computer

नवराबायकोने भांडणामुळे बनवलीय सुखी संसाराची नियमावली...काय नियम आहेत जाणून तरी घ्या भाऊ!!

मंडळी, नवरा-बायको मधली भांडणं नेहमीचीच असतात, पण गोष्ट जेव्हा घटस्फोटापर्यंत जाते तेव्हा मात्र प्रकरण गंभीर होतं. भोपाळ मधल्या एका जोडप्याचं भांडण पण असंच पराकोटीला गेलं होतं. त्यांनी यातून एक मध्यममार्ग शोधून काढला आहे. खरं तर हा मार्ग नसून भलीमोठी नियमांची लिस्टच आहे. चला तर काय आहे हे प्रकरण समजून घेऊया.

मंडळी, या दोघांमधली भांडणं इतकी टोकाला गेली होती की दोघेही वेगवेगळे राहू लागले होते. आपल्या दोन मुलांनाही त्यांनी आपापसात वाटून घेतलं होतं. गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणार इतक्यात दोघांच्याही डोक्यात ट्यूब पेटली आणि दोघांनीही एक नियमावलीच तयार केली. अशीतशी नियमावली नाही तर १०० रुपयांच्या बॉंड पेपरवरची कायदेशीर नियमावली राव. हे नियम व अटी घेऊन दोघेही जिल्हा विधी प्राधिकरणाच्या ऑफिस मध्ये गेले. प्राधिकरणासाठी देखील हे नवीनच प्रकरण होतं.

नियम व अटी काय होत्या ?

मंडळी, भांडणात येणारा आपापल्या आईवडिलांचा मुद्दा त्यांनी निकालात काढला होता. नियमात असं लिहिलं होतं की एकमेकांच्या आईवडीलांवरून टोमणे मारायचे नाहीत. ५ दिवस पत्नीने तर शनिवार रविवार असे दोन दिवस पतीने घर सांभाळायचं. यात जेवण बनवण्याचा पण नियम लागू होतो. दोघांपैकी कोणी आजारी पडलं तर बाहेरून जेवण मागवायचं. तसंच घरातला खर्च पण वाटून घ्यायचा.

मंडळी, मुलांसाठी पण त्यांनी नियम लिहिले होते. घर सांभाळण्यासोबत मुलांचा होमवर्क पण घ्यायचा. पालक मिटिंगला एक महिना पतीने तर दुसरा महिना पत्नीने हजेरी लावायची. मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनीही पैशांची तरतूद करायची. जर घरी उशिरा येणार असाल तर तसं २ तास आधीच सांगायचं.

मंडळी, नियम आहेत तसं नियमाचं उल्लंघन केल्यास शिक्षा पण आहेत. मोठी शिक्षा म्हणजे नियम तोडल्यास वेगळं होणं. मुलांच्या बाबतीत आखून दिलेले नियम तोडले तर मुलांसोबत राहायचं नाही, उलट त्यांच्या खर्चासाठी दरमहा २० हजार रुपये द्यायचे.

मंडळी, आता हे प्रकरण जिल्हा विधी प्राधिकरणाने जिल्हा न्यायालयात पाठवलं आहे. तिथे जर या नियमांना कायदेशीर परवानगी मिळाली तर दोघांवरही कायदेशीरपणे हे नियम लागू होतील.

मंडळी, सध्या या बातमीचा एक फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे. बातमीच्या हेडलाईनचा चुकीचा अर्थ काढून असं लिहिण्यात आलं आहे, की वरील सगळे नियम शासनाने केले आहेत. तर, लग्न झालेल्या स्त्री पुरुषहो घाबरू नका. ती व्हायरल बातमी खोटी आहे.

 

मंडळी, एवढे कडक नियम लादल्यावर संसार चालेल की कोसळेल ? तुम्हाला काय वाटतं ??

सबस्क्राईब करा

* indicates required