computer

इतिहासाला कलाटणी देणाऱ्या हत्या:कृष्णवर्णीयांचे गांधीजी मार्टिन ल्यूथर किंग ज्यु. यांचंही मरण बंदुकीच्या गोळीनेच लिहिलेलं होतं!!

अमेरिकेमध्ये बराक ओबामा यांच्यासारखी आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती स्वतःच्या गुणवत्तेवर थेट राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकते हे अमेरिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्याचं द्योतक आहे. पण पूर्वी मात्र अशी स्थिती नव्हती. अमेरिकेतील यादवी युद्ध (सिव्हील वॉर)नंतर अमेरिकेला एक अजून कुप्रथा हद्दपार करायची होती. ही प्रथा म्हणजे वर्णभेद- गोरे आणि काळे यांच्यात केला जाणारा भेदभाव.

पूर्वी अमेरिकेत काळ्या लोकांना मुख्यतः काम करण्यासाठी, गुलाम म्हणून आणलं जाई. त्यांना कोणतेही अधिकार नव्हते. पदोपदी अपमानास्पद वागणूक दिली जाई. त्यांची स्वच्छतागृहं, त्यांच्या वस्त्या, चर्च सगळं स्वतंत्र असायचं. अगदी बसमध्येही त्यांच्या जागा शेवटी असत. त्याचवेळी कुणी गोरी व्यक्ती उभी असेल तर तिला आपली जागा द्यावी लागे. 'हिडन फिगर्स' या चित्रपटात काळ्या वा निग्रो लोकांच्या तत्कालीन परिस्थितीचं यथार्थ वर्णन केलं आहे. थोडक्यात त्याकाळी सगळे अधिकार, कायदे हे गोऱ्या लोकांच्या बाजूने होते. पण कुठे ना कुठे चुकीच्या, अमानुष गोष्टींना विरोध केला जातोच. असाच विरोध डिसेंबर १९५५ मध्ये मॉंटेंगोमेरी या ठिकाणी झाला. निमित्त होतं बसमध्ये गोऱ्या माणसासाठी जागेवरून उठायला नकार देण्याचं. नकार देणारी व्यक्ती नागरी चळवळीतील कार्यकर्ती होती. या नकारासाठी त्याला अटक करण्यात आली. ही बातमी सगळीकडे पसरून त्याचा उद्रेक झाला. कृष्णवर्णीय लोकांनी 'बस बॉयकॉट' नावाचं आंदोलन सुरू केलं. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना या आंदोलनाचं नेतृत्व धार्मिक कुटुंबात वाढलेल्या मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर या तरुणाकडे आलं.

या मार्टिनने तत्वज्ञानात पीएचडी केली होती. त्याच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. परिणामी त्याने महात्मा गांधींच्या शैलीने लढायचं ठरवलं. या घटनेनंतर अमेरिकेतील बहुसंख्य निग्रो लोकांचं नेतृत्व मार्टिन ल्युथर किंग ज्यु. कडे आलं. त्यांनी सुरुवातीला धर्मोपदेशक म्हणून काम केलं. पण नंतर मात्र वर्णभेदविरोधी चळवळीसाठी आयुष्य वेचलं. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास सहन करावा लागला. त्यांचा लढा त्यांनी अहिंसेच्या मार्गाने लढला. त्यामुळे त्यांना 'अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे महात्मा गांधी' ही उपाधी मिळाली. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर्न ख्रिश्चन लीडरशिप कॉन्फरन्स ही संघटना स्थापन केली. त्याद्वारे त्यांनी कृष्णवर्णीयांना मतदानाचा हक्क मिळवून देण्याचं ध्येय जाहीर केलं. कृष्णवर्णीयांसाठी सिव्हील राइट्स(नागरी हक्क) चळवळही चालवली. किंग ज्युनियरची लोकप्रियता दिवसागणिक वाढायला लागली. त्यांच्या अनुयायांमध्ये काळ्यांबरोबरच काही उदारमतवादी गोरेही होते. त्याचं खरं स्वरूप न्यूयॉर्क सिटीच्या रिव्हरसाइड चर्चच्या समोर दिलेल्या भाषणाच्या वेळी जाणवलं. प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर त्यांनी त्यांचं प्रसिद्ध 'आय हॅव अ ड्रीम' भाषण केलं. वयाच्या अवघ्या पस्तिशीत त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. पण व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने भाग घेतल्याचा त्यांनी निषेध केल्याने गोरे अनुयायी त्यांच्यावर चिडले.

 

यातच भडका उडाला तो एका आंदोलनाचा. मेम्फिस या शहरात सफाई कामगारांचा मोर्चा निघणार होता. या मोर्चातील बहुतेक कामगार हे आफ्रिकन अमेरिकन होते. त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना फक्त एक डॉलर प्रति तास एवढीच मजुरी दिली जाई. मजुरीत वाढ व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा निघणार होता. त्याला पाठिंबा देण्यासाठी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर शहरात दाखल झाले. मात्र त्यांची ही शेवटची चळवळ ठरली. कारण या ठिकाणी एका माथेफिरूने त्यांना गोळी मारून ठार केलं. या माथेफिरूचं नाव होतं जेम्स अर्ल रे. त्याने किंग ज्युनियर यांना नेमकं का मारलं याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्यापैकी एक म्हणजे, तो वर्णभेदाचा कट्टर समर्थक होता.

हत्या झाली त्यादिवशी जेम्स किंग राहात असलेल्या लॉर इन मॉटेल या हॉटेलातील रूम नंबर ३०६ च्या समोर असलेल्या रूमवर येऊन थांबला. त्यांना मारण्यासाठी त्याने एक पिस्तूल आधीच खरेदी केलं होतं. दुपारी किंग ज्युनिअर त्यांच्या खोलीच्या बाल्कनीत आले. हा पठ्ठ्या तयारीतच होता. आजूबाजूला एकदम फायरिंगचा आवाज ऐकू आला आणि एक गोळी किंग यांच्या मानेत घुसून बाहेर निघाली. किंग ज्युनिअर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. मेम्फिसच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ सेंट जोसेफ रुग्णालयात नेलं. तिथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. किंग गेले.

जेम्स स्वतः अट्टल गुन्हेगार होता. त्याला एका दरोड्याप्रकरणी वीस वर्षांची शिक्षा ठेवण्यात आली होती. मिसूरी येथील जेल फोडून तो फरार झाला होता. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्यावर गोळ्या झाडून तो तिथूनही पळून गेला, पण काही दिवसातच त्याला अटक झाली.

या हत्येनंतर वॉशिंग्टन डीसीसह अमेरिकेच्या सुमारे १०० शहरात दंगली उसळल्या. या दंगलींमध्ये ३५०० लोक जखमी झाले, तर ४० पेक्षा जास्त लोक मारले गेले. हा त्याचा तात्काळ झालेला परिणाम. हे सगळं त्या माणसासाठी होतं ज्याने शांततेच्या मार्गाने शांततेचा लढा दिला होता, मात्र दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी हिंसेने जीव गमावला होता.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required