computer

नामिबिया वाळवंट- नरकाचे दार, पऱ्यांचे रिंगण, कंकाल तट आणि मनोहारी वाळवंट-महासागराचा संगम!! काय काय आहे इथे?

जगाच्या एका भागात पाणीच पाणी आहे तर दुसऱ्या काही भागात कोरडंठक्क वाळवंट आहे. महासागरांनी वेढलेला आणि वाळवंटाने वेढलेला असा दोन्ही प्रकारचा प्रदेश आपल्याला माहीत आहे. पण जगात असाही प्रदेश आहे, जिथे एका ठिकाणी वाळवंट संपते आणि तिथूनच समुद्र सुरू होतो.

दक्षिण आफ्रिकेतील ही जागा ही जगातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. इथे खुद्द अटलांटिक समुद्र वाळवंटाला भेटायला येतो. दक्षिण - पश्चिम आफ्रिकेच्या अटलांटिक तटाला लागून असलेला कोरडा प्रदेश म्हणजे नामीब वाळवंट. नामीब म्हणजे असा प्रदेश जिथे जिथे काहीही नाही. हे वाळवंट किती जुनं असेल? तब्बल ५ कोटी ५० लाख वर्ष जुना हा प्रदेश आहे. तुलनाच करायची तर आपल्याला माहीत असलेलं सहारा वाळवंट फक्त २० ते ७० लाख वर्ष जुनं आहे.

दक्षिण अंगोलापासून २००० किमी दूर दक्षिण आफ्रिकेपर्यंत हे नामीब वाळवंट पसरले आहे. हा परिसर म्हणजे आश्चर्यजनक घटनांचं भांडार दुकान आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागासारखा दिसणारा हा प्रदेश तीन देशांमधील ८१ हजार वर्ग किमी भागात पसरला आहे. दिवसा इथे ४५ सेल्सिअस इतके कडक ऊन असते, तर रात्री बर्फ जमावा इतकी तुफान थंडी. याचसाठी हा प्रदेश मानवी वस्ती वसण्यासाठी अतिशय कठीण समजला जातो. तरीही काही प्रजातींचे वास्तव इथे पाहायला मिळते.

या वाळवंटात अटलांटिक किनाऱ्यावर एक ५०० किमी पसरलेला परिसर आहे, याचे नाव नरकाचा दरवाजा (Gates of Hell) आहे. नावावरून तुम्हाला या जागेची थोडी आयडिया आलीच असेल. वाळूचे डोंगर, गंजलेली हजारो जहाजे आणि व्हेलचे अगणित सांगाडे यांनी हा परिसर व्यापलेला आहे. हा भागाला 'कंकाल तट' असेही म्हणतात. या परिसरात प्रचंड दाट धुके असते. एकीकडून अटलांटिकची थंडी आणि दुसरीकडून नामीबचे गरम वारे यांच्या एकत्र येण्याने हे धुके तयार झालेले असते.

अशा भागातून जहाज पार होणे मोठी कठीण गोष्ट असते. जवळपास ६०० वर्षांपूर्वी इथून जाताना पोर्तुगालचा एक नाविक डियागो काओ काही काळासाठी इथे थांबला होता. त्याचा काही इथे निभाव लागला नाही. जाता जाता तो याचे नामकरण नरकाचे दार असे करून गेला.

या वाळवंटातील अजून एक रहस्यमयी जागा म्हणजे 'पऱ्यांचे रिंगण'. या वाळवंटातील जागोजागी दीड ते ६ मीटर आकाराचे हे रिंगण दिसायला सुंदर असले तरी त्यांच्या भोवती खूप साऱ्या गोष्टी तयार झाल्या आहेत. इथे येऊन पऱ्या नाचतात असे म्हटले जाते. या विषयी गेली अनेक दशके संशोधक डोके खाजवत आहेत, पण त्यांच्या हाती काय विशेष लागले नाही.

स्थानिक लोक मात्र याला दैवी घटना म्हणून मोकळे झाले आहेत. तसेच कुठल्याही रहस्यमयी गोष्टीत नेहमीच असलेला एलियन अँगल पण याला जोडला गेला आहे. अशाप्रकारे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेला हा परिसर आजपर्यंत जगासाठी एक कोडे बनून राहिला आहे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required