computer

वाचा बारकोडच्या जन्माची कहाणी! कधी आणि केव्हा पहिलं प्रॉडक्ट् बारकोड वापरून स्कॅन झालं??

‘नॉर्मन जोसेफ वुडलँड’ हे रिटेल क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या बारकोडचे जनक मानले जातात, पण त्यांचा बारकोड जॉर्ज लॉरर यांच्याशिवाय पूर्ण झालाच नसता. बारकोडला पूर्ण विकासती करण्याचं काम आणि बारकोड वाचण्यासाठी स्कॅनर तयार करण्याचं काम जॉर्ज लॉरर यांनी केलं. म्हणूनच जॉर्ज लॉरर यांनाही बारकोडच्या जन्मदात्यांपैकीच एक मानलं जातं.

आज आम्ही जॉर्ज लॉरर यांच्याबद्दल सांगतोय कारण नुकतंच त्यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. आज आपण त्यांच्या कामाविषयी जाणून घेणार आहोत.

(जॉर्ज लॉरर)

१९७० च्या दशकात आजच्या सारखं तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. कॅशियरला हातानेच प्रत्येक उत्पादनाची किंमत लिहावी लागायची. या काळात किराणा मालाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. चुकून जर रक्कम लिहिण्यात चूक झाली तर नुकसान होण्याची शक्यता होती. ही समस्या लक्षात घेऊन IBM आणि RCA या तंत्रज्ञानातील दोन मातब्बर कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विचारण्यात आलं.

(नॉर्मन जोसेफ वुडलँड)

हे काम  शेवटी IBM कडे आलं. नॉर्मन जोसेफ वुडलँड यांनी १९५० सालीच बारकोडची कल्पना मांडून ठेवली होती. ते IBM चेच कर्मचारी होते. IBM ने नॉर्मन वुडलँड यांची कल्पना पुढे केली. या कल्पनेवर काम करण्यासाठी जॉर्ज लॉरर यांची  नेमणूक झाली.

आज आपण जे बारकोड पाहतो त्या उभ्या रेषा असतात आणि सोबत १२ अंक असतात. त्याकाळी नॉर्मन जोसेफ वुडलँड यांच्या कल्पनेतून आलेला बारकोड हा गोलाकार होता. हा नमुना पाहा.

जॉर्ज लॉरर यांनी आधी तर ही कल्पनाच अमान्य केली. कारण त्यांच्या मताप्रमाणे प्रिंटींगच्या वेळी गोलाकार बारकोड पसरण्याचा संभव होता. त्याकाळातील प्रिंटींग आजच्या सारखी विकसित नसल्याने हे कारण पटण्यासारखं आहे. जॉर्ज लॉरर यांनी उभ्या पट्ट्या असलेला बारकोड विकसित केला. शिवाय बारकोड वाचण्यासाठी स्कॅनर तयार केला.

नॉर्मन वुडलँड यांच्या Universal Product Code (UPC) ला पूर्ण करण्याचं काम जॉर्ज लॉरर यांनी केलं. UPC तंत्रामध्ये लेसर्सद्वारे बारकोडमध्ये आधीच नमूद झालेली किंमत एका झटक्यात कम्प्युटरवर दिसू लागली. त्यामुळे चुका होण्याची शक्यता शून्य झाली. या गोष्टीला रिटेल क्षेत्रातील फार महत्त्वाचं स्थान आहे.

१९७४ साली व्रिंगलीज ज्युसी फ्रुट च्युइंगम हे UPC तंत्रातून स्कॅन होणारं जगातलं पाहिलं उत्पादन ठरलं. च्युइंगम हे पाकीट आजही वॉशिंग्टन येथील स्मिथसोनियन वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतं. 

तर, ही माहिती वाचल्यानंतर आता तुम्ही जेव्हाही सुपर मार्केट मध्ये जाल तेव्हा तुम्हाला जॉर्ज लॉरर यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required