एका गवतामुळे प्लास्टिकला पर्याय कसा मिळाला ? काय आहे या मुलाची कल्पना ?

प्लास्टिकचा कचरा नष्ट कसा करायचा हा सध्याचा मोठा प्रश्न आहे. प्लास्टिक नष्ठ करता येत नाही पण आहे ते पुन्हा पुन्हा वापरता येतं, ही प्लास्टिकची जमेची बाजू आहे. पण प्लास्टिकचा जेवढा कमीत कमी वापर होईल तेवढं पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलंच आहे. यासाठी सध्या प्लास्टिकला पर्याय शोधले जात आहेत. व्हियेतनामच्या एका तरुणाने एक नवीन पर्याय शोधला आहे. हा पर्याय इकोफ्रेंडली तर आहेच पण माणसाच्या आरोग्यासाठी पण चांगला आहे.
आपण रोज प्लास्टिकच्या ज्या वस्तू वापरतो त्यात प्लास्टिक ‘स्ट्रॉ’चा पण समावेश होतो. जागतिक दर्जावर विचार करायचा झाला तर एकट्या अमेरिकेत ५० कोटी स्ट्रॉ दररोज वापरले जातात. जगभरातल्या एकूण ८३० कोटी स्ट्रॉ समुद्रात जाऊन पडतात आणि समुद्र प्रदूषित करतात.
प्लास्टिक स्ट्रॉ’साठी व्हियेतनामच्या ‘त्रान मिन्ह तीएं’ नावाच्या तरुणाने एक उत्तम उपाय शोधून काढला आहे. त्याने गवतापासून इकोफ्रेंडली ‘स्ट्रॉ’ तयार केले आहेत. या स्ट्रॉ मध्ये कोणतंही केमिकल नाही. शिवाय वापर झाल्यावर ते खाताही येतात. त्याचा आरोग्याला फायदा असा की या गवतामुळे हिरड्या स्वच्छ राहतात.
हे कोणत्या प्रकारचं गवत आहे?
व्हियेतनाममध्ये ‘लेपिरोनिया आर्टिकुलाटा’ प्रकारातील गवत मिळतं. स्थानिक भाषेत त्याला ‘को बांग’ म्हणतात. या गवताचा आतील भाग नैसर्गिकरीत्या पोकळ असतो. या गवतापासून स्ट्रॉ तयार करण्यासाठी आधी गवत स्वच्छ केलं जातं. त्यानंतर त्यांचे २० सेंटीमीटर लांब काप केले जातात. त्यांना योग्य आकार दिला जातो आणि आतली पोकळ बाजू स्वच्छ केली जाते. अशा प्रकारे दोन प्रकारचे स्ट्रॉ तयार केले जातात. एक ओल्या गवताचं आणि दुसरं कोरड्या.
कोरड्या प्रकारातील स्ट्रॉ २ दिवस वळवून भाजले जातात. जवळजवळ ६ महिन्यांच्या काळात हे स्ट्रॉ वापरता येतात. ओल्या गवताचे स्ट्रॉ २ आठवडे वापरा येतात.
अशाच प्रकारचा पयत्न काही वर्षापूर्वी जर्मनीत झाला होता. पानांचा वापर करून त्यांनी वाटी ताट तयार केले होते. आपल्याकडच्या पत्रावळ्यांची ती हुबेहूब नक्कल होती. या लिंकवर पूर्ण बातमी वाचा.
जर्मनीत बनताहेत हाय-टेक पत्रावळी..
मंडळी, आपल्या भारतात पण हैद्राबादी इंजिनिअरने प्लास्टिकपासून पेट्रोल तयार करण्याची कल्पना शोधून काढली होती. शिवाय कौस्तुभ ताम्हनकर यांनी शून्य कचरा मोहीम राबवली होती. भारतातल्या कोणकोणत्या साधनांच्या आधारे आपल्याला प्लास्टिकला पर्याय शोधता येईल ? तुमच्याकडे काही कल्पना असतील तर नक्की सांगा !!