computer

विजेचे बिल पाहून बसला झटका, ग्राहक इस्पितळात दाखल!

अव्वाच्या सव्वा बिल येणे हे काही भारतात नवीन नाही. पण त्यातही किती जास्त बिल यावे याला मर्यादा असतात. मध्यप्रदेशातला नवा किस्सा वाचलात तर या किती जास्त बिल येऊ शकेल याच्या कल्पना जमीनदोस्त व्हायला हरकत नाही.

तर, ग्वाल्हेरमधल्या पूजा गुप्ता यांना चक्क ३,४१९ करोड रुपये लाईट बील आले आहे. या बिलामुळे तिच्या सासरेबुवांना मोठा धक्का बसून दवाखान्यात भरती करावे लागले. मध्यप्रदेश सरकारने या घोळाचे कारण टायपिंगमधील चूक असे सांगितले आहे. पूजा यांना वीजबिलात सुधारणा करून देखील मिळाली आहे. सुधारित वीजबिलाची रक्कम फक्त १,३०० रुपये आहे!!

 

पूजा यांना जुलै महिन्याच्या घरगुती वापराच्या लाईटचे बील आले. पण जेव्हा त्यावरची रक्कम त्यांनी पहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या सासर्‍यांना तर दवाखान्यात भरती करावे लागले. बिलाची रक्कम होती ३,४१९ करोड रुपये. तक्रार केल्यानंतर त्यांना वीजबिलात सुधारणा करून मिळाली आहे. २० जुलैला प्रसिध्द झालेल्या या बिलाची उलट तपासणी मध्यप्रदेश मध्य क्षेत्र विद्युत व्हिट्रान कंपनीच्या पोर्टलवरती करण्यात आली होती. परंतु ती योग्य असल्याचा दावा त्यांनी केला.
नंतर राज्य वीज बिल कंपनीने या बिलामध्ये दुरुस्ती केली. एमपीएमकेव्हीव्हीसीचे महाव्यवस्थापक नितीन मांगलिक यांनी प्रचंड वीज बिलासाठी मानवी चुकीला जबाबदार धरत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. "सॉफ्टवेअरमध्ये वापरल्या जाणार्‍या युनिट्सच्या जागी एका कर्मचार्‍याने ग्राहक क्रमांक लिहिला. परिणामी जास्त रकमेचे बिल आले. वीजग्राहकाला १,३०० रुपयांचे सुधारित बिल देण्यात आले आहे” असे ते म्हणाले.
मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी पत्रकारांना सांगितले की, वीज बिल दुरुस्त करण्यात आले असून संबंधीत कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required