computer

जगाच्या अंताच्या वेळी घेतलेले सेल्फी कसे असतील? आर्टिफिशियल इंटेलिजन्सने याचे दिलेले फोटो पाहाच..

कॅमेरा आणि माणसाचे नाते हे काही दशके जुने असले तरी माणसात असलेले शरीरप्रेम जुनेच आहे. आधी पेंटिंग, मग कॅमेरा आल्यावर फोटो असे माध्यम बदलले तरी स्वप्रेमामुळे माणूस नेहमी स्वतःला इतर माध्यमातुन चितारु इच्छित आलेला आहे. यात नवीन भर म्हणजे सेल्फी!! बदलत्या जगाचे हे ही एक मोठे माध्यम म्हणावे असेच आहे. कारण आधी कॅमेरा असो की पेंटिंग, कोणीतरी एकजण सोबत असावा लागत असे. 

सेल्फीने मात्र माणसाला आत्मनिर्भर केले. काढला फोन, घेतली सेल्फी असे सध्याचे वातावरण आहे. सेल्फीमुळे स्वप्रेमाला नवा आयाम मिळाला असला तरी सेल्फीमुळे कितीतरी लोकांच्या जीवावरही बेतले आहे.  काही असले तरी सेल्फीप्रेम काय संपत नाही आणि ते दिवसेंदिवस वाढतच जाताना आपण पाहत आहोत.

जगातला पहिला सेल्फी कधी घेतला गेला? हे ही वाचा..

आता तर काही विविध माध्यमांतून भविष्य स्पष्ट करू पाहणारे लोकही सेल्फी ही माणसाच्या शेवटापर्यंत असेल असेही सांगत आहेत. इतकेच नव्हे तर जगाचा अंत होत असताना सेल्फी घेतलेले लोक कसे दिसतील हेच आता एका व्यक्तिने समोर आणले आहे. माणसांच्या शेवटच्या सेल्फी बघितल्या तर कोणीही भेदरेल असे ते चित्र आहे. 

शेवट हा कुणालाच नको असतो. त्यात तेव्हाचे चित्र समोर येत असेल तर ते जास्तच त्रासदायक असते. तरीही अनेकांना याविषयी उत्सुकता असतेच. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. याच एआयचा वापर करून एकाने जगाच्या अंतावेळी घेतल्या गेलेल्या सेल्फीज कशा असतील हे समोर आणले आहे. 
 

सेल्फीचा कधीकधी फायदाही होतो बरं..

 

टिकटॉकवर एक रोबोट्स ओव्हरलोड नावाचे अकाउंट आहे. या अकाउंटवरून एआयच्या मदतीने विविध फोटो शेयर केले जातात. Dall- E2 या इमेज जनरेटरचा वापर करून या रोबोट ओव्हरलोड वरून जे फोटोज शेयर केले गेले आहेत, ते एखाद्या हॉलीवूडच्या हॉररपटापेक्षा कमी वाटणार नाहीत. 

जगाचा अंत होत आहे, सगळीकडे आग लागली आहे आणि हॉलिवूड सिनेमांमध्ये जसे सर्वबाजूने जग उध्वस्त होत आहे अशाप्रकारचे बॅकग्राऊंड माणसांच्या मागे दिसत आहे. माणसाचे डोळे, बोटं, चेहरा सगळंच चित्रविचित्र झाले आहे, काही ठिकाणी तर फक्त सांगाडे सेल्फी घेताना दिसत आहेत. आता हे फोटो बघून कोण नाही घाबरणार? 

सेल्फी कशा घ्याव्यात म्हणजे चांगल्या येतील असा प्रश्न आहे? मग वाचा उत्तर..

मागे मोठमोठे स्फोट होत आहेत आणि छिन्नभिन्न झालेला माणूस सेल्फी घेत आहे. आजूबाजूला आहे तो फक्त विध्वंस असे एकंदरीत निराशाजनक चित्र या फोटोंमध्ये दिसते. हा फोटो पोस्ट करत असताना पोस्टकर्त्याने म्हटले आहे, "मी एआयला विचारले, जगातील शेवटचा सेल्फी दाखव." बघता बघता १ कोटीपेक्षा जास्त लोकांकडून हे फोटो बघितले जात आहेत.
 

माणूस सदैव "उम्मीदपे दुनिया कायम है" या सूत्रावर चालणारा जीव असल्याने असे काही घडणार ही शक्यता अनेकांना पचत नाहीये. काहींनी हे पृथ्वीवरील नव्हे तर इतर कुठल्या ग्रहावरील चित्र असेल असे सांगितले आहे. तर काहींनी आपण जेव्हा हे फोटो बघितले तेव्हा आपण रात्रभर झोपलो नाहीत असे मत व्यक्त केले. 

एकाने सर्व गोष्टी चुकल्या आहेत असे मत व्यक्त करत पृथ्वी हा सुरक्षित ग्रह असल्याचे सांगितले. माणसाचा अंत इतका वाईट होईल ही गोष्टी कुणालाही पटायला कठीणच आहे. म्हणून लोकांचा कल हा वरील परिस्थिती ओढावेल हे नाकारण्याकडेच असला तरी पुढील काही शेकडा वर्षात काय परिस्थिती असेल यांचा अंदाज आज वर्तवणे तसे कठीणच आहे.

उदय पाटील