computer

१७ वर्षांच्या पोरानं पब्जीवर उडवले तब्बल १६ लाख! बाबानंही शिकवला चांगलाच धडा...

'पब्जी'नं तरूणाईला लावलेलं वेड काही कमी व्हायचं नाव घेत नाहीय. अनेकांना या पब्जी गेमच्या व्यसनानं अक्षरशः जखडून ठेवलंय‌ आणि याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. आता हीच बातमी बघा...

हा किस्सा घडलाय पंजाबमध्ये. पब्जी खेळणाऱ्या एका १७ वर्षाच्या मुलानं आपल्या आई-वडिलांच्या बॅंक खात्यावरचे तब्बल १६ लाख रूपये पब्जीवरती UC खरेदी करण्यात उडवून टाकले. UC हे पब्जीच्या दुनियेतलं आभासी चलन आहे. हे चलन वापरून तुम्ही पब्जीवरती रॉयल‌ पास आणि इतर वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करू शकता. या पोरानं स्वतःसोबतच आपल्या पब्जी टीममेट्साठीही हे पैसे वापरले.

आपला मुलगा ऑनलाईन अभ्यास करतो अशा गैरसमजात असणाऱ्या त्याच्या वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा मात्र त्यांना चांगलाच धक्का बसला. सरकारी नोकरी करणाऱ्या या मुलाच्या वडिलांनी आपल्या वैद्यकीय खर्च आणि मुलाच्या भविष्यासाठी हे पैसे साठवले होते. लॉकडाऊनमुळं या पोराचे वडिल कामाच्या ठिकाणीच राहात होते. याचवेळी आपल्या आईसोबत राहणाऱ्या या मुलानं आईचा मोबाईल वापरत पब्जीवरती मनसोक्त शॉपिंग करून घेतली. वर भर म्हणून या पठ्ठ्यानं खात्यातून पैसे वजा झाल्याचे SMS रेकॉर्डही पुसून टाकले! बॅंक स्टेटमेंटवरून त्याच्या पालकांना याची कल्पना आली.

आता पब्जीवरती उडवलेले पैसे तर परत येणार नाहीत. पण आपल्या मुलाला कष्टाने कमावलेल्या पैशाची किंमत कळावी आणि १६ लाख कमावणं किती कठीण असतं याचा साक्षात्कार व्हावा यासाठी वडिलांनी आता त्याचा मोबाईल काढून घेत त्याला एका स्कूटर रिपेअरींगच्या द्कानात कामाला पाठवलंय. अगदी अभ्यासाच्या नावावरही त्याला मोबाईल न देण्याचं त्यांनी ठरवलंय.

अशाप्रकारची ही काही पहिलीच घटना नाहीये. याआधीही मार्च महिन्यात गुजरातच्या एका १२ वर्षांच्या मुलानं पब्जीसाठी पालकांकडून ३ लाख रूपये चोरले होते. जानेवारी महिन्यात हैद्राबादच्या एका १९ वर्षांच्या मुलानं पब्जीच्या नादात ३१ सायकल्स चोरून विकल्या होत्या. मागच्या वर्षी मार्च महिन्यात जालंधरच्या १५ वर्षांच्या मुलानं पब्जीवरती वडिलांच्या खात्यातून ५० हजार रूपयांची खरेदी केली होती.

यावरून स्पष्ट की एखाद्या गोष्टीचं व्यसन हे घातकच. आजच्या युगात पालक आपल्या मुलांना तंत्रज्ञानापासून लांब नेऊ शकत नाहीत. पण त्याचा वापर किती आणि कसा करावा याचे धडे त्यांनी आपल्या पाल्याला नक्कीच दिले पाहिजेत.

 

आणखी वाचा :

बापाकडून मिळालेली नवी कोरी BMW त्याने नदीत का ढकलली ??

पब्जीची कल्पना कोणाची ? पब्जी मधून नक्की किती कमाई होते ? 'पब्जी'विषयी या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !!

पब्जी भारतात बनला असता तर, या माणसाने केलेले चित्रण परफेक्ट आहे

खऱ्याखुऱ्या आयुष्यात PUBG?? कोण आणि कुठे आयोजित करत आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required