एलन मस्कचा पुणेकर मित्र!!

सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. मुलांचे आयडॉल आता सिनेस्टार्स, राजकारणी यांच्याबरोबर वेगळे काहीतरी करणारे उद्योजकही आहेत. एकाअर्थी उद्योगी उद्योजकांना चांगले दिवस आले आहेत. एलन मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत तसेच सर्वात लोकप्रिय उद्योजक असावा. याआधी स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स यांना मोठी लोकप्रियता लाभली, पण एलन मुळातच उद्योगी असल्याने त्याचा चाहता वर्ग मोठा आहे.

आधीच्या काळाच्या मानाने सोशल मीडिया प्रगत झाल्याने कोणीही कोणाशीही संपर्क साधू शकतो. संपर्क सोपा झाला असला तरी हुशार लोक तितक्याच हुशार लोकांना संपर्कासाठी प्राधान्य देतात हे ही खरे आहे. आता एलन मस्कचे वैयक्तिक आयुष्यात किती मित्र आहेत माहिती नाही. पण त्याचा एक ट्विटर मित्र आहे आणि तो चक्क आपल्या पुण्यात राहतो.

एलन मस्क ट्विटरवर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. त्याने केलेल्या ट्विट्सवर नेहमीच हजारो लाखो प्रतिक्रिया असतात. यात एखाद्याला चुकून एलनने लाईक केले तरी कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. पण आपल्या पुण्यातील या भावाला एलनने एक नाही, तर अनेक वेळा रिप्लाय दिला आणि त्याच्यासोबत संवाद साधला. या तरुणाचे नाव आहे प्रणय पाटोळे!!!

प्रणय २३ वर्षांचा आहे. टीसीएसमध्ये तो मशीन लर्निंग इंजिनिअर म्हणून काम करतो. त्याने बिजनेस ऍनालिटिक्समध्ये मास्टर्स केले आहे. एलन आणि प्रणयच्या मैत्रीची सुरुवात २०१८ साली झाली. टेस्ला कारच्या ऑटोमॅटिक विंडस्क्रीन वायपर आणि पावसामुळे त्यात निर्माण होणारी समस्या या विषयी प्रणयने ट्विट केले होते. या ट्विटला खुद्द एलनने उत्तर देत पुढच्या लॉन्चवेळी हा विषय मार्गी लावू असे 'आश्वासन' त्याने त्यात दिले.

प्रणयभाऊ खुश झाले!! त्याने आपल्या आईवडिलांसोबत हा आनंद साजरा केला. अशाप्रकारे प्रणय आणि एलन यांची मैत्री सुरू झाली. एलन अधून मधून त्याच्या ट्विटला उत्तर देत असे. पुढे तर थेट इनबॉक्समध्ये त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. साहजिक असणार प्रणयची अभ्यासाची झेप बघून एलन देखील अवाक झाला असणार म्हणूनच इतक्या व्यस्त वेळेतून तो प्रणय सोबत संवाद साधत असे. आता तर थेट प्रणयला भेटीसाठी वेळ देत त्याने प्रणयच्या हुशारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

प्रणयने या भेटीचा फोटो ट्विट केला आणि सर्वांना या अवघ्या २३ वर्ष वय असलेल्या मुलाचे कौतुक वाटू लागले. प्रणयने ट्विट करत म्हटले आहे की, टेक्सास येथील गिगाफॅक्टरी येथे झालेली तुमची भेट ही ग्रेट होती. तुमच्यासारखा नम्र आणि जमिनीवरील माणूस मी आजवर बघितलेला नाही. तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात.

प्रणयचे १ लाख ८३ हजार ट्विटर फॉलोअर्स आहेत. २०२० पासून दर दोन दिवसांनी एलनने प्रणयला रिप्लाय दिल्याचे एखादे तरी ट्विट दिसत असे. आपण एलनला कितीही साध्या गोष्टी विचारल्या तरी तो नम्रपणे उत्तर देतो असेही प्रणय म्हणतो. तो जसा सोशल मीडियावर दिसतो तसाच खऱ्या आयुष्यात देखील आहे.

प्रणयने घेतलेली भरारी ही अनेक तरुणांनी लक्षात घ्यावी अशी आहे. आपल्याला नगरसेवक, आमदार, शहरातील विविध 'भाऊ' ओळखतात, यापेक्षा एलन मस्क ओळखतो ही ओळख कितीतरी पटीने मोठी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required