computer

ज्योतिष्याच्या नादाला लागून खाल्ली माती ! दोसा किंग राजगोपालला झाली जन्मठेप !

मंडळी ज्योतिष्याचा नाद लय भयंकर!! कुणाला काय सल्ला देतील काही नेम नाही. बिचाऱ्या लव मॅरेजवाल्या पोरांचा तर सर्वात मोठा दुश्मन ज्योतिषीच असतो. मोठ्या मेहनतीने आई वडिलांना राजी करावे, तर मध्येच ज्योतिषी टपकतो. कुणाचा चांगला बिजनेस चाललेला असतो, ज्योतिषीबुवा हळूच नको तिथे पैसे गुंतवायला सांगतो आणि बिचाऱ्याचे वाटोळे होते. अशा खूप घटना तुम्ही ऐकलेल्या असतील राव!! पण आज आम्ही तुम्हाला सांगत असलेली घटना ऐकून तुमचे पण डोके गरगर फिरेल. एका ज्योतिष्यामुळे चक्क एका अब्जोपती बिजनेसमनला जन्मठेप भोगावी लागणार आहे !! काय आहे पूर्ण प्रकरण चला समजून घेऊ...

चैन्नई ते अमेरिका - सरवना भवन

अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेला पी. राजगोपाल नावाचा तमिळनाडूमधला एक तरुण. त्याने मेहनतीने स्वतःचे रेस्टॉरंट सुरु केले. हळूहळू धंदा मोठा केला. थोड्याच वर्षांत आख्खं जग त्याला 'दोसा किंग' म्हणून ओळखायला  लागलं. प्रत्येक शहरात त्याचे रेस्टॉरंट 'सरवना भवन' दिसायला लागले. आजच्या तारखेस 'सरवना भवन' रेस्टॉरंट चेनच्या ८० शाखा जगभर पसरल्या आहेत. दुबई-लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलीया सर्वत्र एकच नाव होते-'सरवना भवन' रेस्टॉरंट चेन!!! एका छोट्या दुकानापासून सुरुवात करून पी. राजगोपाल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला. पण ...पण..  या गड्याचा एक विक पॉईंट होता, तो म्हणजे त्याचा ज्योतिषी! या ज्योतिषी बुवाच्या नादी लागून एकाच्या जागी गड्याने दोन लग्नं केली. इथवर सगळे ठीकच होते, पण नंतर याच ज्योतिषी बुवाच्या नादाने त्याचे ग्रह तारे फिरले राव!! 

मती फिरली आणि माती खाल्ली

राजगोपालकडे मॅनेजर म्हणून रामास्वामी नावाचा एक माणूस कामाला होता. रामास्वामीला जीवज्योती नावाची एक मुलगी होती. तिने शांतकुमार नावाच्या एका शिक्षकासोबत लव्हमॅरेज केले होते. एके दिवशी रामास्वामी आणि त्याची मुलगी राजगोपालकडे कर्ज घेण्यासाठी गेले. तिथे राजगोपालच्या ज्योतिष्याने तिला बघितले आणि राजगोपालला सल्ला दिला की हिच्याशी तिसरे लग्न कर. राजगोपाल ज्योतिषी जे सांगत असे तेच करत असे. मग हा भाऊ हात धुवून रामास्वामीच्या मुलीच्या मागे लागला. काम काढून तिला भेटायला बोलवणे, तिला महागड्या गिफ्ट देणे अशा गोष्टी तो करायला लागला.
 राजगोपाल जीवज्योतीला इम्प्रेस करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करत होता. पण या सगळ्याचा फायदा होत नाही हे बघितल्यावर त्याने वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायला सुरुवात केली. त्याने एका डॉक्टरच्या मदतीने जीवज्योतीला सांगितले की तुझ्या नवऱ्याला  HIV टेस्टची गरज आहे. पण ती काय मानली नाही राव!! त्याची नाटकं वाढत गेल्यावर तिने त्याला पोलीसात जाण्याची धमकी दिली. त्यावर हा म्हणे म्हणायचा की पोलीस माझ्या खिशात आहेत, माझे काहीही होणार नाही . एवढेच नाहीतर "माझे दुसरे लग्न पण असेच बळजबरीने झाले आहे.  पण माझी बायको आज राणीसारखी जगते" असे सांगून तिचा होकार मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. 

सहानूभूती मिळवायला स्ट्रेचरवरून थेट कोर्टात !!

शेवटी सगळे प्रयत्न केल्यावर पण जीवज्योती ऐकत नाही म्हटल्यावर त्याने एक भयंकर पाऊल उचलले.  राजगोपालच्या अंगात रावण संचारला. जीवज्योतीला आणि कुटुंबाला छळण्याचे अनेक मार्ग शोधून गेले पण तेही व्यर्थ झाले. अहंकाराच्या वणव्यात आहुती पडली शांतकुमारची. 
त्याने थेट  जीवज्योतीचा नवरा शांतकुमार याचा खून करवला. जीवज्योतीने हार मानली नाही. नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती लढतच राहिली. या संघर्षात ती एकटी होती. संथकुमारच्या भावानेसुद्धा त्याचे प्रेत ओळखण्यास नकार दिला होता. राजगोपालकडे प्रचंड पैसा होता. तो सगळ्या पद्धतीने तिला दाबण्याचा प्रयत्न करत होता. एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटावी एवढा थरार भरलेल्या या प्रकरणात शेवटी जीवज्योतीला न्याय मिळाला. २००१ साली घड़लेल्या घटनेत मद्रास हायकोर्टाने  राजगोपालला २००९मध्ये जन्मठेपेची शिक्षा  सुनावण्यात आली. तो सुप्रीम कोर्टात गेला. दोनच दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने त्याची याचिका फेटाळून त्याला सरेंडर करायला सांगितले.  शेवटी जे रावणाचे झाले तेच राजगोपालचे झाले. त्याच्या मनमानीचे कायदेशीर दहन झाले.

 

राजगोपाल साऊथ इंडीयन सिनेमाच्या सनसनाटी स्टाईलमध्ये ऑक्सीजन मास्क लावून, स्ट्रेचरवरून कोर्टासमोर आला.  जीवज्योतीला न्याय मिळाला. 
मंडळी, सगळे झाले पण ज्याच्या सांगण्यावरुन हे झाले त्या ज्योतिष्याचे काय? त्याने राजगोपालला  बेअक्कल सल्ला दिला, जीव गेला शांतकुमारचा, संसार मोडला जीवज्योतीचा!! खूनाच्या चार्जशीटमध्ये ज्योतिषाचे पण नाव असायला हवे होते का? तुम्हाला काय वाटते?

सबस्क्राईब करा

* indicates required