'हायकोर्टाचे किस्से' बोभाटाची खास लेखमालिका लवकरच तुमच्या भेटीला !
शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं लाख वेळा ऐकूनही कोर्टाची पायरी कधीतरी चढावीच लागते. तोपर्यंत आपण फक्त सिनेमातले कोर्ट आणि जज्ज बघितलेले असतात. प्रत्यक्षात खर्या खर्या कोर्टात गेल्यावर हा भ्रमाचा भोपळा फुटतो .भयंकर नैराश्यजनक -कालापव्यय करणार्या -निरस वातावरणात जीव गुदमरून जातो. पण आता बोभाटाच्या वाचकांना हे अनुभवण्यासाठी कोर्टाची पायरी चढायला नको.'हायकोर्टाचे किस्से' या बोभाटाच्या नव्या मालिकेत कोर्टाचे आणि विशेषतः जज्जांचे मनोरंजक किस्से आपण वाचणार आहोत.
'हायकोर्टाचे किस्से' या मालिकेचे लेखक श्री अजित गोगटे यांचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.
श्री अजित गोविंद गोगटे व्यवसायाने निवृत्त पत्रकार आहेत. (लोकसत्ता-मुंबई-२९ वर्षे आणि लोकमत-मुंबई १० वर्षे)
त्यांचे विशेष प्राविण्य: कायदा आणि न्यायालये यासंबंधीची पत्रकारितेत आहे. मराठीत या स्वतंत्र पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली.
त्यांच्या चार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभवांवरील `पाळण्यात न दिसलेले पाय` हे पुस्तक येत्या काही महिन्यांत प्रसिद्ध होणार आहे.
ही मालिका आणि पुस्तक लिहिण्यामागे त्यांची त्यांची भूमिका त्यांच शब्दात आता वाचू या !
"तीन दशकांहून अधिक काळ `लोकसत्ता`चा प्रतिनिधी म्हणून मुंबई हायकोर्टात वृत्तांकन करताना स्मरणात राहतील असे अनेक अनुभव आले. त्या त्या वेळी त्यापैकी अनेक वेळा प्रसंगोपात्त बातम्याही दिल्या. परंतू न्यायालयांच्या विरोधात बातम्या छापायला वृत्तपत्रे धजावत नसल्याने त्यापैकी अनेक घटना व प्रसंग गुलदस्त्यात राहिले. आपल्याला बाह्य रुपाने कोर्टात चालणारे काम दिसत असते व त्याची माहितीही असते. पण तेथे काम करणारे न्यायाधीश, कर्मचारी व अधिकारी यांच्यातही मानवी स्वभावानुसार काही मासलेवाईक नमुने असतात. ते बाहेरच्या लोकांना दिसत नाहीत. शिवाय न्यायालयाच्या प्रशासनाचे काम कसे झापडबंद व साचेबंद पद्धतीने चालते हेही वरकरणी समजत नाही. यातही ‘हिज लॉर्डर्शिप’ किंवा ‘हर लेडीशिप’ बोलतील-वागतील ते ब्रह्मवाक्य असते व त्याचा प्रतिवाद करण्यास कोणी धजावत नाही. या घटना विस्मृतीत न जाता नव्या पिढीलाही त्याची माहिती व्हावी यासाठी यातील काही घटना व अनुभव या परिशिष्टात दिले आहेत. यातील काही व्यक्तींची नावे तुम्हाला अनोळखी असतील. त्या व्यक्ती एक तर माझे `लोकसत्ता`मधील सहकारी होते किंवा हायकोर्टातील वकील अथवा अधिकारी होते. ते तुमच्या ओळखीचे नसण्याने किश्श्याची मजा नक्कीच कमी
होणार नाही."




