computer

ओळख जिल्ह्यांची: शिरीष कुमारचं नंदुरबार ते देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ...काय काय आहे नंदुरबारमध्ये ??

नंदुरबार हा महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असलेला शेवटचा जिल्हा अनेकार्थाने विशेष आहे. खान्देशातल्या तीन जिल्ह्यांपैकी एक असणाऱ्या नंदुरबारच्या नावाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण सर्वात जास्त सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे, नंद नावाच्या राजाने वसवले म्हणून नंदुरबार नाव पडले असे म्हटले जाते. नंदुरबारला लोक प्रेमाने नंदनगरी म्हणतात. नंदुरबार जिल्हा आधी धुळे जिल्ह्याचा भाग होता पण १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.

या जिल्ह्याला तसा राजकिय इतिहास मोठा आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यावर पहिली सभा घेतली तो जिल्हा नंदुरबार!! एवढेच नव्हे तर आज देशभर प्रत्येक ठिकाणी लागणाऱ्या आधारची सुरुवात देखील नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावापासून झाली होती.

लहानपणी तुम्ही पाठ्यपुस्तकात शिरीषकुमारची गोष्ट वाचली असेल. शिरिषकुमार नंदुरबारचे वैभव आहे. अवघ्या १६ वर्षांच्या वयात शिरीषकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधी यांनी दिलेल्या चले जावच्या हाकेमुळे इंग्रजांविरुद्ध मोर्चा काढला. इंग्रजांना विरोध करत असताना शिरीषकुमार आणि त्यांचे सहकारी धारातीर्थी पडले पण आजही नंदुरबारसह संपूर्ण देशाला ते प्रेरणा देत असतात.

(शिरीषकुमार)

भौगोलिकदृष्ट्या नंदुरबार हा महत्वाचा जिल्हा आहे. एका बाजूला गुजरात सीमा आहे, तर दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशची सीमा लागून आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर हे रेल्वेस्थानक तर अर्धे महाराष्ट्रात आहे तर अर्धे गुजरातमध्ये! लोक स्पेशल ही गोष्ट आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी या स्टेशनवर थांबतात. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यातील नंदुरबार हा महत्वाचा दुवा आहे असे म्हणता येते. नंदुरबार जिल्ह्यावर निसर्गराजा मात्र प्रचंड मेहेरबान आहे आहे.

(नवापूर) स्रोत

नंदुरबारमधून सातपुडा या पर्वतरांगा जातात. तसेच तापी आणि नर्मदा नद्या या जिल्हाच्या विशेषत्वाला अजूनच खुलवतात. नंदुरबार जिल्ह्यात साजरे केले जाणारे अनेक सण-उत्सव हे राज्य आणि देश स्तरावर प्रसिद्ध आहे. काठी या ठिकाणी होणारी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. नंदुरबार शहरात साजरा केला जाणारा गणेशोत्सव देखील राज्यात नावाजला आहे. शहरातील दादा आणि बाबा गणपती यांच्यात होणारी हरिहर भेट ही राज्यातील कुतूहलाचा विषय असते. सारंगखेडा येथे होणारा चेतक फेस्टिव्हल घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी घोडे पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टारदेखील येत असतात.

(चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडा)

जिल्ह्यातील तोरणमाळ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ १२ महिने थंड असते. तेथील अतिशय सुंदर अशा वातावरणामुळे पर्यटकांचा मोठा ओढा या ठिकाणी पाहायला मिळतो. तोरणमाळ येथील खडकी पॉईंट येथे कमळांनी भरलेला तलाव हा तोरणमाळला स्वर्गीय सौंदर्य बहाल करतो.

(तोरणमाळ)

उनपदेव हे गरम पाण्याचा झरा सातत्याने वाहत असलेले स्थळ प्रेक्षणीय आहे. एका दिवसाच्या ट्रिपसाठी तर हे स्तर बेस्ट आहे. अस्तंबा हे सातपुडा पर्वतरांगेतील शिखर धार्मिक दृष्टीने महत्वाचे आहे. दिवाळीला याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. तसेच प्रकाशा हे ठिकाण प्रतिकाशी किंवा दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम इथे झालेला आहे.

(उनपदेव)

असा आहे हा आपला नंदुरबार जिल्हा. तुम्ही नंदुरबारकर असाल, तर आपल्या जिल्ह्याची माहिती शेअर करा, नसाल आणि अजून इथे भेट दिली नसेल, तर लॉकडाऊन नंतर इथे येण्याचा बेत ठरवून टाका. काय म्हणता?

सबस्क्राईब करा

* indicates required