computer

पोलिस तपासाच्या चातुर्यकथा: 'संशयितावर थेट आरोप' केला आणि झटकन उकलले दोन गुन्हे!!

पोलिसांच्या तपास पध्दतीवर सार्वजनिक माध्यमातून बरळत राहणे ही सध्याची फॅशन आहे. पण वरवर अगदी खाकी दिसणार्‍या तपासकामात मानवी मनाच्या अनेक मानसशास्त्रीय पैलूंचा वापर केला जातो. 'थेट आरोप करून संशयिताला बोलके करणे' हा त्यातलाच एक प्रकार आहे. निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी रविंद्र भिडे आज आपल्याला सांगणार आहेत अशीच एक कथा!

अशाच एका संध्याकाळी सुमारे चार वाजताचे दरम्यान एका इसमाने मुलुंड पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या गाडीतून त्यांचे रिव्हॉल्वर आणि सोबतच्या बुलेटस दोन्हीही चोरीला गेले होते.

झालं असं होतं की, एका मोठ्या राजकीय पक्षाचे हे नेते दुपारी सुमारे साडेतीन वाजताचे दरम्यान ते पाच रस्ता विभागातील एका दुकानासमोर गाडी थांबवून, दुकानात काही घेण्याकरता अंदाजे पाच मिनिटं गेले होते. छोटेसेच काम असल्यामुळे त्यांनी गाडीची दारे लॉक केलेली नव्हती. दुकानातून खरेदी घेऊन ते परत गाडीत येऊन बसले आणि सहज शेजारच्या सीटवर ठेवलेले पाऊच बघावे म्हणून त्या दिशेने त्यांनी बघितले असता ते पाऊच गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पाऊचमध्ये त्यांचे लायसन्सड्, गोळ्या भरलेल्या अवस्थेतील रिव्हॉल्वर आणि काही सुट्ट्या गोळ्या सुद्धा होत्या. तसंच त्यासोबत त्यांचं आर्म लायसन्स सुद्धा त्यात होतं. त्यांनी दहा-पंधरा मिनिटे आजूबाजूला चौकशी केली परंतु रिव्हॉल्वर असलेले पाऊच न मिळाल्यानं ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आले. रिव्हॉल्वर चोरीला जाणे ही एक गंभीर बाब होती, कारण केवळ रिव्हॉल्वरची चोरी महत्त्वाची नसून ते वापरून आणखी काही गुन्हे होण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती.

आम्ही ताबडतोब त्यांचा एफ. आय. आर. दाखल करून घेतला आणि त्याचवेळेस आमच्या डिटेक्शन स्टाफच्या दोन तुकड्या करून आजूबाजूच्या परिसरात चौकशीकामी पाठवून दिले. त्याच वेळी आम्ही तक्रारदाराला त्याच्या घरी नेऊन चुकून घरात रिव्हॉल्वर राहिले आहे का? याबाबत सुद्धा तपास केला. परंतु त्यांचे रिव्हॉल्वर घरात सापडले नाही आणि त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले की ते बाहेर पडताना नेहमी रिव्हॉल्वर असलेले पाऊच बरोबर घेऊनच बाहेर पडत असत आणि त्यादिवशी सुद्धा ते रिव्हॉल्वरचे पाऊच घेऊनच बाहेर पडलेले घरातल्या इतर माणसांनी पाहिले होते.

आता हा तपास करणे आणि चोरीस गेलेले रिव्हॉल्वर आणि बुलेट हस्तगत करणे हे अत्यंत आवश्यक होते आणि त्यानुसार आम्ही कसोशीने या गुन्ह्याचा तपास चालू केला. भर रस्त्यात कारमधून शिताफीने चोरी करणारा इसम शोधणे,हे खरोखरच मोठे आव्हान होते. डिटेक्शन आणि ॲन्टी-गुंडा पथक, तसेच पोलीस ठाणेत उपलब्ध असलेले मनुष्यबळ वापरून आणि त्यांच्या बरोबर अधिकारी घेऊन, आम्ही आमच्या रेकॉर्डवरील अशा प्रकारच्या चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुमारे दोन ते तीन तास उलटून गेले परंतु आरोपी आणि चोरीला गेलेले रिव्हॉल्वर याबद्दल कोणताही उलगडा होऊ शकला नाही.

हे सर्व करीत असताना रात्री सुमारे आठ वाजताचे दरम्यान मी नाईट ड्युटी अंमलदारांना सूचना देण्याकरता पोलीस ठाण्यात परत आलो. पोलीस ठाण्यांच्या पद्धतीप्रमाणे सकाळी आठ आणि संध्याकाळी आठ वाजता ड्युटी बदली होताना कामावर हजर होणाऱ्या अंमलदारांची परेड घेतली जाते.  त्यानुसार मी रात्रीच्या परेडवर हजर राहून अंमलदारांना चोरीला गेलेल्या रिव्हॉल्वरबद्दल योग्य त्या सूचना दिल्या आणि रात्री त्यांचे त्यांचे हद्दीत त्यांनी याबाबतचा तपास करावा म्हणून त्यांना आदेशही दिले. परेड संपल्यानंतर मी डिटेक्शन रूममध्ये येऊन पुढचे प्लॅनिंग ठरवण्याच्या बेतात असतानाच आमच्या पोलीस स्टेशनचे एक जाधव हवालदार डिटेक्शन रूम मध्ये आले. जाधव हवालदार हे सुमारे चार वर्षापेक्षा अधिक काळ या पोलिस ठाण्यात कार्यरत होते आणि यापूर्वी मुलुंड पोलीस ठाणे येथे त्यांनी डिटेक्शन हवालदार म्हणूनही काम केले होते. त्यांची एक नेहमीची सवय होती की पोलीस स्टेशनला आल्यावर ते नेहमी डिटेक्शन रूममध्ये येऊन दिवसभरात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेत असत आणि शक्य झाल्यास त्यांच्या अनुभवानुसार आरोपीबद्दल सूचनाही देत असत. रिटायरमेंट जवळ आलेले हवालदार साहेब प्रकृती अस्वास्थ्यामुळे डिटेक्शनचे काम करण्यास असमर्थ ठरले होते.

या दिवशी या जाधव हवालदारांनी एक छोटीशी माहिती माझ्यासमोर ठेवली, त्यांनी सांगितले की सुमारे एक वर्षापूर्वी मुलुंडमधील म्युनिसिपालिटीच्या एका शाळेत एका वर्गात शिक्षिका शिकवत असताना समोर ठेवलेल्या टेबलावरून त्यांच्या पर्समधील पैसे त्यांच्याच वर्गातील एका मुलाने शिताफीने चोरले होते. परंतु ही बाब इतर मुलांनी पाहिल्यामुळे त्यांनी शिक्षिकेला त्या मुलाचे नाव सांगितले आणि शिक्षिकेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्या मुलाला पोलीस ठाण्यात आणून त्याच्या आई-वडिलांना समक्ष परत असे न करण्याबद्दल वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आले होते. हा मुलगा त्या वेळेला अंदाजे तेरा वर्षाचा होता. आम्ही एक प्रयत्न म्हणून या मुलाकडे चौकशी करण्याचे ठरविले. जाधव हवालदारांना त्या मुलाचे डंपिंग रोडवरील घरही व्यवस्थित माहिती होते आणि त्या मुलालाही ते व्यवस्थित ओळखत होते. म्हणून आम्ही जाधव हवालदार यांच्यासोबत आणखी एक पोलिस हवालदार देऊन, एक प्रयत्न म्हणून त्या मुलाच्या घरी पाठविले.

ही वेळ साधारण नऊ वाजताची होती. जाधव हवालदार आणि त्यांच्या बरोबरचे अंमलदार हे वेळ न दवडता, साध्या वेशात सदर मुलाच्या डम्पिंग रोडवरच्या घरी गेले आणि दरवाजा वाजवून मुलगा घरात आहे का,याची चौकशी केली. त्या मुलाच्या आईने तो घरात असल्याचे सांगून, त्याला हाक मारली. तो समोर येताच हवालदार जाधव यांनी जरब असलेल्या आवाजात त्याला विचारले विष्णू, सामान कुठे आहे ? (गुन्हेगारी जगतात छोट्या फायर आर्मला सामान असे संबोधतात)
तो मुलगा या थेट प्रश्नाने इतका गांगरून गेला की त्याने सांगितले आहे की घरात!
हवालदार जाधव आणि त्यांच्याबरोबरच्या दुसऱ्या हवालदाराने ताबडतोब झडप मारून त्या मुलाला ताब्यात घेतले आणि त्या मुलाने दाखवलेल्या फळीवरच्या डब्यामागे ठेवलेले पाऊच काढून ताब्यात घेतले. त्यांनी ते पाउच क्षणभर उघडून त्यात रिव्हॉल्वर असल्याची खात्री करून घेतली. पाऊच बंद केले आणि तात्काळ पोलीस ठाण्यात फोन करून मला ही माहिती दिली. मी तात्काळ त्या मुलाचे घरी पोहोचलो, त्या मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच वस्तीतल्या दोन इसमांना पंच म्हणून पाचारण केले आणि त्यांचे समक्ष पंचनामा करून ते रिव्हॉल्वर आणि इतर सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. या सर्व वस्तू, तक्रारदाराने केलेल्या वर्णनाप्रमाणे योग्य होत्या. आम्ही तो अज्ञान मुलगा आणि पंचनाम्याअंतर्गत ताब्यात घेतलेल्या सर्व वस्तू घेऊन पोलीस ठाण्यात परत आलो.

हा मुलगा अंदाजे १४ वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन असल्याने त्याला अटक करता येणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीला सुरुवात केली. त्यानेही ही चोरी केल्याचे ताबडतोब कबूल केले. त्यानंतर आम्ही जप्त केलेले रिव्हॉल्वर, गोळ्या, पाऊच आणि लायसन्स हे पोलीस ठाण्यात थांबलेल्या तक्रारदाराला दाखवून या वस्तू त्यांच्याच असल्याची खात्री करून घेतली आणि त्यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला. आपले रिव्हॉल्वर आणि इतर वस्तू परत मिळाल्यामुळे तक्रारदारास फार आनंद झाला आणि त्यांनी हेरिव्हॉल्वर तात्काळ त्यांना देण्यात यावे अशी मागणी केली.

परंतु ही गुन्ह्यातील जप्त मालमत्ता होती. त्यामुळे 'कोर्टाच्या परवानगीशिवाय आम्ही तुम्हाला ते देऊ शकत नाही' हे त्यांना सांगण्यात आले. ते नाराजच झाले आणि थयथयाट सुरु केला. आम्हांला विविध प्रकारच्या धमक्या दिल्या, परंतु आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे अत्यंत खमके होते. त्यांनीही त्यांना समजवून सांगितले की मालमत्ता पोलीसांनी ताब्यात घेतलेली असली तरी आता दुसर्‍या दिवशी ती कोर्टात हजर करावी लागेल आणि त्यांना कोर्टातून त्या वस्तूची परत मिळण्याची ऑर्डर मिळू शकेल.  यावर तक्रारदाराने ते राजकीय पक्षाचे एक नेते असल्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून फोन करवले, परंतु ते रिव्हॉल्वर आणि इतर वस्तू परस्पर त्यांच्या ताब्यात देण्यास आम्ही असमर्थता दर्शवली.

त्याच वेळेस ज्या अल्पवयीन मुलाला आम्ही ताब्यात घेतले होते त्याच्यावतीने तो राहत असलेल्या विभागातून नागरिकांचा एक मोर्चा पोलीस ठाण्यावर आला आणि तो मुलगा लहान म्हणजेच अज्ञान असल्याने त्याला सोडून देण्याची मागणी करू लागला. म्हणजे आता आम्हाला एकाच वेळेला तीन संकटांचा सामना करायचा होता - पहिले म्हणजे गुन्ह्याची कागदपत्रे व्यवस्थित तयार करणे, दुसरे म्हणजे तक्रारदार आणि त्यांच्या वतीने फोन करणाऱ्यांना परिस्थिती नीट समजावून सांगून / हाताळणे आणि तिसरी म्हणजे ज्या मुलाला ताब्यात घेतला त्याच्या वतीने आलेल्या मोर्चाचे लोकांना तोंड देणे आणि त्यांना समजावून सांगणे. पोलीसांतील असलेल्या एकजुटीमुळे आम्ही या तीनही आव्हानांवर यशस्वीरीत्या मात केली. मुलाला ताब्यात घेऊन त्याला बाल सुधारगृहात पाठवून दिले. त्याच्यावतीने आलेल्या मोर्चाला समजावून सांगितले की दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टात हजर करू. त्याचे पुनर्वसन करण्याकरता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांना दिले . दुसरीकडे तक्रारदाराला सुद्धा दुसऱ्या दिवशी कोर्टात त्याचे रिव्हॉल्वर आणि इतर वस्तू परत मिळण्याकरता अर्ज दाखल करण्याची समज दिली आणि सर्वतोपरी सहाय्य करण्याचे कबूल केले.

झालं! हे प्रकरण संपलंसं वाटत असतानाच एक वायरलेस मेसेज आमच्याकडे फ्लॅश झाला आणि त्या वायरलेस मेसेजनुसार त्याच दिवशी संध्याकाळी सुमारे सहा वाजताच्या दरम्यान ठाण्यातल्या एका दुकानदाराला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन मुलांनी लुटल्याची अपडेट मिळाली. आता आम्हाला आलेल्या संशयानुसार आम्ही ताब्यात घेतलेले रिव्हॉल्वर हे ठाण्याच्या गुन्ह्यातही वापरले गेले असण्याची शक्यता होती. त्यानुसार आम्ही रात्री रिमांड होमला पाठवलेल्या मुलाकडे जाऊन चौकशी केली आणि त्याने ठाण्याचा गुन्हाही कबूल केला आणि हा गुन्हा करताना त्याच्यासोबत असलेल्या मुलाचं नाव आणि पत्ता हे दोन्ही त्यांनी सांगितले.

आम्ही मुलुंड पोलीस ठाणे हद्दीत परत येऊन दुसऱ्या मुलाचा शोध घेतला आणि त्यालाही आमच्या ताब्यात घेतला. हा मुलगा सज्ञान असल्यामुळे आम्ही त्याला ठाण्यातील गुन्हा केल्याचा संशयाखाली अटक करू शकलो. तात्काळ ठाणे पोलिसांना आम्ही अशा प्रकारचा मुलगा अटक केल्याचे कळविले. ठाणे पोलिस पथकाने मुलुंड पोलीस स्टेशनला येऊन त्या अटक मुलाकडे चौकशी केली आणि नंतर रीतसर पणे त्यांनी त्यांच्याकडील दाखल दरोड्याच्या गुन्हात त्या सज्ञान मुलाला अटक केली. दुसऱ्या दिवशी ठाणे पोलीसांनी आम्ही ताब्यात घेतलेल्या अज्ञान मुलालाही त्यांच्याकडील गुन्ह्यात ताब्यात घेतले.

आता आम्ही ताब्यात घेतलेले रिव्हॉल्वर हे दुसर्‍या गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार असल्यामुळे, आम्हाला ते कोर्टाच्या आदेशाने ठाणे पोलिसांच्या ताब्यात देणे अनिवार्य होते. त्यानुसार दुसर्‍या दिवशी ठाणे पोलिसांनी मुलुंड कोर्टात हे रिव्हॉल्वर ताब्यात मिळण्याकरता अर्ज दाखल केला आणि त्याच वेळेस आमच्या गुन्ह्यातील मूळ तक्रारदार यांनीसुद्धा ते रिव्हॉल्वर त्यांना परत मिळावे म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला. ठाण्यातील गुन्ह्यात हे रिव्हॉल्वर हत्यार म्हणून वापरलेले असल्याने, कोर्टाने ते तक्रारदारास देण्यास नकार दिला आणि ते रिव्हॉल्वर ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला. आमच्या आणि ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार त्या रिव्हॉल्व्हरमधून आरोपींनी एकही गोळी फायर केली नव्हती, परंतु हे तांत्रिक दृष्ट्या सिद्ध होण्याकरता ते रिव्हॉल्वर आणि बुलेटस् या बॅलेस्टिक एक्स्पर्ट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे पाठविणे आवश्यक होते.

आतापर्यंत आमच्या गुन्ह्यात तो अज्ञान मुलगा हा एकच आरोपी होता, परंतु ठाण्याच्या गुन्ह्यात तो अज्ञान मुलगा आणि त्याचा सज्ञान असलेला मित्र हे दोन्ही आरोपी होते. यातील रिव्हॉल्वरचे मालक (मूळ तक्रारदार) हे मुलुंड पोलिस ठाणे हद्दीत राहत असल्यामुळे कालांतराने आम्ही त्यांचे रिव्हॉल्वरचे लायसन्स रद्द करण्याकरता अहवाल पाठवून दिला.  ज्या माणसाला आपले रिव्हॉल्वर सांभाळता येत नाही तो स्वतः जरी गुन्हेगार नसला तरी, त्याच्या अशा निष्काळजीपणामुळे इतर गुन्हे घडू शकतात. हे आम्ही लायसन्स जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिले आणि आमच्या अहवालानुसार तक्रारदाराचे रिव्हॉल्वर लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.

आता यातील महत्त्वाची गोष्ट जी मी प्रथमतःच नमूद केली आहे, की काही वेळेला संशयिताला विचार करण्यास वेळ न देता त्याच्यावर थेट आरोप करणे हे खूप महत्त्वाचे असते आणि ते एक पोलिस तपासाचे मुख्य अंग असते. या केसमध्ये अज्ञान मुलावर थेट आरोप न करता, त्याला विचार करायला वेळ दिला असता तर कदाचित त्याच्याकडे रिव्हॉल्वर आणि इतर वस्तू आहेत हे त्याने कधीच कबूल केलेच नसते.

दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्या लहान मुलाने यापूर्वी एकदा चोरी केलेली होती, परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने, पोलिसांच्या रेकॉर्डनुसार तो गुन्हेगार नव्हता. त्यामुळे सदरच्या गुन्ह्यात त्याच्याकडे चौकशी करणे सुद्धा अतिशय कठीण काम होऊन बसले असते. त्यामुळे कधीकधी पोलिसांनी केलेले थेट आरोप आपल्याला व्यथित करतात,परंतु समजून घ्या की त्यांच्या तपासाचा तो एक भाग असतो. तिथे कोणाविषयी आकस अथवा द्वेष बुद्धी नसते

लेखकः रविंद्र भिडे (सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी)

सबस्क्राईब करा

* indicates required