computer

खऱ्या आयुष्यातल्या 'आयर्नमॅन'च्या या ५ प्रोजेक्ट्सबद्दल तुम्हांला माहित आहे का?

मंडळी, तुम्ही मार्व्हलच्या सिनेमांमध्ये आयर्न मॅन बघितला असेल. तो श्रीमंत असतो, प्रचंड हुशार असतो. सतत नवनवीन शोध लावत असतो, पण या कशातही न अडकून तो नव्याचा ध्यास घेतलेला असतो. हे सर्व तो स्वतःसाठी करत नसतो. त्याला श्रीमंत व्हायचे नसते. माझे नाव व्हावे अशी पण त्याची इच्छा नसते. मग काय असते त्याची इच्छा? मानवजात टिकून राहावी आणि माणसाला येणाऱ्या आव्हानांना तोंड देता यावे हा एवढाच त्याचा हेतू असतो. तो हे सगळे करू शकतो, कारण तो सुपरहिरो आहे, नाही का? पण जर तुम्हाला असे सांगितले की असाच एक आयर्न मॅन खऱ्या जगात आहे तर? मंडळी, आम्ही आज अशा अवलियाशी तुमची ओळख करून देणार आहोत. हा २१ व्या शतकातला सर्वात प्रभावशाली माणूस आहे. कदाचित त्याचे नाव तुम्ही ऐकले असेल, पण आज त्याच्या व्यक्तिमत्वाच्या फारशा माहित नसलेल्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अवलियाचं नाव आहे एलॉन मस्क!!!

आज एलॉनचा वाढदिवस आहे. मंडळी, हा गडी शास्त्रज्ञ आहे, उद्योगपती आहे, इंजिनियर आहे. एवढेच नव्हे तर त्याने त्याने सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. एकंदरीत भन्नाट माणूस आहे राव!! एकाच वेळी तो अनेक प्रकल्पांवर काम करत आहे आणि त्याचा प्रत्येक प्रकल्प म्हणजे मानवजातीने हजारवेळा त्याचे उपकार मानावेत असा आहेत राव!! 

इंजिनियर झाल्यावर विडिओ गेम डेव्हलपमेंटमध्ये काम करत असलेला एलॉन जर आजही तिथे राहिला असता तरी करोडो डॉलर्स कमावून सुखी समाधानी आयुष्य जगत राहिला असता. पण काहींना जगासाठी काहीतरी करण्याचा किडा असतो राव!! तो त्यांना शांत बसू देत नाही. अशाच किड्यामुळे आज एलॉन जग बदलून दाखवत आहे. त्याच्या प्रकल्पांवर नजर टाकली तरी डोळे दिपतील एवढे काम त्याने उभे केले आहे. बघूया त्याचे काही प्रकल्प...
 

टेस्ला मोटर्स...

मंडळी, सध्या जगापुढे उभे राहिलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे पर्यावरणाचा नाश. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे म्हणजेच तेलाच्या विहिरींमधले साठे संपत आहेत तर जास्तीत जास्त पेट्रोल-डिझेल तयार करण्यासाठी पर्यावरणाची हानी करण्यात येत आहे. यावर उपाय म्हणून या भावाने थेट इलेक्ट्रॉनिक कार्स बनवायला सुरुवात केली आहे. याने होणारा फायदा हा भयानक आहे राव!! तेलावरून आजवर जगात खूप युद्धे झाली. आजही अनेक देश तेलामुळे युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत.  पर्यावरणाचे नुकसान तर आहेच, पण सामान्य लोकांचा होणारा सर्वात मोठा खर्च हा पेट्रोल डिझेलवरच असतो. या सर्वांवर इलेक्ट्रिक कार्स हा जालीम उपाय आहे. त्यांची किंमतसुद्धा सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे.  गेल्या शतकातील महान शास्त्रज्ञ निकोल टेस्ला याच्या नावावरून त्याने या कंपनीला टेस्ला नाव दिले आहे. परदेशात या गाड्या रस्त्यांवर दिसायला लागल्या आहेत. आपल्या देशात पण काही लोकांकडे या गाड्या आल्या आहेत. रितेशभाऊ देशमुखकडे पण हीच गाडी आहे राव!! ज्या वेगाने टेस्ला कार्सची विक्री होतेय,  त्यावरून थोड्या वर्षांनी जगभरातल्या रस्त्यांवरुन टेस्ला पळताना दिसेल. 

गिगा फॅक्टरीज

जगाला शाश्वत उर्जेकडे घेऊन जाणारे अजून एक पाऊल म्हणून त्याच्या या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. सोलर आणि पवनऊर्जेचे महत्व भारतीयांना तरी सांगायची गरज नाही राव!! या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करून सगळ्या जगाला स्वस्त ऊर्जा पुरवायचा एलॉनचा प्रयत्न आहे. मंडळी, या प्रकल्पाची सुरवात तशी टेस्ला मोटर्सला लागणाऱ्या लिथियम आयन बॅटरीजच्या प्रॉडक्शनसाठी झाली. याची सुरवात अशी झाली असली तरी असे अजून प्लांटस जगभर उभे करण्याचा एलॉनरावांचा प्लॅन आहे. 

स्पेस एक्स

मंडळी, पृथ्वीवर लोकांना रहायला जागा कमी पडतेय. त्याचबरोबर लोकांनी पर्यावरणाचा नाश करून पृथ्वी राहण्यायोग्य ठेवलेली नाही. आणि परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. स्टीफन हॉकिंगसारखा शास्त्रज्ञ भविष्यवाणी करून गेला आहे राव!! काहीशे वर्षांनी पृथ्वी राहण्यायोग्य राहणार नाही. मग अशावेळी काय करायचे? यावर उपाय आहे पृथ्वीवरील भार हलका करायचा! तो कसा करायचा? तर मंडळी त्यासाठी थेट मंगळावर रहायला जायचे ना राव!!! एलॉनभाऊने स्पेस एक्स त्यासाठीच उभारले आहे. मंगळावर वस्ती करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीला एका खासगी कंपनीसाठी थेट आकाशात रॉकेट पाठवणे हीच कठीण गोष्ट होती, पण भाऊने ती पण पार पाडली. आता हळूहळू त्याने आकाशात पाय पसरायला सुरवात केली आहे. लवकरच त्याच्या प्रयत्नांना फळ मिळेल असे दिसत आहे. 

द बोरिंग कंपनी

खरंतर ही कंपनी त्याने साइड हॉबी म्हणून सुरु केली होती. पण आज दळणवळणाला नविन पर्याय म्हणून ही कंपनी उभी राहत आहे. मंडळी, सद्या रस्त्यावर गाड्या मावत नाहीयेत. आधीच लोकांकडे वेळ नाही, त्यात रोजच्या ट्रॅफिकमध्ये जाणारा वेळ तसेच जगभर दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यु हे सगळे बघता, द बोरिंग कंपनीच्या माध्यमातून मस्क एक भन्नाट सॉल्युशन घेऊन आला आहे राव!! अंडरग्राउंड रस्ते तयार केले तर रस्त्यावर असलेला भार कमी व्हायला मदत होईल. 

आकाशामर्गे प्रवास हाही एक पर्याय अर्थातच यावर सुचवण्यात आला होता, पण प्रदूषण, गोंगाट या समस्या तिथेही असत्याच म्हणून  बोगदे हे यावर उत्तम उपाय आहे असे मस्क मानतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या कामासाठी शहराची रचना बदलण्याची पण गरज नाही. एकंदरीत सुमडित काम करून एवढा मोठा प्रॉब्लम सॉल्व करण्याचा एलॉनचा मानस आहे. ही आयडिया प्रत्यक्षात येणार नाही अशी टीका होत होती. पण लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहरांमध्ये हा प्रकल्प सुद्धा त्याने यशस्वी करून दाखवला आहे. 

मस्क फाऊंडेशन

हे सर्व करत असताना समाजाची काळजी वाहण्याचे काम देखील हा गडी करतोय. यासाठी त्याने मस्क फाउंडेशन सुरू केले आहे. दरवर्षी या संस्थेमार्फत करोडो रुपयांची मदत तो करत असतो. नैसर्गिक संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्याची संस्था सर्वाधिक वेळा हात पुढे करत असते. वैज्ञानिक शिक्षण सोपे व्हावे म्हणून अनेक शाळांना या संस्थेतर्फे अनुदान देण्याचे काम मस्क करत असतो. पुनर्नवीकरणीय उर्जेवर काम करण्यासाठी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना भांडवल पुरवण्याचे कामसुध्दा मस्क फाउंडेशन करत असते. 

मंडळी, तसे पाहायला गेले तर एलॉन मस्कवर पूर्ण पुस्तक लिहिता येऊ शकते. त्याचे एकेक प्रकल्प म्हणजे मास्टरपीस आहेत. इथे दिलेली यादी फक्त तो काय करतो याची चुणूक दाखवते. इथे दिलेल्या प्रोजेक्टसशिवाय त्याची ऑनलाइन पेमेंट बँकिंग कंपनी पे-पॅलसारखे इतर प्रकल्पसुद्धा आहेत. ज्या पद्धतीने आणि वेगाने तो काम करतोय,  त्यानुसार येणाऱ्या काळात अजून काहीतरी भन्नाट तो घेऊन येईल हे नक्की!! 

मंडळी, एवढा सगळा प्याप सांभाळून सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर नेहमी उत्साह असतो. आयर्न मॅनमधल्या टोनी स्टार्कसारखा स्वतःच्या धुंदीत जगणारा स्वभाव घेऊन मस्क आलेला आहे. काही दिवसांपूर्वी लाईव्ह पॉडकास्टमध्ये जेव्हा अँकरने त्याला गांजाबद्दल सांगितले तेव्हा नेमके गांजात काय असते यात बघूया म्हणून तब्बल १ कोटी लोक बघत असताना सर्वांसमोर त्याने गांजा ओढला. वरती 'मला यात काही विशेष वाटत नाही' असे सांगून गांज्यासारख्या अमली पदार्थालासुद्धा त्याने निकालात काढले. अशा या अफलातून आणि कलंदर माणसाला बोभाटा परिवारातर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

 

लेखक- वैभवराजे पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required