computer

कम्प्युटरवर काम करताय? मग हे उपाय करुन तुम्ही आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायलाच हवी.

लॉकडाऊनमुळं तुमच्यापैकी अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करत असतील. पण घराच्या तुलनेत ऑफिसमध्ये काम करण्यासाठी‌ फर्निचर आणि प्रकाश व्यवस्था अधिक चांगली असते. त्यामुळे घरी बसून कंप्युटरवर काम केल्यामुळं तुमच्या डोळ्यांवर अधिकचा ताण पडू शकतो. चला तर मग पाहूया काम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी...

बसण्याची योग्य पध्दत ठेवा

सर्वात आधी काम करताना तुमची बसण्याची पद्धत योग्य आहे का हे तपासा. कारण तुमची बसण्याची चुकीची पध्दत तुमच्या डोळ्यांवर‌‌ ताण आणू शकते. कंप्युटरची स्क्रिन ही नेहमी तुमच्या डोळ्यांच्य सरळ रेषेत असावी. जर तुम्ही मान‌‌ खाली करून, किंवा वर करून कंप्युटरकडे पाहात असाल‌ तर ते तुमच्या डोळ्यांना नुकसानदायक ठरतं. स्क्रिनची उंची कमी असेल‌ तर‌ लॅपटॉप स्टॅन्ड वापरून किंवा खाली जाड पुस्तकं ठेवून स्क्रिनची उंची वाढवून घ्या. जर स्क्रिनची उंची जास्त असेल तर आपल्या खुर्चीची उंची वाढवा.

२०-२०-२० चा नियम वापरा.

डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी २०-२०-२० चा नियम परिणामकारक ठरतो. २०-२०-२० म्हणजे काम करताना प्रत्येक २० मिनिटांनी २० फूट अंतरावर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे २० सेकंद बघा.

पण कामात असताना प्रत्येकवेळी हा वेळेचा हिशेब ठेवणं कठीण जाऊ शकतं. यासाठी तुम्ही Protect Your Vision हे वेबॲप वापरू शकता. यावरती २०-२०-२० पध्दतीने‌ किंवा तुम्हाला हव्या त्या अंतराने ब्रेक शेड्यूल करता येईल. हे वेबॲप तुम्हाला‌ सेट केलेल्या वेळेत ब्रेकची नोटिफिकेशन देणारा टायमर तुमच्या स्क्रिनवरती दाखवेल. Start Break वर क्लिक केल्यानंतर तुमची स्क्रिन ब्रेकचा वेळ संपेपर्यंत डार्क होईल, यावेळेत तुम्ही २० फूट अंतरावरील वस्तूकडे पाहू शकता. या ॲपमधला Start Eyes Gymnastics हा पर्याय तुम्हांला काही डोळ्यांचे व्यायामही दाखवतो. हे व्यायाम तुमच्या डोळ्यांना आराम देतील.

जर तुम्हाला‌‌ क्लिक न करता ब्रेकवेळी आपोआप स्क्रिन बंद होण्याचा‌ पर्याय हवा असेल तर तुम्ही FadeTop आणि TimeOut सारखी वेब ॲप्स वापरू शकता.

डोळ्यांना हानिकारक निळा प्रकाश रोखा.

तज्ज्ञांच्या मते कंप्युटर आणि स्मार्टफोनच्या स्क्रिनमधून बाहेर पडणारा ‌निळा प्रकाश हा डोळ्यांसाठी हानिकारक असतो. जर तुमच्या काम करण्याच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात नैसर्गिक प्रकाश उपलब्ध नसेल, तर तुमच्या‌ डोळ्यांना या निळ्या प्रकाशामुळे त्रास होऊ शकतो. यासाठी सर्वात आधी डिस्प्ले सेटिंगमध्ये जाऊन स्क्रिनचा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट लेव्हल योग्य प्रमाणात सेट करा.

आता पाहूया स्क्रिनमधून‌ येणारा निळा प्रकाश कसा रोखता येईल.

Windows 10 मध्ये -

Start Menu उघडा
डावीकडे असणाऱ्या Gear आयकॉनवरती क्लिक करा
System वर‌ क्लिक करून Display वरती क्लिक करा.
आता Night Light हा पर्याय सुरू करा.
तुमच्या Windows व्हर्जनमध्ये Night Light ची सुविधा नसेल तर तुम्ही Flux हे ॲप डाऊनलोड करू शकता.

MacOS वरती -

स्क्रिनवरती वरती डाव्या बाजूला असणाऱ्या Apple लोगोवरती क्लिक करा.
Display वरती क्लिक करा.
Night Shift टॅब वरती क्लिक करून वेळ निवडा.

ॲपलच्या आयफोनमध्येही Display & Brightness वर क्लिक करून Night Shift हा पर्याय चालू करा.

Android स्मार्टफोन मध्ये -

Setting मध्ये जा
Display सेटिंग्ज उघडा
Night Light पर्याय सुरू करा.

वेगवेगळ्या ॲन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये हा पर्याय Night Mode, Reading Mode, Night Shield, Eye Care अशा वेगवेगळ्या नावांनी दिलेला आहे. Display सेटिंग्जमध्ये जाऊन तो सुरू करा

वरील उपाय हे तुमच्या डोळ्यांना तणावापासून आराम देतील. यासोबतच तुम्ही चकाकणा-या स्क्रिनसाठी ॲन्टी ग्लेअर स्क्रिन कोटिंग वापरू शकता. ही कोटिंग १००० ते २००० रूपयांत मिळेल. त्याचप्रमाणे डोळ्यांसाठी ॲन्टी ग्लेअर चष्मे, आणि निळा प्रकाश रोखणारे ब्ल्यू लाईट फिल्टर चष्मेही उपलब्ध आहेत. ते वापरून तुम्ही तुमच्या डोळ्यांची अधिक काळजी घेऊ शकता.

वाचकहो, डोळे हे अमूल्य आहेत, त्यांची काळजी आपण घ्यायलाच हवी. नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required