computer

लोकांना म्हातारचळ लावणाऱ्या 'फेसऍप'ची भानगड काय आहे भाऊ ??

मंडळी, म्हातारपणी आपली कशी परिस्थिती असेल? आपण कसे दिसू? या गोष्टीबद्दल प्रत्येकालाच कुतूहल असतं. पण मंडळी तुम्हाला जर कुणी आज तुम्ही म्हातारपणी कसे दिसाल याचा फोटो दाखवला तर? भविष्य जाणून घेण्याची प्रत्येकाला हौस असते राव!! उगाच ज्योतिषबुवा एवढे श्रीमंत नाही होत.

सध्याच्या काळात कोणता नवा ट्रेंड येईल याचा काहीही नेम नाही. सध्या असंच एक फिल्टर वायरल झालं आहे. हे फिल्टर वापरून तुम्ही म्हातारपणी कसे दिसाल ते एका क्लिकवर समजतं. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढे? असे ढीगभर ऍप्स आहेत. पण मंडळी, कुठलंच फिल्टर ऍप एवढं वायरल झालं नसेल जेवढं हे ऍप वायरल झालं आहे. कारण या ऍपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे.

जसं जुनं गाणं तेव्हा चालत नाही, पण नंतरच्या काळात अचानक रिमिक्सच्या रुपात गाजू लागतं तसंच या ऍपचं झालं आहे राव!! हे ऍप रशियन कंपनी वायरलेस लॅबने 2017 साली बनवलं होतं, पण तेव्हा कुणाच्या लक्षात नसलेले हे ऍप आता अचानक सगळीकडे धुमाकूळ घालत आहे.

लोकांची फेसबुक, इंस्टा, ट्विटर सगळी फीड म्हाताऱ्यांनी भरून गेली आहे. जिकडे पाहावे तिकडे तरुण पोरं म्हातारपणाचे फोटो शेयर करत आहेत राव!! यावरुन काही लोकं याला उथळपणाचे नाव देत आहेत. या फिल्टरमुळे गेल्या 2 दिवसांपासून मिम्स पण बनायला सुरुवात झाली आहे. या ट्रेंडचा कहर एवढा आहे की हे फक्त भारतातच नाही,तर जगभरात प्रसिद्ध झाले आहे. एवढेच नाहीतर चक्क मोठमोठे सेलेब्रिटीसुद्धा फेसऍप वापरून आपले म्हातारपणाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.

फेसऍप आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यात बदल करते. डोळ्याखाली काळे सर्कल, कपाळावर आठ्या तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या याप्रकारे चेहऱ्यात बदल करण्यात येतात. या ऍपचे वैशिष्ट्य म्हणजे यात जराही कृत्रिमता वाटत नाही.

या ट्रेंडला सर्वात आधी जॉइन केले ते भारताचे जावई निक राव जोनास यांनी. त्यांच्या तिन्ही भावांचे फेसऍप केलेले फोटो त्यांनी ट्विटरवर अपलोड केले होते. यानंतर मग एका पाठोपाठ एक सेलेब्रिटींनी हा प्रयोग करून बघितला. पुढे काय धुमाकूळ झाला हे तुम्ही पाहतच आहात.

फेसऍप गेल्या काही दिवसांत झपाट्याने डाऊनलोड केले जात आहे. तब्बल 5 कोटी लोकांनी आतापर्यंत हे ऍप डाऊनलोड केले आहे. फोर्ब्सने याचा रेवोल्यूशनरी ऍप म्हणून गौरव केला आहे.

मंडळी, यातून अनेकांना मजा येत असली आणि मोठमोठी लोकं हिरीरीने हे फिल्टर वापरत असले तरी सोशल मिडीयावर अनेक तज्ञानी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या ऍपच्या माध्यमातून तुमचा डेटा चोरी होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

तर मंडळी, तुम्ही फेसऍप वापरलं आहे का? वापरलं असेल तर तुमचा ओल्ड लूक कमेंटबॉक्समध्ये नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required