हायपरलूप चा प्रवास; आता पुण्याची बाकरवडी पंधरा मिनिटात मुंबईत !!

तंत्रज्ञानाने आयुष्य सोप्प केलं आहे. एक तंत्रज्ञान तर तुमच्या हातातच आहे ज्यावर तुम्ही आमचा हा लेख वाचत आहात. मंडळी, चाकाच्या शोधा पासून ते बैलगाडी, सायकल मग मोटार सायकल, विमान, रेल्वे, इत्यादी तंत्रज्ञांनी प्रवास सोप्पा केला आहे.

सध्या जमाना आहे बुलेट ट्रेनचा आणि आता त्याही पुढे जात नवीन तंत्रज्ञान येऊ घातलं आहे आणि हे तंत्रज्ञान बुलेट ट्रेनच्या १०० पटीने पुढे आहे. हे तंत्रज्ञान आहे ‘हायपरलूप’. बुलेट ट्रेनच्या बाबतीत चीन आणि जपानची मक्तेदारी असली तरी भविष्यात ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाने सगळ्यांची बोलती बंद होणार आहे.

हायपरलूप तंत्रज्ञान काय आहे ?


स्रोत

हायपरलूप तंत्रज्ञानाची कल्पना सर्वात आधी उद्योजक ‘इलॉन मस्क’ यांनी मांडली. आता हायपरलूप म्हणजे काय याचं उदाहरण द्यायचं झालं तर, या तंत्रज्ञानात एका ठिकाणापासून ते दुसऱ्या ठिकाणापर्यंत एका मोठ्या नलिकेतून रेल्वे पाठवली जाते. ही पोकळ नळी वायू विरहित असल्याने त्यातून होणारा प्रवास हा कित्येक पटीने जास्त असतो. काही वेळा तो ताशी १००० किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने होऊ शकतो. हायपरलूप तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे प्रयोग अमेरिकेत करण्यात आला आहे.

मुंबई पुणे मुंबई


स्रोत

मंडळी आनंदाची बातमी म्हणजे हायपरलूप तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने अमेरिकेच्या ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या कंपनीसह हातमिळवणी केली आहे. हे तंत्रज्ञान पहिल्यांदा मुंबई आणि पुणे शहराला जोडण्यासाठी करण्यात येईल. याचाच अर्थ मुंबई पुणे हा ३ तासाचा प्रवास चक्क १५ मिनिटात पूर्ण होईल. म्हणजेच चितळेंची बाकरवडी पंधरा मिनिटात मुंबईत हजर होईल ना राव.

या दोन मोठ्या शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यातून अपघात घडतात, वेळ प्रचंड जातो म्हणूनच हायपरलूप हे तंत्रज्ञान पुढच्या काळातील एक क्रांतिकारी तंत्रज्ञान असणार आहे. मुंबई पुणे बरोबरच बेंगळूरू आणि चेन्नई दरम्यानही हायपरलूप तंत्रज्ञान येण्याची बातमी येत आहे. 

आता प्रश्न पडतो जगातील सर्वात वेगवान प्रवासा यंत्रणा उभारण्याचा प्रचंड खर्च नेमका किती असणार. याबद्दल असा दावा करण्यात येत आहे की हा खर्च खूपच कमी असणार आहे. आता काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ, या यंत्रणेतून किती लोक एका वेळी प्रवास करू शकतात, या प्रवासासाठी खर्च किती येईल ? आणि हे तंत्रज्ञान सुरक्षित असेल का ?

मंडळी सध्या हायपरलूप विकासाच्या मार्गावर असल्याने या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच मिळतील असं आपण गृहीत धरू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required