हे झाडाचं पान आहे की फुलपाखरू? या व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

निसर्गात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळून येतात. निसर्गाला पूर्ण समजून घेता येते असे ठामपणे कधीच म्हणता येऊ शकत नाही, कारण दरदिवशी निसर्गातील नवनवीन गोष्टी समोर येतात. सध्या असाच एक व्हिडिओ वायरल होत आहे तो बघून लोकांना मोठे अप्रूप वाटत आहे.
ट्विटरवर किरण मुजुमदार शॉ यांच्यासहीत अनेकांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. यात एक माणूस पानाची हालचाल वेगळी वाटली म्हणून त्याला हात लावायचा प्रयत्न करतो. तो हात लावतो तोच ते पान फुलपाखराचे रूप घेऊन उडून जाते. खरतरं ते पान नव्हतेच, सामान्य पान वाटणारे ते सुंदर फुलपाखरू होते.
Best camouflage ever?
— Erik Solheim (@ErikSolheim) June 13, 2021
This is an Indian Oakleaf butterfly (Kallima inachus).
Nature is awesome!
pic.twitter.com/V7jxhEVGnF
या फुलपाखराला जीवशास्त्रीय भाषेत Kallima inachus म्हणतात. या फुलपाखराचं प्रचलित नाव इंडियन ओकलिफ बटरफ्लाय असे आहे. हे फुलपाखरू ऋतूनुसार आपले रंग बदलू शकते. सुकलेल्या पानाच्या आकाराचे असल्याने याला डेड लिफ या नावानेही ओळखले जाते. या फुलपाखराचं मूळ आशिया खंडात आहे. जपानपासून ते भारतापर्यंत हे फुलपाखरू आढळते. ऋतूनुसार त्यांचा आकार पण बदलत जातो. उन्हाळ्यात मोठे तर हिवाळ्यात लहान असा त्यांचा आकार असतो.
हे फुलपाखरू सहसा दाट जंगलाच्या भागात किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात आढळतात. चीनमध्ये हे फूलपाखरू दुर्मिळ झाले आहे. त्यांची संख्या वाढावी यासाठी चीनमध्ये प्रयत्न केले जात आहेत. या फुलपाखरावर सातत्याने इतर पक्षांचा हल्ला होत असल्याने ते नेहमीच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पंखांमध्ये झाकून राहतात, तसेच कुठलाही धोका वाटला तर लगेच उडून जातात.
तर, हे इंडियन ओकलिफ फुलपाखरू बघितल्यावर निसर्ग हे किती वैविध्यपूर्ण गोष्टींनी भरले आहे. याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.