्हीडंट फंडाचे पैसे, स्वेच्छा निवृत्तीचे पैसे, अडीनडीला घरात असावेत म्हणून गृहीणींनी ठेवलेले पैसे, बॅकेपेक्षा चार पैसे जास्त मिळतील म्हणून ठेवलेले पैसे,तळहातावर ताजमहाल दाखवून या कंपन्यांनी खाऊन टाकले.

मुंबईत अशा अनेक नव्या कंपन्या येतात आणि पैसे नाहीसे होतात. एक घोटाळा संपला तरी दुसरा चालू होतोच आणि आपण परत गरीबीच्या दारात उभे !!!!!!

या लांडग्यांच्या तोंडी  घास घालण्यापेक्षा तेच पैसे फक्त आय.पी.ओ. म्हणजे नव्या कंपन्यांच्या निर्धोक गुंतवणूकीत टाकले असते  तर काय झाले असते ते पहा .फक्त गेल्या वर्षाचा म्हणजे २०१६-१७चा विचार करा. समजा गुंतवणूकीची सुरुवात जानेवारी महीन्यापासून केली असती तर डिसेंबरपर्यंत प्रत्येक गुंतवणूकीवर चांगला नफा झाला असता. म्हणजे एक वर्षात एका लाखाचे कमीतकमी दीड लाख झाले असते आणि आपले पैसे आपल्याच ताब्यात राहीले असते. एकच रस्ता आहे या गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर येण्याचा तो म्हणजे सुयोग्य गुंतवणूकीचा.

मी गुंतवणूक का करायची ?

स्रोत

कारण तुमची बचत खात्यातली रक्कम अडीच ते तीन टक्के व्याज देते-मुदतबंद खात्यावर परतावा फक्त सात टक्के मिळतो आणि महागाई सहा टक्क्यानी वाढते. म्हणजे दरवर्षी बचतीची किंमत वाढण्याऐवजी कमी होत जाते आहे. महागाईवर मात करायची असेल तर महागाईपेक्षा जास्त दरानी वाढ होईल अशाच क्षेत्रात जायला हवे. या साठी अनेक रस्ते आहेत. पण सहज सोप्पा रस्ता म्हणजे शेअर शेअर बाजारात गुंतवणूक करणे. त्याखेरीज कमोडीटी बाजारात गुंतवणूक करणे आणि फॉरेन एक्सेंजची खरेदी विक्री (फॉरेक्स मार्केट).  हे पण दोन पर्याय आहेत. दर महीत्यात उत्पन्न मिळवून देणारे तीन सोपान आहेत. सोपे आहेत म्हणून ते सोपान आहेत.

सुरुवात मात्र शेअर बाजारातून करायला हवी.

स्रोत

चला तर सुरुवात करू या डीमॅट अकाउंट सुरु करण्यापासून . हे डिमॅट खाते आहे तरी काय ? फार सोपे आहे . आपण पैसे बचत करण्यासाठी बँकेत खाते उघडतो. तसेच शेअर घेऊन जमा करण्यासाठी आणि विक्री केल्यानंतर शेअर काढण्यासाठी जे खाते असते त्याला म्हणतात डीमॅट खाते. आता या खात्यात जमा करण्यासाठी शेअर विकत घ्यायला हवेत ते घ्यायचे बाँबे स्टॉक एक्स्चेंजमधून किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधून. या बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्याला ब्रोकर किंवा मराठीत ज्याला आपण दलाल म्हणतो त्यांच्या मार्फत जावे लागते . तुमच्या पसंतीनुसार दलाल निवडा आणि त्याच्याकडे ट्रेडींग खाते उघडा . थोडक्यात आता तुमच्या कडे तीन खाती झाली .एक तुमचे बचत खाते -दुसरे डीमॅट खाते -तीसरे ट्रेडींग खाते . बचत खाते बँकेत उघडताना जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे बाकीची दोन खाती उघडताना लागतात. ही खाती सुरु केली की शेअरबाजारात येण्याची तयारी पूर्ण झाली. 

आता गुंतवणूक करायची म्हणजे भांडवल हवे.

भांडवल म्हणजे डोळ्यासमोर लाखाचे आकडे यायला नकोत. हाताशी असलेल्या पाचशे रुपयापासून ते विस पंचवीस हजारातही ही गुंतवणूक सुरु करता येते.

दुसरा प्रश्न असा की वेळेची गुंतवणूक किती ?

सुरुवातीला ट्रेन मधून येण्या जाण्याचा वेळ वाचनाला द्यावा. आणि व्यवहारासाठी दहा ते पंधरा  मिनीटे.

मग हा आटापिटा करून मिळकत किती होणार ?

समजून व्यवहार केला तर मुद्दल सुरक्षीत ठेवून वर्षाकाठी  मुद्दलावर वीस टक्के कमावणे फारसे कठीण नाही. 

आता विचार करा दोन-चार वर्षात आपले पैसे आपल्या हातात ठेवून दुप्प्ट होत असतील तर महीन्याला सात आठ टक्के देणार्‍या धोकादायक स्किम कडे जा कशाला ?
चला, शेअरबाजाराचा पासपोर्ट घेऊ या ? हा पासपोर्ट म्हणजे काय तर डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट ही पैसे कमावण्याची पहीली पायरी.

स्रोत

या, श्रीमंत होण्याची सुरुवात करू या !!!! चला तर आज एक संकल्प करू या.
या वर्षी मी पैसा कमावणार. माझी गुंतवणूक मीच करणार आणि माझा नफा मीच कमावणार. माझी कर्जे मीच फेडणार.
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आर्थीक अडचणींवर उड्डाणपूल बांधण्याचा कार्यक्रम मी या नवीन वर्षात सुरु करणार.

सबस्क्राईब करा

* indicates required