एकाच घरातल्या ११ जणांनी २३ वेळा घटस्फोट घेत एकमेकांशी लग्नं का केली ?

मंडळी, कायद्यातली पळवाट शोधून आपला फायदा करून घेण्याचं काम अनेक बहाद्दर करत असतात, पण त्याला सुद्धा मर्यादा असायलाच हवी. काही लोक लालसेपोटी सगळ्या मर्यादा ओलांडतात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकतात. चीनच्या एका कुटुंबाच्या बाबतीत हेच घडलं.
या कुटुंबातील ११ जणांनी तब्बल २३ वेळा लग्न केलं आहे. हे काय प्रकरण आहे ते आता समजून घेऊया.
त्याचं झालं असं, की या शहर नूतनीकरणात या कुटुंबाचं घर पाडण्यात आलं. त्यांच्यासोबत त्या भागातील इतरांची घरे देखील पाडण्यात आली. यानंतर चीनच्या कायद्याप्रमाणे लग्न झालेल्या आणि त्या भागातील नागरिक म्हणून नोंदणी झालेल्या प्रत्येकाला ४० स्वेअर मीटर जागा देण्यात येणार असल्याचं जाहीर झालं.
चीनमध्ये हुकु नावाची कुटुंब नोंदणी पद्धत आहे. ज्या लोकांना घर पाडल्यानंतर तिथून दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागलं त्यांचं नाव १० एप्रिल पर्यंत हुकु यादीत असणं गरजेचं होतं. या प्रक्रियेचा फायदा उचलून या कुटुंबातील ११ जणांनी आपापसात जास्तीत जास्त वेळा लग्न केली.
पॅन नावाच्या कुटुंब प्रमुखाने ही आयडिया शोधून काढली होती. सुरुवात त्याच्यापासूनच झाली. त्याने आपल्या घटस्फोटीत पत्नीशी पुन्हा लग्न केलं. यामुळे तिला वेगळी नुकसानभरपाई मिळण्याची सोय झाली. २ आठवड्यातच दोघात पुन्हा घटस्फोट झाला आणि पॅनने आपल्या मेव्हणीशी लग्न केलं. तिची नोंदणी झाल्यावर तिलाही पॅनने घटस्फोट दिला. तिसऱ्यांदा तर त्याने आपल्या सासूशी पण लग्न उरकलं.
पॅनच्या पावलांवर पाऊल ठेवून कुटुंबातील इतरांनी पण अशी आयडिया केली. पॅनच्या बायकोने दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न केलं. अशाप्रकारे एकूण २३ लग्न आणि घटस्फोट घडली. हा फुगा कधी ना कधी तरी फुटणारच होता. पॅनची आयडिया स्थानिक विवाह अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. १९ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं.
चौकशीत पॅनने सगळे आरोप फेटाळून लावले. उलट तो म्हणाला की ‘आम्ही जे केलं ते कायदेशीर होतं. आम्ही केवळ जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो.’
तसं पाहायला गेलं तर चीनचा कायदा किती लग्नं करावीत याचा ठराविक आकडा सांगत नाही. जास्तीत जास्त लग्नं करू नयेत असंही कायदा म्हणत नाही. ही देखील एक पळवाट म्हणावी लागेल. यावर उत्तर देताना चीनी अधिकारी म्हणाले की या पळवाटेचा उपयोग पॅनने सरकारला फसवण्यासाठी केला म्हणून तो दोषी आहे.
मंडळी, चीनी लोकांचा कल हा जास्तीतजास्त मालमत्ता घेण्याच्या दिशेने आहे, पण ही मालमत्ता घेत असताना अनेक अडचणीतून जावं लागतं. त्यामुळे तिथे २ वर्षात घरांचे भाव ३१ टक्क्यांनी वाढले आहे. हे बघितल्यावर पॅन आणि त्याच्या कुटुंबाने अशी शक्कल का लढवली असेल याचं उत्तर समजतं.