computer

पवित्रपती मास्क: कोल्हापूरच्या पठ्ठ्याने केमिकल टेक्नोलॉजीचं ज्ञान वापरून अस्सल आयुर्वेदिक मास्क तयार केलाय !!

भारतात जेव्हा काही विशिष्ट परिस्थितीतून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशवासीयांसाठी काही उपाय शोधण्याची आवश्यकता निर्माण होते, तेव्हा या मातीतले बुद्धिमान लोक त्या विशिष्ट परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या साधनांचा शोध लावतात. आजची गोष्ट ही अशीच आहे- पवित्रपती मास्कची!! 

जानेवारी २०२० मध्ये भारतात पहिला कोविड-१९ चा रुग्ण सापडला. तोवर जगभरातून त्याच्या महामारीची चर्चा सुरू झाली. महिन्याभरात भारतातल्या रुग्णांची वाढती संख्या बघता सरकारने आवश्यक त्या उपाययोजना करायला सुरूवात केली. याचाच एक भाग म्हणून केन्द्र सरकारने 'कोविड कवच' प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत कोविड-१९ विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्याबाबत भारतभरातून सूचना मागवण्यात आल्या. या विषयीची बातमी कोल्हापुरातल्या शिवानंद पाटीलने ऐकली तेव्हा त्याने आपल्या अभ्यासाच्या आधारे केन्द्र सरकारकडे काही सूचना पाठवण्याचं ठरवलं.

शिवानंदने मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी म्हणजे पूर्वीच्या युडीसिटीमधून M.Sc Tech केलं आहे. तोपर्यंत त्याच्या वडिलांनी सुरू केलेला कापडांसाठीचे रंग बनवण्याचा व्यवसाय तो सांभाळत होता. त्याचा धाकटा भाऊ विवेकानंद पाटील टेक्स्टाईल टेक्नोलॉजीस्ट आहे. गेली वीस वर्षे कापडांसंबंधी व्यवसाय फार जवळून पाहिला असल्याने शिवानंद आणि विवेकानंद दोघांनाही याबद्दलच्या तंत्रज्ञानाची माहिती होती. कापडावरील रंगांच्या व्यवसायामुळे त्यांना जगभरातील नैसर्गिक आणि कृत्रिम कापड निर्मिती आणि त्यांच्या वापराबद्दलचं ज्ञान होतं. शिवानंदनं त्याचं स्वतःचं केमिकल टेक्नोलॉजीचं ज्ञान आणि विवेकानंदच्या टेक्स्टाईल टेक्नोलॉजीचं ज्ञान यांची सांगड घालून भारतीय केन्द्र सरकारला कोविड कवचद्वारे नैसर्गिक कापडापासून बनू शकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यासाठी उपयुक्त संरक्षक पेहरावाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवला. 

सरकारी कामाचा अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे प्रस्ताव पाठवल्यावर शिवानंद काहीसा निवांतच होता. मात्र यावेळेस तिसऱ्याच दिवशी त्याला दिल्लीहून प्रस्ताव मिळाल्याची इमेल आणि दिल्लीच्या कोविड कवचच्या कार्यालयातून फोन आला. फोनवरुन् कोविड कवच प्रकल्प समितीच्या सभासदांनी शिवानंदचा प्रस्ताव पुन्हा एकदा त्याच्याकडून समजावून घेतला. सोबतच त्याच्या प्रास्तावित प्रकल्पासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची उपस्थिती, तसेच शिवानंद प्राप्त परिस्थितीमध्ये हा प्रकल्प किती दिवसांमध्ये कार्यान्वित करू शकतो, याचीही माहिती घेतली.

याचीच पुढची पायरी म्हणून त्याची पुण्याच्या डिफ़ेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायजेशन म्हणजेच साध्या भाषेत डीआरडीओच्या ऑफिसमध्ये डिफेन्स इन्स्टीट्यूट ऑफ ॲडव्हान्स रिसर्च, पुणे (डीआयएटी) या संरक्षण मंत्रालयाशी संबंधीत डीम्ड युनिव्हर्सिटीमधल्या संशोधकांबरोबर बैठक झाली. त्या संशोधकांनी शिवानंदला युरोपातल्या नव्या तंत्रज्ञानाचा भारतीय पारंपरिक ज्ञानाशी सांगड घालून विकसित केलेल्या एका नव्या उत्पादनाबद्दल सांगितलं. शिवानंदची या उत्पादनाच्या निर्मितीमध्ये उतरण्याची तयारी असल्यास त्यांनी ते तंत्रज्ञान पुरवण्यालाही होकार दिला. शिवानंदने पाठवलेल्या प्रस्तावासारखंच हे उत्पादन होतं, पण हे काम अधिक खर्चिक होतं. त्याबरोबरच डीआयएटीच्या संशोधकांना हे उत्पादन भारतीयांसाठी लवकरात लवकर बनवून हवं होतं. तरी शिवानंदने याचं शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आणि त्याच बैठकीमध्ये या कामासाठी होकार दिला. त्याच वेळी त्याने लगेच डीआरडीओ व डीआयएटी यांच्याबरोबर तंत्रज्ञान पुरवठा होण्याचा आणि तंत्रज्ञानाच्या गुप्ततेचा करार केला.

कोल्हापुरात परतल्यावर शिवानंदने त्याचे मित्र आणि पार्टनर्स अमोल सिद्धनेरीकर आणि अभय कोरे या मित्रांना या प्रकल्पाची कल्पना दिली. सगळ्यांना एवढ्या कमी काळामध्ये हे कसं साध्य व्हावं याबद्दल शंका होती. सुदैवाने शिवानंदने त्याच्या आधीच्या प्रकल्पासाठी काही यंत्रांचा विचार करुन त्याची मागणी नोंदवली होती. सध्या त्याच मशीनवर ही प्रक्रिया होऊ शकेल असा निर्वाळा पुण्याच्या संशोधकांनी दिलेला असल्यामुळे मोठा अडसर दूर झाला होता, पण त्याच दरम्यान देशभरात लॉकडाऊन जाहिर झाला आणि यंत्रं कोल्हापुरात येणं मुश्कील झालं. शिवानंदने ही अडचण डीआयएटीच्या संशोधकांना कळवताच त्यांचा मदतीचा हात आला आणि अक्षरशः महिन्याभरात यंत्रं त्याच्या कारखान्यात येऊन जोडली गेली.

आता शिवानंद आणि त्याचे कामगार जोमाने कामाला लागले. डीआयएटीच्या तंत्रज्ञांनी येऊन सर्व व्यवस्था तपासली आणि सुरूवातीच्या कापडाची ट्रायल बॅच काढण्यात आली. कापड डीआयएटीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलं. तिथल्या सर्व चाचण्यांमध्ये कापड उत्तीर्ण झालं आणि शिवानंदने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. याच दरम्यान डीआयएटीने केन्द्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या औषधी योगाची योजना या प्रक्रियेमध्ये करण्याचे ठरवले. पुन्हा एकदा सर्व सज्जता करून ट्रायल घेतली गेली आणि औषधी योगाने सिद्ध असं कापड बनवण्यात आलं. पुन्हा त्या कापडावर डीआयएटीच्या प्रयोगशाळेत चाचण्या झाल्या आणि सरतेशेवटी डीआयएटीने शिवानंदला मास्क बनवण्याची सूचना केली.

कापड तयार होतं, पण शिवानंदकडे मास्क बनवण्याची कोणतीच यंत्रणा नव्हती. तरी त्याने आपले प्रयत्न सुरू ठेवले. त्याने या कामासाठी जवळच्या इचलकरंजी गावातील बचत गटाची मदत घेतली. तिथल्या बचत गटातील महिलांना त्याने मास्क्स बनवण्यासाठी राजी केलं. कापड आणि उत्तम दर्जाचं इलास्टीक देऊन बचत गटाच्या महिलांकडून त्याने त्या कापडाचे मास्क बनवून घेतले. पहिले शंभर मास्क शिवानंदने डीआयएटीच्या संशोधकांना वापरायला दिले. डीआयएटी आणि डीआरडीओच्या संशोधकांनी त्यांच्या प्रयोगशाळेत परीक्षा केलेल्या या कापडापासून बनवलेले मास्क पुढला आठवडाभर वापरले. त्यांना या मास्कचा खूप उपयोग झाला. त्यांनी ‘पवित्रपती’ असं नाव रजिस्टर करून शिवानंदला हे उत्पादन बाजारात आणण्याची सूचना केली आणि स्वतः हजार मास्कची पहिली ऑर्डर शिवानंदला दिली.

अशाप्रकारे सूचना आल्यावर शिवानंदने ‘पवित्रपती’ मास्क्सचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला सुरूवात केली. या मास्कचं शिवानंदने सांगितलेलं वैशिष्ट्य असं की त्यामध्ये एकूण तीन स्तर म्हणजेच 'थ्री प्लाय' असतात. हे तीनही स्तर विशिष्ट प्रक्रिया केलेल्या सुती कापडापासून बनलेले आहेत. बाहेरील कापड हे विशिष्ट प्रक्रिया करून त्यात पाणी जिरणार नाही असं बनवण्यात आलं आहे. यामुळे बाहेरून कोविड-१९ सारख्या व्याधीच्या संसर्गासाठी कारणीभूत मानलेले असे कोणतेही शरीर द्रव (बॉडी फ्लुईड ड्रॉपलेट्स) मास्कमधून आपल्या श्वसनमार्गामध्ये येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा संसर्ग टाळता येतो. मधल्या स्तरावर काही विशिष्ट रसायनांद्वारे अत्यंत सूक्ष्म छेदयुक्त गाळणी (फिल्टर) बनवली आहे आणि त्यानंतर त्यावर आयुर्वेदिक औषधांचा लेप लावला आहे. या स्तराच्या संपर्कात कोविड-१९ चा विषाणू येतो तेव्हा या आयुर्वेदिक औषधी योगामुळे तो विषाणू नष्ट होतो असं प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे असं शिवानंद म्हणतो. यातला तिसरा आणि वापरणाऱ्याच्या तोंडाजवळ असणारा स्तर हा विशिष्ट प्रक्रियेने आर्द्रता शोषून कापडात रोखून धरणारा बनवलेला आहे. हा स्तर वापरणाऱ्याच्या नाकाजवळ असल्यामुळे श्वसनप्रक्रियेदरम्यान तिथे आर्द्रता राखली जाते. मोठ्या प्रमाणावर संसर्गाचा धोका असलेल्या परिस्थितीतही पवित्रपती मास्क्सचा वापर उपयुक्त ठरत असल्याचं संशोधकांचं मत आहे आणि ते प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. 

पवित्रपती मास्क पुढील कारणांसाठी वापरावा -  

१. पवित्रपती मास्क विषाणूयुक्त शरीर द्रवाचा आणि विषाणूयुक्त वायूचा वापरणाऱ्याशी संपर्क रोखतो. 

२. पवित्रपती मास्कमधील आयुर्वेदिक औषधद्रव्य विषाणू नष्ट करते.

३. पवित्रपती मास्कमधील वैशिष्ट्यपूर्ण गाळणी (फिल्टर) श्वसनाला साहाय्यक आणि विषाणूसंसर्गरोधक आहे.

४. पवित्रपती मास्क पर्यावरणासाठीही कुठल्याही प्रकारे हानीकारक नाही. या मास्कचे सर्व स्तर कॉटन कापडाचे असल्यामुळे त्यांचे पर्यावरणात नैसर्गिक पद्धतीने विघटन होते. 

५. या मास्कमुळे कोणत्याही प्राणीमात्रांना त्रास होत नाही.

६. पवित्रपती मास्क त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती प्रक्रियेमुळे श्वसनामध्ये कोणताही अडथळा आणत नाहीत. 

७. या मास्कमधून व्यवस्थित वायुविजन होत असल्यामुळे त्याचा त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

८. या मास्कमुळे श्वसनप्रक्रिया कोरडेपणाच्या त्रासाखेरिज सुरू राहते

९. पवित्रपती मास्क योग्य पद्धतीने पाच ते दहा वेळा धुवून पुन्हा वापरता येतो. त्यानंतर त्यातील आयुर्वेदिक औषधांचा परिणाम कमी होतो पण त्यातील गाळणी (फिल्टर) काम करतेच.

शिवानंदने पवित्रपतीचे उत्पादन सुरू करून आता सुमारे आठ महिन्यांचा काळ झाला आहे. या काळात त्याच्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. बचत गटातील महिलांनाही काम मिळून लॉकडाऊनमध्ये घरखर्चाची सोय झाली आहे. आत्तापर्यंत लाख-दीड लाखांवर पवित्रपती मास्क्स विकले गेलेत. अनेक वैद्यकीय व्यावसायिकांनीही पवित्रपती मास्क्स स्वतःसाठी वापरलेत आणि स्वतःच्या नातेवाईक तसेच रुग्णांसाठीही मोठ्याप्रमाणावर त्यांची शिफारस केली आहे.

हे पवित्रपती मास्क ॲमेझॉनवर (https://amzn.to/3pPVTIB) विक्रिसाठी उपलब्ध आहेत आणि घाऊक खरेदीसाठी 7700033905 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. 

स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये सरकारच्या आवाहनावर प्रचंड मेहनत घेऊन टेक्स्टाईल टेक्नोलॉजीमधला महत्त्वाचा पवित्रपती मास्क्स प्रकल्प हाती घेऊन अनेकांच्या रोजंदारीचा प्रश्न सोडवणाऱ्या आणि त्याचवेळी भारतीयांना कोविड-१९ विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठीचं साधन उपलब्ध करून देणाऱ्या मराठमोळया कोल्हापूरकर शिवानंद पाटीलला बोभाटाचा सलाम!

सबस्क्राईब करा

* indicates required