computer

अमेरिकन यादवी युद्धात सैनिकांच्या जखमा चमकू लागल्या होत्या ? हा चमत्कार होता की आणखी काही ??

मंडळी, अमेरिकेत १८६१ ते १८६५ दरम्यान यादवी युद्ध लढलं गेलं होतं. उत्तरेतल्या आणि दक्षिणेतल्या राज्यांनी एकमेकांविरुद्ध पुकारलेला हा लढा होता. या युद्धातील पहिली मोठी लढाई ही “बॅटल ऑफ शिलोह” या नावाने ओळखली जाते. आज आम्ही तुम्हाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत ती याच ‘बॅटल ऑफ शिलोह’शी निगडीत आहे.

तर, बॅटल ऑफ शिलोह ही एक अत्यंत रक्तरंजित लढाई होती. दोन्ही बाजूला मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली होती. या लढाईत जवळजवळ ३००० सैनिक मृत्युमुखी पडले तर १६००० सैनिक जखमी झाले होते. या जखमी सैनिकांना आपल्या जखमांमुळे चालताही येत नव्हतं. त्यांना तिथेच खितपत सोडून इतर सैन्य निघून गेलं. हे कमी होतं की काय म्हणून त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. सैनिकांच्या जखमा चिघळल्या. त्यांच्याकडे चिखलात पडून मरणाची वाट बघण्याखेरीज पर्याय नव्हता. याचवेळी एक चमत्कारिक गोष्ट घडली. रात्रीच्या अंधारात त्यांच्या जखमा चक्क चमकू लागल्या.

मंडळी, विचार करा. तुम्हाला जखम झाली आहे आणि त्या जखमेतून रक्त येण्याऐवजी ती जखम चमकू लागली आहे. हे त्यावेळी पण काल्पनिक वाटत होतं आणि आजही काल्पनिकच वाटतं. २ दिवसांनी जेव्हा सगळ्या सैनिकांना इस्पितळात नेण्यात आलं तेव्हा आणखी विचित्र गोष्ट दिसली. आदल्या दिवशी ज्यांच्या जखमा चमकत होत्या ते इतरांच्या मानाने लवकर बरे झाले.

हा चमत्कार घडला तरी कसा ?

मंडळी, ही गोष्ट काल्पनिक आहे म्हणून लोकांनी त्याला सोडूनही दिलं असतं, पण त्यावेळच्या युद्धाच्या दस्तऐवजांमध्ये ही घटना स्पष्टपणे नमूद केली आहे. त्यामुळे ही अफवा आहे असं म्हणायला मार्गच नव्हता. मग शोध सुरु झाला या चमत्कारा मागच्या कारणाचा.

युद्धाच्या १४० वर्षापर्यंत विज्ञानाला हे रहस्य माहित नव्हतं, पण केवळ अपघातानेच एका १७ वर्षाच्या मुलाला त्याचा पत्ता लागला.

त्याचं झालं असं की, अमेरिकेतल्या मायक्रोबायोलॉजिस्ट फिलीस मार्टिन यांच्या सोबत त्यांचा मुलगा बिल मार्टिन शिलोहची युद्धभूमी पाहायला गेला होता. बिल मार्टिनला अर्थातच शिलोहच्या युद्धभूमीवरची ती चमत्कारिक गोष्ट माहित होती. त्याचाच विचार करत असताना त्याला आईने सांगितलेल्या एका सूक्ष्मजीवाची आठवण झाली. या सूक्ष्मजीवाचं नाव होतं फोटोहॅबडस लुमिनसेन्स (Photorhabdus luminescens). 

बिल मार्टिनने आईच्या आणि मित्राच्या मदतीने फोटोहॅबडस लुमिनसेन्सचा अभ्यास केल्यावर हे रहस्य बाहेर पडलं. सैनिकांच्या जखमेवर हा सूक्ष्मजीव असल्याने त्यांची जखम चमकत होती. हे कसं शक्य झालं ते समजून घेऊया.

फोटोहॅबडस लुमिनसेन्स

फोटोहॅबडस लुमिनसेन्स हा फिकट निळ्या रंगात चमकणारा सूक्ष्मजीव आहे. या सूक्ष्मजीवाची वाढ आणि त्याची उत्पत्ती हा एक किचकट प्रकार असतो. हा सूक्ष्मजीव सुरुवातीला दुसऱ्या परजीवी प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर तो त्या परजीवी प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व इतर सुक्ष्मजीवांवर ताव मारून जगतो. हे परजीवी ज्या किटकांवर असतात त्या कीटकांना मग चमक येऊ लागते. ही चमक बघून इतर कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात. मग फोटोहॅबडस लुमिनसेन्स इतर प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतो. अशाप्रकारे त्यांची लोकसंख्या वाढत जाते.

....पण हा सूक्ष्मजीव माणसाच्या शरीरात वाढू शकत नाही. कारण त्याच्या वाढीसाठी मानवी शरीर अयोग्य ठिकाण आहे. हा सूक्ष्मजीव कमी तापमानात वाढतो. माणसाच्या शरीराच्या तापमानात तो वाढणं शक्यच नाही. बिल मार्टिनने मग याचं उत्तर असं शोधून काढलं, की ज्यावेळी सैनिक चिखलात पडले होते त्यावेळी त्यांच्या शरीराचं तापमान अत्यंत कमी झालं असणार. याला शास्त्रीय भाषेत ‘हायपोथर्मिया’ म्हणतात.

तर, सैनिकांच्या शरीराचं तापमान कमी झाल्यानंतर फोटोहॅबडस लुमिनसेन्सला वाढीसाठी योग्य तापमान मिळालं असणार आणि त्यामुळे सैनिकांच्या जखमा चमकू लागल्या होत्या.

एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, इतर सैनिकांपेक्षा हे सैनिक लवकर बरे कसे झाले ? त्याचंही उत्तर फोटोहॅबडस लुमिनसेन्सच्या वाढीत आहे. वरतीच म्हटल्याप्रमाणे हे सूक्ष्मजीव वाटेत येणाऱ्या सगळ्या इतर सूक्ष्मजीवांवर ताव मारतात. याच गुणधर्मामुळे त्यांनी जखमेवरचे सगळे सूक्ष्मजीव संपवले आणि जखम बरी होण्यास मार्ग मोकळा करून दिला.

मंडळी, अमेरिकेत आजही हा प्रकार ‘एंजल्स ग्लो” म्हणून ओळखला जातो. पण खरं तर ती कृपा या सूक्ष्मजीवांची होती.

सबस्क्राईब करा

* indicates required