computer

कसोटी पदार्पणात १६ विकेट घेणाऱ्या नरेंद्र हिरवाणीने नंतर काय केले आणि तो आज काय करत आहे?

क्रिकेटच्या खेळात अनेक महान खेळाडू होऊन गेले. या खेळाडूंना बघून भारतातील लाखो मुलं क्रिकेटर होण्याची स्वप्नं पाहात असतात. दुसरीकडे असेही खेळाडू आहेत, जे जोरदार एन्ट्री करतात पण काही काळाने कुठे गायब होतात काही कळत नाही. हे वाचून अनेक खेळाडू तुमच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले असतील.

नरेंद्र हिरवानी हे नाव तसे आजच्या पिढीला माहीत असण्याचे काही कारण नाही. पण ९० च्या दशकात क्रिकेट बघत मोठ्या झालेल्या लोकांना मात्र तो आठवत असेल. आज आठवणार नाही इतका दुर्लक्षित झाला असला तरी आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने तुफान हवा केली होती.

एक काळ होता जेव्हा वेस्ट इंडिजला हरवणे हे म्हणजे दिव्य काम समजले जात असे. त्याकाळी म्हणजे १९८८ साली नरेंद्र हिरवानी याने आपल्या पहिल्याच टेस्ट सामन्यात १६ विकेट घेत 'एकच फाईट वातावरण टाईट' अशी किमया करून दाखवली होती. दोन्ही इनिंग्समध्ये ८-८ विकेट घेत भारताच्या विजयात त्याने सिंहाचा वाटा उचलला होता.

ही सिरीज हिरवानीने एकतर्फी गाजवली होती. कारण सलग ३ सामन्यांमध्ये ४ विकेट घेणारा तो एकमेव भारतीय बॉलर ठरला होता. साहजिक तोच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. आता वेस्ट इंडिजला इतका जबरदस्त दणका देणारा बॉलर ठरल्यावर पठ्ठ्या देशभर सुपरहिट झाला.

पुढील वर्षी परत संघ वेस्ट इंडिजसमोर सिरीज खेळण्यासाठी उतरला. लक्ष कुणाकडे असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता मात्र बाजी उलटी झाली. वेस्टइंडिजच्या बॅट्समननी मागचा सगळा वचपा काढत हिरवानीच्या बॉलिंगचा फज्जा उडवला. त्याला यावेळी काय फॉर्म गवसला नाही.

त्याचा पहिल्या सामन्यातील फॉर्म नंतर कुठे गायब झाला हे कुणालाही समजले नाही. भारताचे भविष्य म्हटला गेलेला हा खेळाडू १९९२ वर्ल्डकपमध्ये जागाही मिळवू शकला नाही. १९९६ साली त्याने परत कमबॅक केले. न्यूझीलँडविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली. हिरवानीला आपला फॉर्म सातत्यपूर्वक टिकवता आला नाही.

हळूहळू तो संघातून बाजूला होत गेला. २००१ साली त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली, पण त्याला एकही सामना खेळता आला नाही. त्याने काळाची पाऊले ओळखत रणजीवर लक्ष केंद्रित केले. मध्यप्रदेश संघातून तो रणजीत उतरत असे. या काळात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक विकेट घेतल्या.

२००५ साली त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१४ साली तो मध्य प्रदेश रणजी संघाचा निवड समिती अध्यक्ष झाला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला धूळ चारुन तुफानी एन्ट्री करणारा खेळाडू शेवटी सामान्य क्रिकेटर म्हणून क्रिकेटच्या इतिहासात ओळखला जात आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required