हा चक्रम माणूस करोडो रुपयांची गाडी पुरणार होता पण...वाचा पुढे काय झाले !!!

इजिप्शियन राजा वारला, की त्याचे लोक मृत्यूनंतरच्या पारलौकिक जीवनातल्या सुखासाठी किमती वस्तू त्या राजाच्या ‘ममी’ बरोबरच पुरून टाकायचे.  आता ती प्रथा इजिप्शियन लोकांबरोबरच संपुष्टात आली. जर आजच्या काळातही कोणी असं केलं, तर आपण त्याला नक्कीच वेड्यात काढू. पण आहे, एका व्यक्ती अशी आहे की जिनं आजच्या काळातही ही इच्छा बोलून दाखवलीय.  कोण आहे ही व्यक्ती?  काय आहे त्याची कहाणी? चला जाणून घेऊ.

त्या व्यक्तीचं नाव आहे ‘काउंट चिकीनो स्कार्पा’. हा ब्राझीलचा एक गर्भश्रीमंत माणूस आहे.  त्यानं असे घोषित केलंय की त्याला त्याची करोडो डॉलर किमतीची ‘बेंटली कार’ दफन करायची आहे. साहजिकच कुणालाही वाटेल पारलौकिक जगातही या कारमध्ये बसून त्याला ऐषोरामात फिरायचे असणार.

या त्याच्या घोषणेनंतर ही बातमी मिडीयाने उचलून धरली. देशात यावर चर्चा झाडू लागल्या. चिकीनो स्कार्पाच्या या निर्णयाला काहींनी राष्ट्रीय संपत्तीची उधळण म्हटलंय तर काहींनी कार पुरणं हा मूर्खपणा असल्याच म्हटलंय.  कार पुरण्यापेक्षा ती दान करायला हवी असा सल्लाही काहींनी दिलाय. कळस म्हणजे काही लोकांनी त्याला चक्क देशद्रोही घोषित केलंय.

अशा सर्व नकारात्मक प्रतिक्रिया येऊनसुद्धा चिकीनो स्कार्पाने आपण कोणत्या दिवशी कार पुरणार आहे त्याची तारीखही सांगून टाकली.  एवढंच काय कारसाठी खड्डाही तयार करण्यात आला. दफनविधीच्या दिवशी प्रचंड माणसे गोळा झाली, मिडीयाने लाईव्ह कवरेज केलं. पण थांबा.. अभी कहानी में ट्वीस्ट आना बाकी हे मेरे यार...

Related image

कार दफनकरण्याआधीच चिकीनो स्कार्पाने आश्चर्याचा धक्का दिला आणि कार दफन करणार नसल्याचं जाहीर केलं. यामागचं कारण जेव्हा त्यानं सर्वांना सांगितलं तेव्हा तिथं जमलेल्या प्रत्येकाने  टाळ्यांचा एकच  कडकडाट केला.

यामागचं कारण त्यानं असं सांगितलं की, “अवयवदानाचं महत्व माझ्या देशातल्या जनतेला कळावं हाच एकमेव उद्देश या नाट्यामागे होता”. पुढं तो असंही म्हणाला,"लोकांनी मी महागडी कार दफन करणार म्हणून मला मूर्ख म्हटलं.  खरंतर आपण एवढे किमती असलेले आपले अवयव मेल्यानंतर पुरून टाकतो. हृदय, यकृत, फुफ्फुसे डोळे, मूत्रपिंडे आदी अवयव पुरून टाकणे हा मी करत असलेल्या मूर्खपणापेक्षा खूप मोठा मूर्खपणा आपण सारेचजण पूर्वापार करत आलो आहोत. आपल्या देशात हजारो-लाखो रूग्ण अवयवांची वाट पहात आहेत. कोणी त्यांना दान दिले तर त्यांना नवा जन्म मिळणार आहे”

त्याच्या अवयवदानाच्या या आगळ्यावेगळ्या संदेशानंतर त्याची सर्व माध्यमातून स्तुती करण्यात आली.

चला तर मंडळी, चिकीनो स्कार्पाप्रमाणे आपणही आज अवयवदानाचा संकल्प करूयात...

सबस्क्राईब करा

* indicates required