computer

बोभाटा बाजार गप्पा : ६ रुपयांचा शेअर तब्बल १ लाख रुपयात विकला जातोय ??

(गेल्या चार दिवसात शेअर बाजाराचे थोडेसे कठीण विवेचन वाचून बोभाटाचे वाचक कदाचित कंटाळले असतील. हा विषय थोडा किचकट आहे हे खरं पण समजल्यानंतर पैसे छापण्यासारखा आहे. या कारणासाठी आजचा शेअर बाजारचा लेख थोडासा मनोरंजक आणि गोष्टीरूप करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.)

शेअर बाजार हा कोळशाच्या खाणीसारखा असतो. या कोळशाच्या खाणीत हिरे पण लपलेले असतात. शेवटी कोळसा म्हणजे कार्बन आणि हिरा म्हणजे पण कार्बनच. त्यामुळे हिरे कोळशासोबतच असतात. पैलू न पाडलेला हिरा कोळशा सारखाच काळा दिसतो. हिरा हाताशी लागे पर्यंत खाण उपसून काढणं हा एकच उपाय गुंतवणूकदारांसमोर असतो. असाच एक हिरा म्हणजे एलसीड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड.

या हिऱ्याची बाजारात नोंदणीकृत किंमत आहे फक्त रुपये ५.८० पण बाजारातील गुंतवणूकदार एका शेअरसाठी १ लाख रुपये द्यायला तयार आहेत. ज्यांच्या हातात शेअर आहेत ते अधिकृतरीत्या विकायला गेले तर १ लाख रुपये किमतीत हा शेअर विकला जात नाही.

काही दिवसांपूर्वी या शेअर मध्ये ६ रुपयाच्या दरम्यान खरेदी-विक्रीची हालचाल सुरु झाली होती. पण एका दिवसात ५ टक्क्याहून अधिक भाव वाढला म्हणून या शेअर मधलं ट्रेडिंग थांबवण्यात आलं. असे ट्रेडिंग थांबवण्याला शेअर बाजारात “अपर सर्किट” लागणे असे म्हणतात. थोडक्यात लाख रुपये देणाऱ्याला हा शेअर मिळत नाही आणि विकणारा विकू पण शकत नाही. शेअर बाजारातल्या या हिऱ्याची अवस्था “आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना अशी झाली आहे”.

विकणारा लाख रुपयात विकायला तयार असेल पण घेणारा लाख रुपयात का घेईल हे कोडं आज आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत.

एलसीड इन्व्हेस्टमेंट्स या कंपनीकडे उत्पादन काहीही नाही. कारखाना, मजूर काहीही नाही. तरी पण ६ रुपयाच्या या शेअर मध्ये गेल्यावर्षी चक्क १५ रुपयाचा डिव्हीडंड (लाभांश) दिला होता. मग हा लाभांश आला कुठून ? या लाभांशाचे अंतर्गत रहस्य असे आहे की या कंपनीकडे ‘एशियन पेंट्स’ या कंपनीचे २ कोटी ८३ लाख शेअर्स आहेत. एशियन पेंट्सचा आजचा बाजार भाव लक्षात घेता या कंपनीची किंमत ४,२०० कोटी रुपये इतकी आहे. आता तुम्हाला कळले असेल की विकत घेणारा एका शेअर पाठीमागे लाख रुपये द्यायला का तयार आहे.

शेअर बाजाराच्या परिभाषेत सांगायचे तर एलसीड इन्व्हेस्टमेंट्स ही एक होल्डिंग कंपनी आहे. शेअर बाजारात होल्डिंग कंपन्यांच्या शेअर्सचा व्यवहार फारच कमी होतो. कारण त्यांचे भांडवल खूप कमी असते. भांडवल कमी म्हणजे शेअर्सची संख्या कमी. आज आपण ज्या एलसीड इन्व्हेस्टमेंट्स बद्दल बोलतो आहोत त्या कंपनीची किंमत ४,२०० कोटी असली तरी मूळ भांडवल फक्त २,००,००० रुपयेच आहेत.

आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ही मुलगी इतकी सुंदर आहे, हिचा बाप इतका धनवान आहे की लग्नाचं वय उलटून चाललंय पण नवरा मिळत नाहीये.

(यानंतर कधीतरी अशाच एका होल्डिंग कंपनीची कथा आम्ही तुम्हाला सांगू जिचं नाव आहे बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन.)

सबस्क्राईब करा

* indicates required