'टिकटॉक प्रो' डाऊनलोड करताय? मग हे आधी वाचा !!
मागील काही दिवसांपासून मालवेयर मोबाईलमध्ये घुसविण्याची एक नविन पद्धत समोर आली आहे. टिकटॉक बंद झाले याचा फायदा करून घेऊया असे म्हणत काही लोकांनी टिकटॉक प्रो बाजारात आले आहे अशी अफवा इंटरनेटवर पसरवली आहे.
सरकारने टिकटॉकसकट ५९ ऍप्सवर बंदी घातल्याने टिकटॉकप्रेमी दुसरा पर्याय शोधू पाहत आहेत. त्यामुळं चिंगारीसारख्या ऍप्सना चांगला प्रतिसाद मिळायला लागला आहे. टिकटॉकच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या मोबाईलमधील माहिती चोरण्याची शक्यता आहे.
व्हाट्सऍप तसेच इतर माध्यमांवर 'टिकटॉक प्रो'ची एक लिंक फिरत आहे. त्यात टिकटॉक परत आले असे भासवले जाते. जेणेकरून लोक त्या लिंकवर क्लिक करतील. पण या लिंकद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर घुसवून मोबाईलधील डेटा चोरी करण्याचा हॅकर्सचा प्लॅन आहे.
महाराष्ट्र सायबर सेलने यापासून सावध राहण्याची सूचना केली आहे. टिक टॉक प्रो डाउनलोड केलेल्या अनेकांनी त्यांच्या फोनमधील कॅमेरा तसेच इतर ऍप्सची आपोआप परमिशन मिळवत असल्याची तक्रार ट्विटरवर नोंदवली होती. यावरून हा सायबर क्राईमचाच प्रकार असल्याचे समोर येत आहे.
हे ऍप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड होईल असे जरी भासत असले तरी थर्ड पार्टी डाउनलोड सोर्सकडून APK फाईल मोबाईलमध्ये घुसवली जाते. असे झाले तर हे ऍप भरवशा हे नाही हे इथेच स्पष्ट होते. अनेकांनी आपल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्टसना या apk फाईलची डाउनलोड लिंक आपोआप फॉरवर्ड होत असल्याचीसुद्धा तक्रार नोंदवली आहे.
महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सायबर सेल्सने या किंवा अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये म्हणून बजावले आहे. जर आपल्याच कॉन्टॅक्ट लिस्टमधून जरी कुणी पाठवली तरी ती मालवेअर असण्याची शक्यता जास्त असते. या पद्धतीने क्रेडिट कार्डची माहिती तसेच इतर अनेक महत्वाची माहिती चोरी होण्याची शक्यता असते.
याप्रकारच्या कुठल्याही लिंकवर क्लिक न करणे आणि त्या स्वतःहून फॉरवर्ड न करणे हा यावर सर्वात चांगला उपाय आहे.




