computer

पब्जीची कल्पना कोणाची ? पब्जी मधून नक्की किती कमाई होते ? 'पब्जी'विषयी या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !!

मित्रहो सध्या इंटरनेटवर सर्वात जास्त धुमाकूळ घालत असणारा गेम म्हणजे पब्जी. या पब्जीने तरुणांना अक्षरशः वेड लावलं आहे. कानात इयरफोन आणि मोबाईलमध्ये डोकं घालून पोरगं काहीतरी बडबड करताना दिसलं की समजून चालायचं की ‘ये पब्जी वाला है’ ! पब्जीमुळे तरुण आभासी जगात हरवत आहे पासून तर करियरवर दुर्लक्ष होतंय पर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण तरी पब्जी फिवर काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय राव. आतातर एकमेकांना भेटल्यावर “जय पब्जी” म्हणणारे महाभाग पण आजूबाजूला सहज दिसतात. 

तर, पब्जी तर सगळ्यांना माहित आहेच, पण त्या मागची गोष्ट कोणाला फारशी माहित नसते. म्हणजे पब्जी कोणी बनवला ? ही आयडिया कुठून सुचली आणि तुमच्या आमच्या पब्जी मधून हे लोक किती कमाई करतात ते ?

आज आपण अशाच काही प्रश्नांमधून पब्जीविषयी रंजक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर पब्जीच्या पडद्यामागची गोष्ट जाणून घेऊया.

पब्जी कोणाच्या डोक्यातून आलं ?

तर पब्जीचा फुलफॉर्म आहे Player unknown battleground हे नाव खुप विचारपूर्वक ठेवले आहे. कारण युध्दभूमीवर अनोळखी असलेले खेळाडू एकमेकांना मारण्यासाठी उतरतात. तुम्हा सर्वांना कामाला लावणारा म्हणजेच पब्जीची निर्मिती करणारा अवलिया कोण आहे माहितीये? त्याचे नाव आहे ‘ब्रँडन ग्रीन’ !!

मुळचा आयर्लंडचा असणारा हा ब्रँडन ग्रीन सुरुवातीपासून शूटिंग आणि मारामारीच्या गेम्सचा फॅन होता. सुरुवातीला आर्मा नावाचा गेम खेळत असणारा ब्रँडन नंतर आर्मा 3 या गेमवर काम करू लागला हा पण पब्जी सारखाच battleground वर खेळला जाणारा गेम आहे. पण या भाऊचं नशीब तेव्हा चमकलं जेव्हा याला दक्षिण कोरियाची गेमिंग कंपनी ब्लुहोलने कामासाठी बोलावले. या कंपनीचा दहा वर्षापासून बॅटल गेम बनवण्याचा प्रयत्न सुरु होता. या कंपनीला जेव्हा ब्रँडनच्या आर्माबद्दल माहिती झाली तेव्हा त्यांनी ब्रँडनला बोलावून घेतले, आणि अश्याप्रकारे पब्जी बनण्याची सुरुवात झाली. 

‘बॅटल रॉयल’ सिनेमा

मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल पण हा गेम एका ‘बॅटल रॉयल’ नावाच्या जपानी सिनेमापासून प्रेरित आहे. पब्जीचे पीसी वर्जन 23 मार्च 2017 ला बाजारात आले. पण या गेमने एका वर्षात सगळे रेकॉर्ड तोडले. हा गेम खरतर तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला जेव्हा फेब्रुवारी 2018 ला याचे मोबाईल वर्जन सुरू करण्यात आले. मोबाईल वर्जन बाजारात आल्याच्या काही महिन्यानंतर हा गेम प्ले स्टोरवर नंबर वन वर पोचला.

तुमच्यापर्यंत जो गेम पोचतो त्यात किती लोकं काम करतात माहिती आहे का ? तर तब्बल दिडशे लोकं! सुरुवातीला अगदी तीस लोकं या गेममध्ये काम करत होती पण आता त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

पब्जी ब्ल्यूझोनचा फंडा

जर तुम्ही पब्जी खेळत असाल तर तुम्हाला पब्जी गेम मधील ब्ल्यूझोन बद्दल माहिती असेलच. पब्जी खेळत असताना या ब्ल्यूझोन मध्ये आपल्याला राहावे लागते आणि यापासून स्वतःचा बचाव करावा लागतो. हा ब्ल्यूझोन पब्जी प्लेयर्सना जवळ घेऊन येतो. सुरुवातीला या ब्ल्यूझोनला चौकोनी ठेवणार होते, पण चौकोनी बॉर्डर प्लेयर्ससाठी सोपी झाली असती. सोबतच याच्या कोडिंगच्या दरम्यान खुप अडचणी येत होत्या. म्हणूनच ब्ल्यूझोनला गोलाकार ठेवण्यात आले आहे.  

‘विनर विनर चिकन डिनर’ हे ऐतिहासिक वाक्य कुठून आलं ?

ही 'घोषणा' सध्या जिकडे तिकडे ऐकू येते. पब्जी खेळणारे भाईबंद एकत्र आले म्हणजे तिथे विनर विनर चिकन डिनरचा जयघोष झालाच म्हणून समजा. टिकटॉकवर सुद्धा या चिकन डिनरच्या व्हिडिओजचा पाऊस पडत असतो. तर मित्रहो या गेममध्ये शेवट पर्यंत टिकणे आणि जिंकणे हे खुप रोमांचक आहे. शेवटपर्यंत टिकल्यावर जेव्हा विनर विनर चिकन डिनरचा मेसेज स्क्रिनवर दिसतो तर काय वर्णावा तो आनंद. पोरांना आकाश ठेंगणे झालेले असते. पण हा मेसेज फक्त पब्जीमध्ये बघायला मिळतो असे समजू नका. ब्रँडनने बनवलेल्या प्रत्येक गेममध्ये हा मेसेज बघायला मिळतो. 

पब्जीचे रेकॉर्ड्स

या गेमने लाँच झाल्याच्या दिवसापासून अनेक रेकॉर्ड तोडले पण आणि नवीन रेकॉर्ड बनवले पण. सुरुवातीला पब्जी लाँच झाला तेव्हा दोन महिन्याच्या आत त्याच्या 20 लाख कॉपीज विकल्या गेल्या होत्या. या गेमने पहिल्या तीन महिन्यांमध्ये कमावलेला आकडा ऐकून तुमची बोटं तोंडात जातील, तर हा आकडा आहे तब्बल ७० कोटी रुपये !!

एवढेच नाही, तर या गेमने जगातल्या सर्वात जास्त विकल्या गेलेल्या गेम्समध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे आणि येणाऱ्या काळात तुमच्या आशीर्वादाने पब्जी जगातला सर्वात जास्त विकला जाणारा गेम ठरणार आहे. प्ले स्टोरवरील सर्वात जास्त वाढत्या डाउनलोडिंग मध्ये पब्जी पहिल्या क्रमांकावर आहे.

पब्जी एकमात्र असा गेम आहे जो एकासोबत अनेक लोकं ऑनलाइन राहून खेळू शकतात. एकासोबत एक नाही दोन नाही तर तब्बल तेरा लाख लोकं एकत्र खेळल्याचा रेकॉर्ड पब्जीचा आहे. तुमच्या आमच्या सारखी जगभरात रोज 1 कोटीहुन जास्त लोकं हा गेम खेळत असतात. लाँच झाल्याच्या चार महिन्यात हा गेम खेळत असल्याची संख्या दहा कोटी होती, आतातर ती 50 कोटींच्या पलीकडे गेली आहे. 
 

पब्जीला मिळालेले पुरस्कार

Pc game of the year
Multiple game award 
Action game of the year 

यासारखे अनेक पुरस्कार तुमच्या लाडक्या पब्जीला मिळालेले आहेत. 
 

पब्जीची कमाई किती आहे भाऊ ?

ज्या पब्जीवर तुम्ही दिवसरात्र मेहनत करत असतात आणि ज्यांनी पब्जीची निर्मिती करून तुम्हाला कामाला लावले ते या पब्जीच्या माध्यमातून किती कमवत असतील याची उत्सुकता तुम्हाला निश्चितच असेल, पण पब्जीने अजूनपर्यंत तरी त्यांची कमाई उघड केलेली नाही. परंतु मागच्या वर्षीची फेब्रुवारी महिन्याची कमाई त्यांनी उघड केली होती. तर त्या एका महिन्याची कमाई होती तब्बल 721 कोटी रुपये! अवाक झाले ना? 

ही फक्त एका महिन्याची कमाई आहे आणि दिवसेंदिवस पब्जीवर ऑनलाइन राहणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणजेच पब्जीच्या कमाईची सरासरी पण वाढत आहे. तर एका वर्षात पब्जी किती कमाई करत असेल याचा अंदाज तुम्ही लावून बघा.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की पब्जीमध्ये जाहिराती येत नाहीत मग त्यांची कमाई कुठुन होते? तर मित्रानो हा गेम फक्त मोबाईलसाठी फ्री आहे, त्यातही ते कॉस्मेटिक, ऍक्सेसरीज विकून कमाई करून घेतात. पब्जी जर तुम्हाला पीसीवर खेळायचा असेल तर तो तुम्हाला हजार रुपयात विकत घ्यावा लागतो. आजवर पीसीवर 5 कोटी लोकांनी हा गेम विकत घेतला आहे. 5 कोटी × 1 हजार हिशोब करून बघा तुम्ही, तुम्हाला आयडिया येईल आपल्याला नाद लावुन पब्जीवाले किती मालामाल होत आहेत ते. 

 

तर मंडळी, पब्जीच्या मागे एवढा मोठा कारभार आहे हे तुम्हाला माहित होतं का ?

 

आणखी वाचा :

PUBG फॅन्ससाठी खुशखबर, या पेश्शल हॉटेलमध्ये कधी जाणार ?

सबस्क्राईब करा

* indicates required