टोल कर्मचाऱ्यांची करामत : ४० रूपयांचा टोल, पण खात्यातून उडाले ४ लाख!

हसावं की रडावं? अशा विचित्र प्रश्नात अडकावणारे प्रसंग कधी कधी माणसाच्या आयुष्यात येत असतात. आता इथंच बघा ना.. आपल्या  देशात आल्या मोबाईलच्या बॅलन्समधून जास्तीचे २ रुपये कट का झाले? या प्रश्नावरून मोबाईल कंपनीला धारेवर धरणारे लोक अस्तित्वात असताना एका डॉक्टरवर मात्र आपली कष्टाची कमाई एका झटक्यात उडालेली पाहायची वेळ आली. 

          म्हैसूरचे डॉ. राव हे शनिवारी रात्री आपल्या कारनं मुंबईला निघाले होते. कोची-मुंबई नॅशनल हायवेवर उडुपी जवळच्या गुंडमी टोल नाक्यावर त्यांनी गाडी उभी केली आणि टोलसाठीचे ४० रुपये सुट्टे नसल्यानं आपलं डेबिट कार्ड स्वाईप करायला सांगितलं. कार्ड स्वाईप करून कर्मचार्‍याने त्यांना टोलची पावती दिली आणि यांनी पावती न बघताच पुढचा प्रवास सुरू केला. पण थोड्या वेळाने आलेला बँकेचा एसएमएस वाचून मात्र डॉक्टर साहेबांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. कारण त्यांच्या बँक खात्यातून ४० रुपयांऐवजी चक्क ४ लाख रुपये वजा झाले होते! 

        आता डॉक्टर साहेबांनी परत गाडी टोलनाक्यावर नेली. तिथे जाऊन त्यांनी तिथल्या कर्मचारीवर्गाला त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण सारं व्यर्थ... २ तास प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही या लोकांनी आपली चूक मान्य केली नाही. शेवटी डॉक्टर साहेबांना पोलीसांची आठवण आल्यामुळे यांनी जवळच्या पोलीस ठाण्यातून पोलीसांना बोलवून आणलं. पोलिसांच्या आगमनानंतर मात्र टोल कर्मचार्‍यांना आपली चूक तात्काळ लक्षात आली. पहाटे ४ वाजता त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शेवटी डॉक्टर साहेबांच्या हातात रोख रुपये ३,९९,९६० परत दिले गेले. 

         मित्रांनो, असे प्रसंग तुमच्यावरही येऊ शकतात. तेव्हा बी केअरफूल!! 

सबस्क्राईब करा

* indicates required