computer

गायीच्या मालकीवरून दोघांमध्ये जुंपली...कोर्टाने चक्क गायच कोर्टात बोलावली ?

ही गोष्ट आहे राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यातली. जवळपास वर्षभरापूर्वी एक गाय बेपत्ता झाली. महिनाभरानंतर बेपत्ता गाय एका शिक्षकाला सापडली. त्याच्या चार दिवसानंतर एका माणूस  तक्रार करतो की माझी गाय हरवली आहे आणि शिक्षकाकडे असलेली गाय माझी आहे. तो शिक्षकाकडून गाय हिसकावून स्वतःच्या घरी आणून बांधतो. मंडळी आणि मग सुरु होतो खरा गोलमालचा सीन. आता इथे सगळ्यांना प्रश्न पडतो ती गाय कुणाची आहे? ते दोघेही गायीवर दावा सांगतात. विषय मारामारीपर्यंत जातो आणि तिथून थेट पोलिसांकडे...

जोधपुरला राहणारा शामसिंग परिहार सांगतो की त्याची गाय वर्षभरापूर्वी बेपत्ता झाली होती. एके दिवशी शाळेतून येताना रस्त्यात त्याला त्याची गाय दिसली आणि तिला तो घरी घेऊन आला. तीन दिवसानंतर त्याच्या घराजवळच राहणारा ओमप्रकाश बिश्नोई ती गाय त्याची आहे म्हणत त्याच्या घरी घेऊन गेला.  पंच आले तरी  ही गाय कोणाची हा निर्णय काय होत नाही राव!! शेवटी प्रकरण कोर्टात गेले आणि जोवर निकाल लागत नाही तोवर कोर्ट गायीला गौशाळेत पाठवून देतं. मंडळी, या प्रकरणात आतापर्यंतचे ट्विस्ट तुम्ही बघितलेच आहेत.  पण इथे तुम्हाला ट्विस्टच ट्विस्ट बघायला मिळतील.

आता गौशाळेत गायीला वासरु झाले. श्यामसिंग आता मात्र आरोप करतो की गायीला वासरु झाले नाहीय आणि  गाय स्वतःचे दूध पिते. पुढे काय झालं माहितीये मंडळी? कोर्टाने गाय जिथे असते तिथे चक्क सीसीटीवी कैमरे लावायला सांगितले. मंडळी, जिथे भर दिवसा दरोडे होतात तिथे सीसीटीवी नसतात आणि जिथे गरज नाही तिथे कोर्ट असे निर्णय देते. एकंदरीत अशी ही सर्व व्यवस्था आहे राव!! 
असो, तर सीसीटीव्ही लावूनही काही फायदा झाला नाही.  तेव्हाने कोर्ट थेट गाय आणि तिच्या वासराला कोर्टात हजर करायला सांगितलं. तुमचा विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे राव!!  गाय गौशाळेतून कोर्टात आली आणि जजसमोर सुनावणी सुरु झाली. 

गाय कोणाची हे ठरविण्यासाठी कोर्टाने वेगळी शक्कल लढवली. अंहं, नवीन काही नाही, इसापनीतीतल्या कथेचा आधार घेऊन एक आयडिया काढली. कोर्टाने गायीला दोघांच्या घराच्या परिसरात मोकळी सोडून द्यायला सांगितले. त्याप्रमाणे गायीला दोघांच्या घरापासून ५०० मीटर दूर सोडण्यात  आले. गाय पहिल्यांदा ओमप्रकाशच्या घरी गेली.  त्याच्या जीवात जीव आला.  पण हाय, गाय तिथे दोनच मिनिट थांबली आणि लगेच पुढे चालायला लागली. पण गाय थोडावेळ का होईना त्याच्या घरी गेली म्हणून ओमप्रकाश म्हणतो की गाय माझी!!  तर ओमप्रकाश गाय त्याच्या घरी यावी म्हणून आवाज देत होता असा शामसिंगचा आरोप होता. पण मंडळी, कोर्टाने काय शामसिंगचे ऐकले नाही. सगळी सुनावणी पूर्ण करून आणि तपास अधिकाऱ्यांचे रिपोर्ट वाचून गाय ओमप्रकाशला देण्यात यावी असा कोर्टाकडून निर्णय देण्यात आला.

(प्रातिनिधिक फोटो)

तुम्हाला वाटत असेल प्रकरण इथे संपले. लेकिन पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!! ओमप्रकाश आनंदित होऊन गाय घ्यायला गेला. गायीची पूजा करून तिला नमस्कार केला, जमलेल्या लोकांना मिठाई वाटली आणि आता गायीला घेऊन निघणार तेवढ्यात तिथे शामसिंग आला. पुन्हा शामसिंग गायीवर हक्क सांगायला लागला आणि ओमप्रकाशसोबत भांडायलाही लागला. पोलिसांनी यावर येऊन त्याला कोर्टाच्या निर्णयाची कॉपी दाखवली.  पण हा भाऊ काय ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने डायरेक्ट कोर्टाच्या निर्णयाची कॉपी फाडून फेकली, एवढेच नाहीतर पोलिसांची गाड़ीसुद्धा फोडली. आता मात्र त्याला खाकीचा खाक्या बघायला मिळतो राव!! पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकले आणि  अशाप्रकारे या आगळ्यावेगळ्या केसचा शेवट झाला.

मंडळी, भारत असा देश आहे जिथे पिक्चर मध्ये घडणाऱ्या घटना पण "किस झाड़ कि पत्ती" वाटतील अशा घटना घडत असतात. ही केससुद्धा एखाद्या सिनेमाची स्टोरी शोभावी अशी आहे.

मंडळी, आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेयर करा...

सबस्क्राईब करा

* indicates required