हरनाम कौर : दाढी आणि मिशा असणाऱ्या तरुणीची संघर्षमय कहाणी...

दाढी आणि मिशा म्हणजे पुरुषत्वाचं प्रमुख लक्षण. चेहर्‍यावरचे हे केस साक्षात मर्दानगीची ओळख करून देत असतात. पण इथे थोडं विचित्र घडलंय. फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती ही कोणी सरदारजी नाहीये. ही आहे दाढी मिशा असणारी महिला !! नाव आहे - हरनाम कौर. 

स्त्रोत

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या भारतीय वंशाच्या शिख तरूणीला पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम नावाचा आजार आहे. ज्यामुळे पुरूषांप्रमाणे तिच्या चेहरा आणि शरिरावर अतिरिक्त केसांची वाढ होते. याची सुरुवात ती ११ वर्षांची असतानाच झाली होती. भरपूर प्रयत्न करूनही या विचित्र आजारावर ती मात करू शकली नाही. स्वतःच्या रूपाची हरनामला किळस यायची. स्वतःला ती कोंडून घ्यायची. लोकांनीही काही कमी त्रास दिला नाही. एकदा तर या आजाराला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला. 

स्त्रोत

शेवटी वयाच्या १६व्या वर्षी तिने शिख धर्मानुसार या दाढी मिशा अशाच ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि आता ती बनलीय पूर्ण दाढीची वाढ झालेली जगातील सर्वात तरूण स्त्री. हरनामचं नाव आता गिनीज बुक अॉफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालंय.

स्त्रोत

साहजिकच हरनामला शालेय वयापासून लोकांच्या भयंकर कुचेष्टेला सामोरं जावं लागलं. शी-मेल, शी-मॅन, अशी घाणेरडी संबोधनं वापरून तीची खिल्ली उडवली गेली. पण हरनामने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं शिक्षण पुर्ण केलं. ती या केसांना आता दैवी देणगी मानते, आज ती २५ वर्षांची आहे आणि १६व्या वर्षापासून तीने कधीही ही दाढी काढलेली नाही. याच रूपात ती स्वतःकडे आता प्रेमाने बघते. तिचं स्वतःबद्दलचं सकारात्मक मतही आपल्याला तिचा आदर करायला लावतं. ती सांगते, 

दाढीसोबत शाळेत जाणं हा खुपच वाईट अनुभव होता. पण मला माहिती होतं की जीवनात काहीतरी करून सुखी व्हायचं असल्यास मजबुत असणं महत्वाचं असतं. अवघड असलं तरी आपल्या वाटेवर चालत राहावं लागतं.

मी माझ्या दाढीवर खुप प्रेम  करते. मी या दाढीला एक वेगळी ओळख दिलीय. कारण ती पुरूषाची नव्हे तर एका स्त्रीची दाढी आहे.

हरनाम आता लोकांना बॉडी पॉझिटिव्हीटीचा संदेश देते. इतकंच नव्हे तर ती एक मॉडेल म्हणूनही काम करते. आणि स्वतःचे फोटोही अभिमानाने शेअर करते. 

स्त्रोत

मंडळी, या निष्ठूर जगात हरनामच्या हा लढा आपल्याला काहीतरी किंवा खुपकाही शिकवतो. तेव्हा तिच्यासाठी एक सलाम तर बनतोच...!!

सबस्क्राईब करा

* indicates required