भारतीयांसाठी लवकरच ई-पासपोर्ट येतोय, तो काय आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा ते जाणून घ्या!!

आजकाल सगळ्या गोष्टी डिजिटल होत आहेत. आर्थिक देवाण-घेवाण डिजिटली होतेच, त्याशिवाय अनेक महत्वाची कागदपत्रंही डिजिटल होत आहेत. यासंदर्भातील नवी बातमी म्हणजे पासपोर्ट सेवाही आता ऑनलाईन होणार आहे. लवकरच ई-पासपोर्ट सर्विस सुरू होणार आहे. ई-पासपोर्ट हा सध्याच्या पासपोर्टपेक्षा अधिक सुरक्षित असेल. ई-पासपोर्ट मुळे अनेक गोष्टी सोप्या आणि सुरक्षित होणार आहेत.आज समजून घेऊयात ई-पासपोर्ट विषयी!

डिजिटल पासपोर्ट हे बायोमेट्रिक डेटामुळे अधिक सुरक्षित असतील. पासपोर्ट जॅकेटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असेल. त्या चीपमध्ये पासपोर्ट धारकाच्या वैयक्तिक तपशीलांचा समावेश असेल. तसेच यावर डिजिटल स्वाक्षरी असेल ज्यामुळे कुठल्याही देशात गेल्यास तुमच्या स्वाक्षरीची पडताळणी करणे सोपे जाईल. यामध्ये कोणतेही बदल करणे सोपे असणार नाही.

तसेच तुम्हाला माहित असेल की पासपोर्टमध्ये बोटांचे ठसे वापरले जातात. फिंगरप्रिंटस हा बायोमेट्रिक्सचाच एक भाग आहे. ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित बनवण्यासाठी केवळ बोटांचे ठसेच घेतले जाणार नाहीत, तर यात अजून नव्या सुविधा आहेत. व्यक्ती ओळखण्यासाठी बोटांच्या ठशांव्यतिरिक्त आयरिस म्हणजेच डोळ्यांच्या बुबुळांचा वापर होणार आहे. जगात कुणाही दोन व्यक्तींची, अगदी सारख्या दिसणाऱ्या जुळ्यांची बुब्बुळेही एकसारखी नसतात. त्यामुळे बुब्बुळांमुळे त्या व्यक्तीची खरी ओळख पटेल आणि त्यामुळे पासपोर्टचा चुकीचा वापर करून होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल.

जगातील अनेक देशांकडे ई-पासपोर्ट सेवा आहे. भारतात ही लवकर सुरू होत असल्याने कुतूहल आहे. अर्थात ई-पासपोर्ट सेवा पूर्णपणे पेपर-मुक्त असणार नाही. त्यात काही कागदपत्रे देखील असतील. कारण अजून विसा स्टॅम्पिंग पेपरवरच केले जाते. कदाचित भविष्यात हेही ऑनलाईन झाल्यास ही प्रक्रिया कागदाशिवाय होऊ शकते.

भारतातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी टीसीएस या कंपनीला ई-पासपोर्ट बनवण्याचे काम मिळाले आहे. टीसीएस आधीच सरकारच्या पासपोर्ट सेवाकेंद्रांचे काम पाहात आहे. पासपोर्ट छापणे आणि देणे वगळता टीसीएस पासपोर्टसंबंधित सर्व कामे करणार आहे. ई-पासपोर्टसाठी सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) यांनी बनवले आहे. नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसला ई-पासपोर्ट तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्टॅक्टलेस इनले खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे.

सध्या ई-पासपोर्टची चाचणी सुरू आहे आणि आतापर्यंत २०,०००अधिकृत ई-पासपोर्ट जारी केले गेले आहेत. तसा इ-पासपोर्ट भारताला अगदीच नवा आहे असंही नाही. भारतातला पहिला ई-पासपोर्ट २००८ मध्येच तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना जारी करण्यात आला होता. ePassports व्यतिरिक्त सरकार डिजिटल पासपोर्ट जारी करण्याचा विचार करत आहे. हे डिजिटल पासपोर्ट स्मार्टफोनमध्ये सेव्ह करता येतील.

ई पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर सध्या तुम्ही जसा पासपोर्टसाठी अर्ज करता तशीच अर्ज प्रक्रिया आहे. ई-पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्जदारांना सध्याच्या प्रक्रियेनेच जावे लागेल. जेव्हा ई-पासपोर्ट प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा अर्जदारांना ePassports मिळण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत अर्जदारांना नेहमीचे पासपोर्ट मिळत राहतील.

ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हे नवे ई-पासपोर्ट लवकरच सर्वांना मिळतील.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required