डेंजर-खतरा-धोका...वाचा या चिन्हा मागील इतिहास !!

X आकारातील दोन लांब हाडं आणि त्यावर एक कवटी. हे चिन्ह बघितल्यावर मनात धडकीच भरते. या चिन्हाचा अर्थ म्हणजे तिथे काही तरी धोका आहे. डेंजर-सावधान-खतरा असे लिहिलेल्या अनेक ठिकाणी हे चिन्ह दिसून येतं. पण जीवाला धोका असणाऱ्या ठिकाणीच हे चिन्ह का लावतात भाऊ? पण मुळात हे चिन्ह आलं तरी कुठून ?

चला तर आज या चिन्हाच्या इतिहासाचा मागोवा घेऊ !!


स्रोत

मध्युगीन कालखंडात हे चिन्ह Danse Macabre (डान्स ऑफ डेथ) या मृत्यूशी निगडीत कलात्मक शैलीचं चिन्ह म्हणून वापरलं गेलं. पुढे हे चिन्ह समुद्री चाचे आणि त्यांच्या जहाजावर फडकणाऱ्या काळ्या झेंड्याच्या बाबतीत जोडलं गेलं. या काळ्या झेंड्यावर कवटी आणि दोन हाडं दिसून यायची.


स्रोत

‘पायरेट्स ऑफ़ द कॅरेबियन’ या चित्रपटात तुम्हाला असे झंडे दिसले असतीलच. अशा प्रकारच्या झेंड्यांना “जॉली रॉजर” संबोधलं जातं. हा झेंडा दिसला म्हणजे लोकांच्या मनात प्रचंड भीती तयार व्हायची. लूटमारीचं चिन्ह म्हणून देखील हे बदनाम होतं.


स्रोत

१२ व्या शतकातल्या ‘नाईट्स टेम्पलार’ नावाच्या चर्चशी जोडलेल्या सैन्यानेही या चिन्हाचा वापर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वापरला. हे ‘नाईट्स टेम्पलार’ चर्चचं संरक्षण  करायचे. १०९९ साली झालेल्या पहिल्या ख्रिश्चन धर्मयुद्धानंतर याची गरज पडली. धर्माचा वचक राहावा म्हणून कदाचित या प्रकारचं चिन्ह वापरलं असावं असा एक तर्क आपण लावू शकतो.


स्रोत

पुढच्या काळात युरोपात दफनभूमीच्या प्रवेशद्वारावर असे चिन्ह लावली जाऊ लागली. खास करून स्पेनमधल्या दफनभूमीच्या प्रवेशद्वारी कवटीचे चिन्ह जास्त आढळून येऊ लागले. १९ व्या शतकापासून धोक्याच्या ठिकाणी इशारा म्हणून या चिन्हाचा वापर सुरु झाला. म्हणजे  विष आणि इतर विषारी घटक दर्शवण्यासाठी. या सर्वांबरोबरच काही गुप्त संघटना याचा वापर आपलं बोध चिन्ह म्हणून करू लागल्या.

 

हे सगळं झालं इतिहासाचं पण आपल्यापैकी बऱ्याचजणांची वेताळाशी ओळख शाळेत असल्यापासून आहे. आठवा ती वेताळाची अंगठी आणि त्याची डेन्कालीतील कवटीच्या आकारातील गुहा !!


स्रोत
 

एकंदरीत पाहता जिथे मृत्यू आहे तिथे हे चिन्ह वापरलं जाण्याची प्रथा फार पूर्वी पासून पडली आहे. त्यामुळे या चिन्हाला पूर्ण जगात एक इशारा म्हणून बघितलं जातं. ते याही पुढे चालू राहणार.
तेव्हा जिथं जिथं हे चिन्ह दिसेल, तिथं सावधगिरी बाळगा...


स्रोत

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required