आता आली आहे हेलिकॉप्टर वडाप सेवा...३५ मिनिटात मुंबई-पुणे प्रवास करा !!

मेट्रोपेक्षा जास्त गतीने धावणारी मुंबई-पुणे हायपर-लूप सेवा यायला अजून फार दिवस आहेत, पण तत्पूर्वीच हेलिकॉप्टर सेवा आलेली आहे. आता तुम्ही अवघ्या ३५ मिनिटात मुंबई-पुणे असा हेलिकॉप्टरचा प्रवास करू शकता. हेलिकॉप्टर टॅक्सी म्हणून ओळखली जाणारी BLADE कंपनी आता भारतात आली आहे. पहिलीच सेवा मुंबई पुणे आणि मुंबई शिर्डी अशी असेल.
तर, BLADE कंपनी अमेरिकन कंपनी आहे. मुंबईत हेली-टॅक्सी सर्व्हिसच्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या आहेत. ऑक्टोबरच्या मध्यापासून या सर्व्हिसला सुरुवात होईल. आठवड्यातून ६ वेळा म्हणजे सोमवार ते शनिवार तुम्ही प्रवास करू शकता.
ही हेलिकॉप्टर सेवा by-the-seat प्रकारातील असेल, म्हणजे तुम्हाला तुमच्यापुरतेच पैसे द्यावे लागणार आहेत. संपूर्ण हेलिकॉप्टर बुक करायचं नाही. आपल्याकडची वडाप सेवा असते तशी काहीशी ही सेवा आहे, पण हेलिकॉप्टर भरेपर्यंत वाट पहावी लागणार नाही. कारण उड्डाणाची वेळ ही नियोजित असणार आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर भरलेलं नसलं तरी तुमचा प्रवास वेळेत सुरु होईल.
कंपनी ३ हेलिकॉप्टर्स वापरणार आहे. प्रत्येकात ५ लोक बसतील एवढी जागा असेल. मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथून तर पुण्यात मुंढवा येथून आणि शिर्डीत चैतन्यपूर, कोपरगाव येथून हेलिकॉप्टर उड्डाण घेतील.
भाडं किती असेल हे मात्र अजून कंपनीने उघड केलेलं नाही, पण इतर खाजगी ‘चार्टर्ड जेट’ आणि हेलिकॉप्टर पेक्षा कमी भाडं असेल हे नक्की. अतिश्रीमंतांना परवडणारा हेलिकॉप्टरचा प्रवास आता तेवढा महागडा उरणार नाही.
पुढच्या काळात BLADE कंपनी शहरातल्या शहरात सुद्धा हेली-टॅक्सी सेवा पुरवणार आहे. म्हणजे मुंबई तुंबली तरी तुम्ही हवेतून प्रवास करू शकाल.
तर मंडळी, हेली-टॅक्सीने तुम्ही प्रवास करणार का ? काय वाटतं ही सेवा सर्वसामान्यांना परवडेल का ?