सर्जिकल स्ट्राईकवरती पुस्तक आलंय, ही प्रश्नोत्तरे सांगताहेत काय काय असणार आहे पुस्तकात..

२९ सप्टेंबर २०१७. भारतानं केलेल्या  "सर्जिकल स्ट्राइक" ला या दिवशी एक वर्ष पूर्ण होते आहे.  या सर्जिकल स्ट्राइकबद्दल बरीच चर्चा झाली.  पण हा सर्जीकल स्ट्राइक नक्की कसा करण्यात आला त्याची इथंभूत माहिती २९ तारखेला प्रकाशित होणार असलेल्या पेंग्वीन प्रकाशनाच्या एका पुस्तकातून मिळणार आहे. प्रकाशनपूर्व मिळालेली माहिती अंगावर काटा आणणारी आणि तितकीच स्फूर्तीदायक आहे. या भरारी पथकाचे नेतृत्व ज्यांनी केले,  त्या मेजर टँगो(खरे नांव लपवले आहे) यांनी हे अनुभवकथन केले आहे. या पुस्तकामुळे आतापर्यंत सांगोवांगी असलेल्या सर्जीकल स्टाईकबद्दलच्या सर्व शंकाना पूर्णविराम मिळेल. 

तर मित्रहो, वाचा प्रश्नोत्तरातून ही वीरगाथा !

स्रोत

सर्जिकल स्ट्राइक करण्याचा उद्देश काय होता?  केवळ शक्तिप्रदर्शन की आणखी काही? 
या स्ट्राइकपूर्वीच काही दिवस उरी येथे चार  पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतीय सेनेच्या छावणीवर हल्ला केला होता. आजपर्यंत झालेल्या अतिरेकी कारवायांमध्ये सगळ्यात भीषण हल्ला असे या हल्ल्याचे स्वरुप होते. या हल्ल्याचे चोख  प्रत्युत्तर तातडीने देणे ही काळाची गरज होती. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या निगराणीखाली अनेक दहशतवादी छावण्या पाकिस्तान व्याप्त काश्मिराच्या सीमेलगत तयार झाल्या होत्या. पुढचे हल्ले थांबवण्यासाठी या छावण्या उध्वस्त करणे हा एकच उपाय  शिल्लक होता.

या तुकडीचे नेतृत्व कोणी केले ? 
मेजर टँगो यांच्या नेतृत्वाखाली हे भरारी पथक तयार करण्यात आले.  पथकाचे नाव होते घातक. कामगिरीही नावाप्रमाणेच घातक करायची होती.  १९ सैनिकांची निवड यासाठी केली गेली. निवडलेले सर्व जवान उरी कँपमधूनच घेतले गेले. उरीच्या जखमा तेव्हा ताज्या होत्या आणि उरीचे जवान उट्टे काढण्यासाठी आसुसलेले होते. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी म्हणूनच या जवानांची निवड करण्यात आली.
 
सैनिकांना पाठबळ देण्यासाठी काय तयारी केली गेली होती? 
त्या भागात सैन्याचे दोन ॲसेट्स तयार होते.  ॲसेट्स म्हणजे गुप्तपणे काम करणारे, पण गुप्तहेर खात्यात नोकरी नसलेले स्वतंत्र हेर! त्याखेरीज अतिरेक्यांच्या  गोटातले दोन लोक-ज्यांना आपण मोल(mole) म्हणू शकतो-  मदतीसाठी तयार होते. mole म्हणजे शत्रूपक्षात असलेले आपले मित्र! भारतीय गुप्तहेर संघटना रॉ आणि लष्करी गुप्तहेर खात्याने या  टारगेट कँपची पूर्ण माहिती दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कँपपैकी चार कँप्स लक्ष्य म्हणून निश्चित करण्यात आले. योजनेची गुप्तता जपण्यासाठी " ज्यांना माहिती असणे आवश्यक " अशाच काहीजणाना सामील करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होणे किंवा सर्व जवानांना वीरगती मिळणे हे दोनच पर्याय जवानांसमोर होते.

स्रोत

या तुकडीकडे कोणती ख़ास शस्त्रास्त्रे होती ? 
हे युध्द नव्हते किंवा फ़क्त चकमक नव्हती. हातात वेळही मर्यादित होता. हल्ल्याचा वेळ वाढणे म्हणजे  परतीचा वेळ कमी होणे . हा अतिरेकी आत्मघातकी हल्ला नव्हता, तर जवानांना सुखरूप घेऊन परत आणण्याचीही जबाबदारी होती. म्हणून  शस्त्रास्त्राची निवड त्यानुसार करण्यात आली. मेजर माइक टँगो यांच्याकडे M4A1 5.56-mm कार्बाइन होती. बाकी जवानांकडे  M4A1आणि इस्राएली Tavor TAR-21 रायफल  इनस्टांल्झा C90 disposable grenade launchers आणि Galil स्नायपर रायफल होत्या.  नाइटव्हिजन दुर्बिणी तयार ठेवण्यात आल्या होत्या.    
                    
प्रत्यक्ष हल्लाबोल कसा झाला?
लाईन ऑफ कंट्रोल (LOC)ला लागून असलेल्या चार लाँचपॅडवर हल्ला करण्याचे लक्ष्य निश्चित झाले होते. लाँचपॅड म्हणजे भारतातून पाठवण्यापूर्वीच्या सीमेलगतचे शेवटचे आश्रयस्थान! LOC च्या आत साधारण अर्धा किलोमीटरवर ही टारगेट्स होती. आत घुसल्यानंतर " पहिली गोळी ते शेवटची गोळी" हा वेळ फ़क्त एक तासाचा होता.
आत घुसायचे, गोळीबार करायचा, अतिरेक्यांचा खातमा करायचा आणि लगेच दुसरे लक्ष्य धरायचे या पध्दतीने हल्लाबोल करण्यात आला. या वेळात एकूण चाळीस अतिरेकी आणि दोन पाकिस्तानी जवान यांचा खातमा झाला.

जवानांची सुखरूप वापसी कशी झाली?
आत येण्याचा मार्ग वेगळा होता आणि परतीचा मार्ग वेगळा निश्चित केला होता. आत जाताना शत्रू बेसावध होता, पण परत येताना तो पूर्ण शक्तिनिशी पाठलाग करणार हे नक्की होते. त्यामुळे परतीचा मार्ग थोडा वळणावळणाचा पण जास्त सुरक्षित होता.
 मेजर टँगो यांच्या शब्दात सांगायचे तर,  "परत येण्याचे आव्हान फार जिकीरीचे होते. शत्रूकडे पाठ होती आणि गोळीबार अनिर्बंध चालू होता. अनेकवेळा गोळ्या कानाजवळून सणसणत गेल्या, थोड़ी उंची जास्त असती तर गोळीचा निशाणा होण्याची खात्री होता. शेवटचे साठ मीटर अंतर तर रांगतच पार करावे लागले."                        

स्रोत

या पुस्तकाचे नाव काय?
इंडियाज मोस्ट फिअरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज. या पुस्तकात अशा १४ कथा आहेत. शिव अरूर आणि राहुल सिंग हे लेखक आहेत .

सबस्क्राईब करा

* indicates required