फॉर्ब्स ३०: अनाथ मुलांना आधार देणाऱ्या वकील ते विघटनशील इलेक्ट्रिक बॅटरीज बनवणाऱ्या बहिणी...फोर्ब्सच्या यादीतील तीन हिरे!!
भारतातल्या तरुण पिढीविषयी अनेकदा नकारात्मक लिहिले जाते. ती कशी बेजाबदार आहे, आळशी आहे असं काहीसे चित्र बऱ्याचदा उभे केले जाते.. पण हे खरे आहे का? नक्कीच नाही! आजची तरुणाई अगदी कमी वयात नोकरीमध्ये कितीतरी वरची पदे यशस्वीपणे सांभाळात आहे. अगदी स्वतःचा व्यवसाय किंवा आपले समजाविषयीचे कर्तव्यही अगदी आत्मविश्वासाने बजावत आहे. वेगवेगळ्या आणि नवीन क्षेत्रात हे तरुण आपल्या भारताचे नाव जगभरात पोहोचवत आहेत. अशा भारतीय तरुण आणि तरुणींची दखल खुद्द फोर्ब्सने घेतली आहे.
फोर्ब्स इंडियाने ३० अंडर ३० ची यादी जाहीर केली आहे. या यादीत कर्तबगार भारतीय तरुणांचा गौरव केला आहे. गेले वर्षभर वय वर्षे ३०च्या आतील ज्या तरुणांनी स्वतःच्या कौशल्याने आपापल्या क्षेत्रात मेहनत घेऊन यश मिळवले त्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. या यादीतील काही मोजक्या तरुणांवर बोभाटा लेखमालिका घेऊन येत आहे.
आजचा हा तिसरा भाग....
'फोर्ब्स'च्या ३०अंडर३०'च्या या यादीत लखनऊची पौलोमी पावनी शुक्ला यांचे नाव शिक्षण क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. पौलोमी यांना सुप्रीम कोर्टात वकील म्हणून सगळे ओळखतात, पण त्याही पलीकडे त्या एक लेखिका आहेत. सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून त्या अनाथ मुलांसाठीही खूप काम करतात. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून त्यांचे नाव या यादीत आहे.
याची सुरुवात २००१ साली झाली. त्या आईबरोबर हरिद्वारमध्ये आल्या. त्यांची आई त्यावेळी तिथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यावर्षी भूजमध्ये भूकंप झाल्याने मोठ्या प्रमाणात मुलांना हरिद्वारच्या अनाथलयात आणण्यात आलं होतं. त्या मुलांची व्यथा ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. या मुलांसाठी काहीतरी करावं अशी इच्छा त्यांना झाली. त्या मुलांच्या कथा त्यांनी काळजीपूर्वक ऐकल्या. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आणि ११ राज्यांच्या जवळजवळ १०० अनाथालायांना त्यांनी भेटी दिल्या. तिथल्या मुलांना त्या आधार देत होत्या. त्या अनाथ मुलांच्या जीवनावर आधारित त्यांनी 'Weakest on Earth' नावाचं पुस्तक लिहिलं. २०१८ साली अनाथ मुलांचे शिक्षण आणि त्यांना समान संधी मिळावी म्हणून त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. परंतु एवढेच करून त्या थांबल्या नाहीत, तर हा लढा खूप मोठा करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. भविष्यात अनाथ मुलांच्या हक्कांसाठी त्यांना खूप काही करायचे आहे.
इतक्या लहान वयात पौलोमी शुक्ला यांनी केलेले काम खरंच कौतुकास्पद आहे.
फोर्ब्सच्या यादीतील इतर नावांमध्ये निशिता आणि निकिता बालिअरसिंग या जुळ्या बहिणींची यशोगाथादेखील समाविष्ट आहे. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात एक नवीन टेक्नॉलॉजी आणली. त्यांच वय विचाराल तर दोघी अवघ्या २३ वर्षांच्या आहेत.
त्यांचे नाव स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा या सेगमेंटमध्ये समाविष्ट झाले आहे. निकिताने मिडिया आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर अभ्यास केला आहे, तर निशिताने कॉर्पोरेट फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. २०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही भारतासाठी खूप मोठी संधी आहे. तेव्हा या सर्व वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीजची मागणी वाढलेली असेल. त्या बॅटरी पर्यावरणपूरक असाव्यात म्हणून त्यांनी नवीन स्टार्टअप सुरू केले. इलेक्ट्रिक वाहनांसाठी या बॅटरी बनवण्यासाठी २०१९ला त्यांनी भुवनेश्वरला नेक्सस पॉवर लाँच केले. तिथे त्या पिकांच्या राहिलेल्या कचऱ्यापासून विघटनशील इलेक्ट्रिक बॅटरीज बनवत आहेत.
या दोघी पीकांचा कचरा शेतकऱ्यांकडून घेतात. प्रत्येक १०० बॅटऱ्यांमागे शेतकऱ्यांना २५,०००/- रुपये अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत होते. भविष्यात या बॅटरी वापरल्यास वातावरणात सात अब्ज टन कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. नेक्सस सध्या इलेक्ट्रिक टू व थ्री-व्हीलरसाठी बॅटरी बनवत आहेत.
तर, आज आपण बघितलेली तीन नावे ही त्यांच्या क्षेत्रात काहीतरी मोलाचं काम करू पाहत आहेत. त्यांचं नाव फोर्ब्सच्या यादीत आल्याने त्यांच्या कामाचा तसेच भारताचाही गौरव झाला आहे. तुम्हाला काय वाटतं?
लेखिका: शीतल दरंदळे
आणखी वाचा:
फॉर्ब्स ३०: भारतातल्या कर्तबगार व्यक्तींची यादी...भेटा यादीतील दोन महत्त्वाच्या चेहऱ्यांना!!
फॉर्ब्स ३०: भारतीय आर्थिक क्षेत्रात मोलाची भर घालणारे फोर्ब्सच्या यादीतील दोन तरुण चेहरे !!




