मराठीतली पहिली ग्राफिक नॉव्हेल येतेय, तुम्ही तुमची प्रत बुक केली की नाही?

मंडळी, वाचनसंस्कृती संपुष्टात येतेय अशी लोकांनी कितीही ओरड केली तरी मराठीत वाचक मंडळी खूप आहेत. हे लोक पुस्तकं खरेदी करतात, लायब्रऱ्या लावतात, लोकांकडून पुस्तकं उसनी आणतात.. काहीही होवो, पण पुस्तकं वाचतातच. त्यामुळं पुस्तकलेखनात नवनवे प्रयोग करायला लेखक मंडळी मागंपुढं पाहात नाहीत.  

काय आहे हा नवा प्रयोग? 
लेखक विक्रम पटवर्धन घेऊन आले आहेत मराठीतली पहिली ग्राफिक नॉव्हेल. तिचं नांव आहे 'दर्या'. "आता ही काय आणि नवी भानगड?" म्हणून विचाराल तर,  ग्राफिक नॉव्हेलमध्ये कथेसोबत तिला पूरक अशी रेखाटनंही असतात. अहं, पण म्हणजे कॉमिक्स नाही बरं. कारण कॉमिक्समध्ये पूर्ण कथाच रेखाटनं आणि चित्राद्वारे सांगितली जाते. पण ग्राफिक नॉव्हेलमध्ये रेखाटनं कथेला पूरक म्हणून आणि जिथं हवी तिथंच  येतात. 

आजवर मराठीत ग्राफिक नॉव्हेल हे माध्यम त्याच्या पूर्ण क्षमतेइतकं वापरलं गेलं नाहीय.  आख्ख्या पुस्तकात काही चित्रं असतात, पण त्यांची संख्याही कमी असते. आता तुम्हीच आठवून पाहा, अशी चित्रं असलेली किती पुस्तकं मराठीत आहेत? लंपनच्या कथा, व्यंकटेश माडगूळकरांची काही पुस्तकं, इत्यादी इत्यादी.. नावं आठवायलाही थोडा ताण द्यायला लागतो राव.  त्यामुळं हे माध्यम वाचकांसाठी तसं नवं आहे.

दर्यामध्ये काय आहे?
ही आहे कोळ्यांवरती आधारित एक  काल्पनिक कादंबरी. मात्र ती घडतेय हजारोवर्षांपूर्वी, आजच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लागून असलेल्या एका दर्या नावाच्या बेटावर!! आणि ती सांगते हाडामांसाची माणसं आणि निसर्गाचं असलेलं अतूट नातं!! या कादंबरीचा सिनेमॅटिक टीझर पाहिलात तर याची कल्पना नक्की येईल. 

विक्रम पटवर्धनांनी ही कादंबरी लिहिलीय,  आमीरखान पठाण यांनी सारी रेखाटनं चितारली आहेत, तर निर्मितीभार उचलला आहे मराठी नाटककार आणि लेखक क्षितीज पटवर्धनांनी.  ही मंडळी गेली दोन वर्षे या प्रोजेक्टवर काम करत आहेत.  यांनी तयार केलेल्या कादंबरीच्या टीझरलाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अजून ही कादंबरी बाजारात उपलब्ध नसली तरी बुकगंगावरती आगाऊ नोंदणी चालू आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करून तुमची प्रत आजच राखून ठेवू शकता. 

पुस्तकनिर्मितीत असे चित्रे किंवा रेखाटनांचे प्रयोग होण्यात काय अडचण असते?
अशी चित्रपुस्तकं असतात, अगदीच नाही असं नाही.  पण मुदलात चित्रं, रेखाटनं, आलेख, आकृत्या या गोष्टींना पैसे अधिक लागतात. मग पुस्तकाचा दर्जा राखायचा असेल तर हा खर्च अधिकच वाढतो. त्या मानानं मराठी साहित्याचं बजेट खूपच कमी असतं.  मग अर्थातच त्या अंदाजपत्रकात चित्रं बसवणं महागाईचं आणि चैनीचं मानलं जातं. तरीही काहीजणं अगदी नेटानं असे प्रयोग आणि चैनही करतात,  पण एक डोळा खर्चावर ठेवून. मग होतं काय,  कमीत कमी किंवा अजिबात शून्य रंगात ती चित्रं रंगवली जातात, साधा कागद वापरला जातो किंवा अतिशय काटकसरीने गुळगुळीत कागदावर ती चित्रं येतात.. हे सगळं शक्य तितक्या कमी प्रमाणात आणि शक्य तितक्या स्वस्तात लेखक-प्रकाशकांना बसवावं लागतं. आता यातच इतके पैसे गेल्यावर  मग चित्रकाराला प्रतिष्ठा वा पैसे देणं हे तर लांबच राहातं. 

 अशा सगळ्या कारणांमुळं मराठी साहित्यात चित्रसंस्कृती नाही, किंवा असली तरी बरीच कमी आहे. त्यातही अभ्यास, संशोधन, कोश, लहान मुलांची पुस्तकं.. इ. ला चित्रं आवश्यक तरी मानतात. इतर साहित्यात चित्र म्हणजे चैनच.

अशा परिस्थितीत काही वर्षांपूर्वी कविता महाजनांनी मराठीत केलेली पहिलीवहिली मल्टिमिडिया कादंबरी  कुहू किंवा आताच्या दर्यासारख्या प्रयोगांना नक्कीच दाद द्यायला हवी.  वाचकांनी 'दर्या'ला भरघोस प्रतिसाद द्यावा यासाठी टीम बोभाटाच्या  'दर्या'ला भरभरून शुभेच्छा!!


 

सबस्क्राईब करा

* indicates required