computer

‘आयुष्यात एकदा तरी जेलची हवा खायची आहे’...या आजीबाईंची शेवटची इच्छा पोलिसांनी केली पूर्ण !!

मंडळी, आपल्या सगळ्यांचीच एक बकेट लिस्ट असते. काहीवेळा सगळ्या इच्छा पूर्ण होतात पण एक इच्छा राहून जातेच. इंग्लंडच्या एका आजीबाईंच्या बकेट लिस्ट मध्ये पण अशीच एक राहून गेलेली इच्छा होती. त्यांना आयुष्यात एकदा तरी तुरुंगात जायचं होतं. पण तुरुंगात जावं लागेल असा कोणताच गुन्हा त्यांच्या हातून आजवर घडला नव्हता. अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी पोलिसांनीच त्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

मंडळी, आम्ही बोलत आहोत इंग्लंडच्या ९३ वर्षांच्या 'जोसी स्मिथ' आजीबाईंबद्दल. त्यांना इंग्लंडच्या ग्रेटर मॅन्चेस्टर पोलीस खात्याने अटक केली होती. कारण होतं त्यांच्या बकेट लिस्ट मधली शेवटची इच्छा. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यांना अटक करून तुरुंगात नेण्यात आलं. तिथे त्यांना चहा आणि केक देऊन त्यांची एकदिवशीय जेल यात्रा पूर्ण करण्यात आली.

राव, आजीबाई यावेळी आपली पहिली आणि शेवटची जेल यात्रा छान एन्जॉय करत होत्या. त्यांच्या नातीने काढलेले हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मंडळी, ग्रेटर मॅन्चेस्टर पोलीस खात्याला आजीबाईंच्या नातीने आपल्या आजीची इच्छा बोलून दाखवली होती. वय झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत आहे, उशीर होण्यापूर्वीच आजीबाईंना आपली इच्छा पूर्ण करायची होती. महत्वाचं म्हणजे पोलिसांनी होकारही दिला.

हा प्रकार तसा नवीन नाहीय राव. इंग्लंडच्या ब्रिस्टॉल पोलीस खात्याने पण १०४ वर्षांच्या आजोबांची इच्छा पूर्ण केली होती.

मंडळी, तुमची अशी एखादी विचित्र इच्छा आहे का ? असेल तर आमच्याशी नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required