computer

अवघड वाटा दुर्गाच्या -चला,आज सफर करू या सुवर्णदुर्गाची !

मित्रांनो, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत.२ वर्षानंतर आपल्याला या वर्षी उन्हाळयाच्या सुट्ट्या एन्जॉय करता येणार आहेत. त्यामुळे तुमचे सुद्धा फिरायचे प्लॅन्स बनलेच असतील. आता फिरायचा म्हटलं कि निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणाला पर्याय नाही. कमी वेळात व खिशाला परवडेल अशा खर्चात आपल्याला कोकणात फिरता येते. आता कोकणात फिरत असताना आपल्याला मुख्य आकर्षण असतं ते समुद्रकिनाऱ्यांचं आणि समुद्रात असणाऱ्या दुर्गांचं.कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात, दापोली तालुक्यात असाच एक सुंदर सागरी दुर्ग आहे. तो आपल्यासारख्या भटक्यांची वाट बघत उभा आहे. तो दुर्ग म्हणजेच सुवर्णदुर्ग होय. तर आज आपण सफर करूया या सुवर्णदुर्गाची. हा दुर्ग अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.

प्राचीनकाळी 'हर्णे' हे एक प्रसिद्ध बंदर होते. हा प्राचीन बंदराचे महत्त्व लक्षात घेऊन त्याजवळील बेटावर एक दुर्गरत्न बांधण्यात आले. हे दुर्गरत्न म्हणजेच 'सुवर्णदुर्ग' होय. तसे पाहायला गेले तर या दुर्गाचा पाया तळकोकणातील शिलाहारांनी घातला.परंतु त्यानंतरही या दुर्गावर अनेक राजसत्ता नांदल्या; त्या राजसत्तांनी त्यांच्या गरजेनुसार या दुर्गाच्या रचनेत अनेक बदल केले. या सर्व बदलांना स्विकारत व निसर्गाचे अनेक तडाखे झेलीत हा सुवर्णदुर्ग समुद्रातील फेसाळणाऱ्या लाटांना अंगावर घेत आजदेखील त्याच दिमाखाने उभा आहे. हर्णे परिसरातील सुवर्णदुर्ग हा मुख्य दुर्ग होता व याच्या संरक्षणासाठी कनकदुर्ग, गोवा किल्ला व फत्तेगड हे तीन उपदुर्ग बांधण्यात आले.

सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी विजापूरकरांनी १६ व्या शतकात केली. या पुनर्बांधणीवेळी याच्या तटबंदीचे काम 'सेखोजी आंग्रे' यांनी केले. हे सेखोजी आंग्रे म्हणजे मराठा आरमारात 'समुद्रावरील शिवाजी' म्हणून नावारूपास आलेल्या 'सरखेल कान्होजी आंग्रे' यांचे आजोबा होत.
इ .स.१६६० साली आलिशाहाकडून शिवछत्रपतींनी सुवर्णदुर्ग जिंकून घेतला. शिवछत्रपतींनी कल्याण येथे मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठा आरमाराचे विजयदुर्ग, कल्याण (दुर्गाडी), याप्रमाणे सुवर्णदुर्ग हेसुद्धा महत्त्वाचे ठाणे होते. इ.स.१६६९ मध्ये गोकूळाष्टमीच्या आदल्या दिवशी सुवर्णदुर्गावर 'कान्होजी आंग्रे' यांचा जन्म झाला.

श्रीशिवछत्रपतींनी राज्याभिषेकापूर्वी म्हणजे इ.स.१६७१-७२ च्या सुमारास स्वराज्यातील अनेक दुर्गांच्या डागडुजीसाठी निधीची तरतूद केली होती. या राखीव निधीची तरतूद केलेले अस्सल पत्र आज उपलब्ध आहे. या पत्रानुसार एकूण १,७५,००० (एक लाख पंच्यात्तर हजार) होन एवढा निधी शिवछत्रपतींनी स्वराज्यातील गडकोटांच्या डागडुर्जीसाठी मंजूर केला होता. यातील १०,००० (दहा हजार) होन एवढी तरतूद सुवर्णदुर्गाच्या डागडुजीसाठी करण्यात आली होती.

इ.स.१६८५ साली कान्होजी आंग्रे शंभूछत्रपतींच्या आरमारात दाखल झाले. अशाप्रकारे कान्होजींच्या आरमाराची सुरुवात या सुवर्णदुर्गावरून झाली. पुढे काही काळ लोटल्यानंतर छत्रपती राजारामांच्या काळात सुवर्णदुर्गाचा सुभेदार अचलोजी मोहिते हा हबश्यांना (जंजिरेकर सिद्दीला) फितूर झाला व जनतेची लुबाडणूक करू लागला. अवघ्या २० वर्षांच्या कान्होजीस हा प्रकार सहन झाला नाही, त्यामुळे त्यांनी सुभेदार व त्यांच्या साथीदारांची फितुरी मोडून काढली व त्यांचा शिरच्छेद केला. झाला प्रकार छत्रपतींच्या कानावर गेल्यावर त्यांनी याची शहानिशा केली व खुश होऊन कान्होजी आंग्रे यांना सुवर्णदुर्गाची मुखत्यारी दिली.

नानासाहेब पेशव्यांच्या काळात पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आले. त्यामुळे तुळाजींचा बिमोड करण्यासाठी पेशवे व ब्रिटिशांच्या संयुक्त फौजांनी इ.स.१७५५ साली सुवर्णदुर्गावर हल्ला केला व किल्ला जिंकून घेतला. इ.स.१८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने सैरावैरा पळणारा दुसरा बाजीराव काही काळ सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला राहिला. नोव्हेंबर १८१८ कर्नल केनेडी, कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डोमिनिसेट यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या ५० शिपाई व ३० खलाश्यांच्या साहाय्याने हॉल करून ब्रिटिशांनी हा दुर्गा जिंकून घेतला.
ता मित्रानो असा सुवर्णदुर्गाचा रंजक इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही या दुर्गाला आवर्जून भेट द्यायलाच हवी. या दुर्गाला तुम्ही दुर्गवाटा मार्फत घरबसल्या सुद्धा भेट देऊ शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुवर्णदुर्गाचा विडिओ नक्की बघा.लाइक करा. शेअर करा.

लेखक :अथर्व बेडेकर- पुरातत्व अभ्यासक

सबस्क्राईब करा

* indicates required