भिकारी झाले डिजिटल...चीन मधल्या भिकाऱ्यांची भीक मागण्यासाठी नामी शक्कल !!

मंडळी, सध्या जमाना कॅशलेस व्यवहाराचा आहे. भारतात कॅशलेस व्यवहार तसा नवीनच.  पण चीनमध्ये डिजिटल व्यवहार फार पूर्वीच आलाय. चीनी लोक हे डिजिटल व्यवहाराच्या प्रेमातच आहेत राव. हे प्रेम एवढं आहे की तिथले भिकारी सुद्धा डिजिटल झालेत.

राव, जग डिजिटल होतंय, मग भिकारी कसे मागे राहतील? चीनमधले भिकारी चक्क ई-वॉलेट किंवा क्यूआर कोड्स वापरून भीक घेत आहेत. हे प्रमाण आता मोठ्या संख्येने वाढत आहे. 

स्रोत

चीनी भिकारी चीनमधल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर व मेट्रो स्थानकांवर आढळतात. त्यांच्याकडे क्यूआर कोडचा एक प्रिंटआउट असतो. लोकांच्या खिशात सुट्टे नसतील तर हे भिकारी ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून भीक देण्याची विनंती करतात. या मंडळींमध्ये अलिबाबा कंपनीचा ‘अली-पे’ किंवा ‘व्ही-चॅट वॉलेट’ प्रसिद्ध आहे.

मंडळी, ह्या डिजिटल भीकने आता वेगळंच वळण घेतलंय. चीनमध्ये उद्योजकांनी याचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. भीक देण्यासाठी स्कॅन केल्यानंतर त्या स्कॅनिंगमधून मिळणारा डाटा मार्केटिंगसाठी वापरला जातोय. भिकाऱ्यांना प्रत्येक स्कॅनच्या मागे एक ठराविक रक्कम दिली जाते. 

स्रोत

याही पुढे जात काही नवीन ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांनी ‘स्पॉन्सर्ड कोड्स’ तयार केले आहेत. तुम्ही पैसे न देता फक्त कोड फक्त स्कॅन केला तरी भिकाऱ्याला भीक मिळते. या स्कॅनमधून त्या-त्या कंपनीला योग्य तो डेटा मिळतो व त्याबदल्यात भिकाऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा ट्रान्स्फर होतात. राव, आता हा एक प्रकारे व्यवसाय झाला आहे.

मंडळी, अजून तरी भारतात असा प्रकार घडलेला नाही, पण पुढच्या काळात ही आयडिया आपल्याकडेपण येण्याची शक्यता आहे.

पुढे कधी ‘भगवान के नाम पे दे दो बाबा’च्या जागी ‘भगवान के नाम पे स्कॅन करो बाबा’ असं ऐकू आलं, तर दचकू नका राव !!

 

आणखी वाचा :

विमानाचं तिकीट काढून भीक मागणारा भिकारी...वाचाच हा किस्सा !!

दोन वर्ष भीक मागून घेतला मुलीसाठी फ्रॉक...एका बापाची कहाणी !!

सबस्क्राईब करा

* indicates required